मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (09:29 IST)

बर्ड फ्लू : 'लेकरांच्या तोंडचा घास काढून कोंबड्या वाढवल्या साथीने सगळ्या नेल्या'

-तुषार कुलकर्णी
"लेकरांच्या तोंडचा घास काढून कोंबड्यांना खायला घातला, त्या कोंबड्यांनीच आम्हाला संसाराला आधार दिला पण बर्ड फ्लू मुळे सगळ्या कोंबड्या एकदाच जाणारायेत," बोलताना रडू अनावर न होणाऱ्या संगीता चोपडे सांगत होत्या.
 
परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात बर्ड फ्लूची साथ आली त्यानंतर दोन दिवसांमध्ये शेकडो कोंबड्या आणि इतर काही पक्ष्यांचे मृत्यू झाले. बचत गटाच्या माध्यमातून गावरान कोंबड्या पाळून त्यांची अंडी विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबावर संक्रांत आली.
 
बर्ड फ्लूच्या साथीचे निदान झाल्यानंतर मुरुंबा परिसरातील 1 किमीच्या परिघातील पाळीव पक्षी मारण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले. या आदेशाअंतर्गत या परिसरातील किमान 5,500 कोंबड्या मारल्या जाणार आहेत.
 
10 कोंबड्यापासून केली होती सुरुवात
या साडेपाच हजार कोंबड्यांपैकी 1100 कोंबड्या संगीता चोपडे यांच्या आहेत. 10 कोंबड्यांपासून सुरू केलेला व्यवसाय एकाएकी बंद होणार ही कल्पना त्या करू देखील शकत नाही. त्यांचं रडणं देखील थांबत नाही. आधी कोरोना आणि आता बर्ड फ्लू या दोन्हीचा परिणाम व्यवसायावर झाल्यानंतर आता मुला-बाळांना मी काय खाऊ घालू असा प्रश्न त्या विचारतात.
 
"आमच्याकडे फक्त दीड एकर शेती आहे. सोयाबीन लावला तर अवकाळी पावसाने जातो, तर कधी ज्वारीला कीड लागायची. घरात अठरा विश्वे दारिद्र्य. मी कधी दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करायला जावं लागायचं. 1993 ला रुपया रुपया जमा करून मी 10 कोंबड्या विकत घेतल्या आणि अंडे विकायला सुरुवात केली," संगीता चोपडे सांगत होत्या.
 
"दहा कोंबड्याच्या काही वर्षांत शंभर कोंबड्या झाल्या. कधी विकल्या कधी ठेवल्या पण त्यांच्यामुळे संसाराला हातभार लागू लागला. त्यांना जगवायला खूप कष्ट पडले. कधी साचवलेले पैसे मोडून तर कधी मजुरी करून कोंबड्यांना आम्ही जगवलं. अंडे जास्त दिवस टिकावेत याच्यासाठी फ्रीज घेतलं. मग कोरोना आला आणि दोन तीन महिने अंडे विक्री थांबली. लॉकडाऊन उघडल्यावर पुन्हा विक्री सुरू झाली. गिऱ्हाईक मिळू लागलं," चोपडे सांगतात.
 
गेल्या अनेक वर्षांपासून गावामध्ये बचतगटाचे काम सुरू आहे. 11 ते 15 महिलांचा एक बचत गट, असे गावामध्ये एकूण 16 बचतगट आहेत. या बचतगटांच्या माध्यमातून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या साहाय्याने संगीता चोपडे यांना अडीच लाखांचे कर्ज उपलब्ध झाले. संगीता चोपडे आणि त्यांचे पती बालासाहेब चोपडे गेले कित्येक वर्षापासून अंडी विकण्याचा व्यवसाय करत होते त्याच व्यवसायाचा विस्तार व्हावा या हेतूने त्यांनी हे कर्ज घेतल्याचं ते सांगतात.
 
बीबीसी मराठीला चोपडे कुटुंबीयांनी त्यांचा शेड दाखवला. 20 बाय 30 च्या जागेत कोंबड्यांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था केली होती. तिथे शेकडो जिवंत कोंबड्या होत्या. जिल्हा प्रशासनाने कोंबड्यांना मारण्याचे आदेश दिल्यानंतर काही अंतरावरच जेसीबीने मोठे खड्डे खणण्याचे काम सुरू होते.
 
काही वेळानंतर या कोंबड्यांना केमिकल देऊन ठार करण्यात येणार होते. या प्रक्रियेला 'कलिंग' म्हटलं जातं. कलिंगसाठी पशुसंवर्धन खात्याची टीम येणार होती. ते आल्यावर काही तासांतच या सगळ्या कोंबड्या एकदाच जातील असं सांगितलं असतं तर कुणाचा विश्वास बसला नसता.
 
50-60 हजार रुपये खर्च करून सप्टेंबर महिन्यात हे शेड उभारल्याचं संगीता चोपडे सांगतात. त्यांच्याकडे असलेल्या 300 कोंबड्या आणि नंतर बचतगटामार्फत त्यांनी छोटी पिल्लं घेत व्यवसायाचं रूप पालटलं.
 
