सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जुलै 2020 (09:11 IST)

जम्मू काश्मीरमध्ये भाजप नेते वसीम बारी यांची हत्या

-माजिद जहांगिर
काश्मीरमध्ये भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष वसीम बारी, त्यांचे वडील आणि भावाची बांदीपोरा जिल्ह्यात संशियत कट्टरवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे.
 
जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी उशीरा हा हल्ला झाला. हे तिघेही त्यावेळी त्यांच्या घराच्या जवळच असणाऱ्या त्यांच्या दुकानात होते.
 
काश्मीर झोनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी भाजप कार्यकर्ते वसीम अहमद बारी यांच्यावर गोळी झाडली. या घटनेत 38 वर्षांचे बारी, त्यांचे 60 वर्षांचे वडील बशीर अहमद आणि 30 वर्षांचा भाऊ उमर बशीर जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या तिघांनाही हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तिघांचाही मृत्यू झाला.
 
बांदीपोराचे मुख्य वैद्यकीय अधिकारी बशीर अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघांच्याही डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
 
त्यांनी सांगितलं, "रात्री पावणे नऊ वाजता तिघांनाही रुग्णालयात आणण्यात आलं. तिघांनाही गोळ्या लागल्या होत्या आणि हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. रात्री 8:45 वाजता त्यांचा मृत्यू झाला होता. तिघांचंही पोस्टमॉर्टम झालेलं आहे. इतर कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करण्यात आलीय. आता आम्ही मृतदेह पोलिसांकडे सोपवत आहोत."
 
काश्मीरमध्ये झालेल्या या घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. त्यांनी पीडित कुटुंबासाठी सहवेदना व्यक्त केली असल्याचं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी रात्री उशीरा ट्वीट करत म्हटलंय.
 
ही हत्या म्हणजे काश्मीरमधला राष्ट्रवादी आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचं भाजपने म्हटलंय.
 
असे हल्ले काश्मीरमधला आवाज दाबून टाकू शकत नसल्याचं भाजपच्या जम्मू-काश्मीर युनिटचे प्रवक्ते अनिल गुप्तांनी बीबीसीला सांगितलं.
 
ते म्हणाले, "वसीम गेल्या तीन वर्षांपासून जिल्हाध्यक्ष होते. ते एक सक्रीय कार्यकर्ते होते आणि सामाजिक कार्यही करत होते. ही घटना समजल्यावर धक्का बसला. ते त्यांच्या घराजवळच्या त्यांच्या दुकानात बसले होते. दहशतवादी आले आणि त्यांना गोळ्या घातल्या."
 
"हा काश्मीरमधला राष्ट्रवादी आवाज दाबण्याचा स्पष्ट प्रयत्न आहे. तुमच्या लक्षात असेलच की महिन्याभरापूर्वीच एका दहशतवादी संघटनेने आमच्या भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या होत्या. अशा प्रकारच्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो."
 
सीमेपलिकडून मिळत असलेल्या सूचनांनुसार या हत्या केल्या जात असल्याचा आरोप गुप्तांनी केलाय.
 
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रात्री उशीरा ट्वीट करत म्हटलंय, "हे पक्षाचं मोठं नुकसान आहे. या कुटुंबाला माझ्या सहवेदना. सगळा पक्ष या संतप्त कुटुंबासोबत आहे. त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही याची मी खात्री देतो."
 
इतर राजकीय पक्षांनीही या घटनेचा निषेध केलाय.
 
ओमर अब्दुल्लांनी ट्वीट करत म्हटलंय, "बांदीपोरामध्ये भाजपचे पदाधिकारी आणि त्यांच्या वडिलांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबद्दल ऐकून दुःख झालं. या हल्ल्याचा मी निषेध करतो. दुःखाच्या काळात मी या कुटुंबाच्या सोबत आहेत. मुख्य प्रवाहातल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सतत निशाणा साधण्यात येतोय आणि ही दुःखाची गोष्ट आहे."
 
तर वसीम बारींच्या आठ सुरक्षा गार्ड्सना ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
 
हल्ला झाला तेव्हा एकही सुरक्षा गार्ड बळी पडलेल्यांच्या सोबत नव्हता असं जम्मू -काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितलं.
 
या हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केलीय.
 
या आधीही काश्मीर खोऱ्यातल्या विविध भागांमध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची हत्या झाली आहे.
 
भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी वसीम बारी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तरुण भाजप नेत्याच्या निधनामुळे आपल्याला अतोनात दुःख झालं असं राम माधव यांनी म्हटलं आहे.
 
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांनी देखील वसीम बारी यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं आहे. त्याचा गुन्हा फक्त इतकाच होता की त्याने हातात तिरंगा घेतला होता असं त्यांनी म्हटलं आहे.