"चार महिन्यांपूर्वी अगदी दोन इंच असलेली पिल्लं आता चांगली मोठी झाली होती आणि अंड्याच्या विक्रीतून रोजची 300 रुपयांची कमाई व्हायची," असं त्या सांगतात.
 
"अडीच लाखांचे कर्ज घेतल्यानंतर 20,000 महिन्याला असं दोन तीन वर्षांत आमचं कर्ज फिटलं असतं. मोठा मुलगा 11 वी मध्ये आहे आणि मुलगी आठवीत आहे. त्यांची शिक्षण झाली असती पण आता बर्ड फ्लू मुळे आमची स्वप्नं धुळीला मिळाली," संगीता चोपडे सांगतात.
 
'सडा पडल्यासारख्या कोंबड्या पडल्या होत्या'
मुरुंब्यातला नदीपासून काही फुटांच्या अंतरावर चंद्रकला झाडे यांचा कोंबड्यांचा शेड आहे. त्यांच्याच शेडमधील कोंबड्या बर्ड फ्लू मुळे गेल्या. शुक्रवारी (8 जानेवारी) काही आणि शनिवारी (9 जानेवारी) सर्वच कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी कुणालाच माहीत नव्हतं हे कशामुळे झालं आहे. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली. कोंबड्यांचे नमुने भोपाळला पाठवल्यानंतर कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे निदान झाले.
 
चंद्रकला झाडे यांनी त्यांचा शेड बीबीसी मराठीला दाखवला. मक्याच्या शेतातच त्यांनी आपला शेड उभारला होता. कोंबड्या मृत्यू पावल्यानंतर जवळच एक मोठा खड्डा खणून त्यांना त्यात पुरण्यात आले होते. तो शेड पूर्णपणे रिकामाच होता.
 
शेडकडे बोट दाखवून चंद्रकला झाडे सांगतात, "दोन दिवसांपहिले जर तुम्ही हा शेड पाहिला असता तर कोंबड्यांची किलबिल तुम्हाला ऐकू आली असती. त्यांना खायला टाकणं, पाणी देणं कधी त्यांना पाय मोकळे करायला मक्याच्या शेतात सोडून परत शेडमध्ये आणणं यात माझा दिवस जात होता."
 
"कोंबड्यांना मुंगुसांपासून काही होऊ नये म्हणून आम्ही डोळ्यात तेल घालून त्यांची काळजी घ्यायचो. पण बर्ड फ्लूने सगळ्याच कोंबड्या एकाच दिवशी गेल्या. सकाळी रोजच्या सारखं पाहायला आले तर पूर्ण शेडमध्ये कोंबड्यांचा सडा पडलेला दिसत होता," चंद्रकला झाडे सांगतात.
 
चंद्रकला झाडे यांनी देखील कर्ज घेऊन कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. "इतकी मेहनत केल्यावर आता कुठे पिल्लं मोठी झाली होती. ती विकल्यावर पैसे फिटून हाताशी काही पैसे आले असते. पण आता सगळं गेलं आणि डोक्यावर कर्जाचा भार आला. आता आमचं काय होणार देवालाच माहीत," असं झाडे म्हणतात.
 
झाडे आणि चोपडेंनी 'परभणी महिला स्वावलंबन बचतगट नागरी सहकारी पतसंस्था', यांच्याकडून कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला होता. या घटनेनंतर कर्ज परतफेडीची प्रक्रिया कशी राहील असं विचारला असता या पतसंस्थेच्या संचिव अंबिका डहाळे सांगतात, "ही नैसर्गिक आपत्ती आहे त्यामुळे सध्यातरी आम्ही हफ्त्यांची प्रक्रिया स्थगित केली आहे. या महिलांच्या समस्येकडे सहानुभूतीपूर्वक पाहिले जाईल. केवळ कर्जमाफीच नाही तर पुन्हा नव्याने त्या त्यांच्या पायावर कशा उभ्या राहतील यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करूत."
 
बर्ड फ्लू मुरुंब्यात कसा आला?
परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लू कसा आला असं विचारलं असता जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर सांगतात, "परभणी जिल्ह्यात दोन जागा बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाने प्रभावित झाल्या आहेत. परभणी तालुक्यातील मुरुंबा आणि सेलू तालुक्यातील कुपटा या जागी पक्ष्यांचे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दोन्ही गावांमध्ये नदी वाहते. स्थलांतरित पक्ष्यांकडून मुरुंब्यातील आणि कुपट्यातील पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याची शक्यता आहे."
 
दोन्ही ठिकाणी एक किमी क्षेत्रातील पाळीव पक्षी मारण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच 10 किमी परिसरात पाळीव पक्ष्यांच्या आवकजावक वर ही प्रतिबंध लावण्यात आलेले आहेत. इतर पक्ष्यांना संसर्ग होऊ नये म्हणून कलिंगचे आदेश देण्यात आले आहेत. पक्ष्यांवर केमिकल्स टाकून त्यांना ठार केले जाईल आणि त्यांना खड्ड्यात पुरले जाईल.
 
हा आजार माणसांना होत नाही त्यामुळे काळजीचे कारण नाही असं मुगळीकर सांगतात.