सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

124 डिग्रीच्या तापलेल्या जमिनीवर वीटभट्टी मजूर असे काम करतात

- अनंत प्रकाश आणि देबलीन रॉय
124 डिग्री तापमानातलं जगणं कसं असतं? तिथे लोक काम कसे करतात? त्यांना तिथे श्वास तरी घेता येतो का? वीट भट्टीवरच्या कामगारांच्या आयुष्याकडे जवळून पाहिलं तर तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.
 
त्यांच्या हातांना स्पर्श करून पाहा. लाकडी चप्पल घालून जिथे उभे राहून ते भट्टीत कोळसा ढकलतात, तिथे उभं राहून पाहा.
 
ही भारतातल्या कोट्यवधी असंघटित मजुरांची कहाणी आहे जे आपल्या कुटुंबातील लोकांचं पोट भरण्यासाठी अशा तापमानाच्या ठिकाणी काम करतात, तेही 45 ते 50 डिग्री सेल्सियसच्या कडक उन्हात.
 
कडक उन्हामध्ये रस्त्याच्या कडेला भजी विकणाऱ्यांची, टायरचं पंक्चर काढणाऱ्यांची किंवा पाणी विकणाऱ्यांची संख्या कोट्यवधींमध्ये आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार 2030पर्यंत भारतामधल्या अशा 3.4 कोटी नोकऱ्या संपुष्टात येतील.
 
तर शेती, बिस्किटं बनवणाऱ्या फॅक्टरीज, धातू गाळणाऱ्या भट्ट्या, अग्निशमन विभाग, खाणकाम, बांधकाम आणि वीट भट्टीवर काम करणाऱ्या कोट्यवधी मजुरांवर याचा सर्वांत जास्त परिणाम होईल कारण या जागांचं तापमान आधीच जास्त असतं.
 
कॅथरीन सॅगेट यांच्या नेतृत्त्वाखाली तयार करण्यात आलेल्या या अहवालात असा दावा करण्यात आलाय की वाढत्या उष्म्यामुळे दुपारच्या वेळेत काम करणं कठीण होईल. ज्याने मजुरांसोबतच त्यांना काम देणाऱ्यांचंही आर्थिक नुकसान होईल.
 
असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे मजूर किती तापमानात काम करतात आणि त्याचा त्यांच्या तब्येतीवर काय परिणाम होतो, हे बीबीसीने एका थर्मोमीटरच्या मदतीने हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.
 
काम करण्याशिवाय पर्यायच नाही...
भट्टीवर काम करणारे राम सूरत सांगतात, "इथे काम करणं सोपं नाही. आमच्याकडे दुसरा पर्याय नाही म्हणून हे करतोय. रबर आणि प्लास्टिकच्या चपला जळून जातात म्हणून लाकडी चप्पल घालून काम करतो."
 
राम सूरत ज्या जागी उभे राहून काम करतात, तिथल्या जमिनीचं तापमान 110 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त होतं. त्याच जमिनीलगतच्या 80 डिग्री सेल्सियस.
 
राम सूरत यांच्या अंगावर जेव्हा बीबीसीने तापमापक लावला तेव्हा तापमान 39 डिग्री सेल्सियसपासून सुरू होत 43 डिग्रीपर्यंत गेलं. संयुक्त राष्ट्र संघाच्या रिपोर्टनुसार शरीराचं तापमान 39 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त झाल्यास त्या माणसाचा जीव जाऊ शकतो.
 
या मजुरांमध्ये काही तास घालवल्यानंतरच बीबीसीच्या या पत्रकाराला डोळे जळजळणं, उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. याशिवाय या मजुरांच्या कामाच्या ठिकाणी उभं राहून बोलताना उच्च तापमानामुळे बीबीसीच्या या पत्रकाराच्या बुटांचे सोल जळून गेले.
 
मग अशा ठिकाणी दिवसभर काम करणाऱ्यांच्या तब्येतीवर याचा किती परिणाम होत असेल.
 
याचं उत्तर देताना राम सूरत म्हणतात, "इथे काम करायला सुरुवात केली की लघवीच्या वेळी आग होते. हे काम सतत चालूच राहतं. सहा तासांच्या कामादरम्यान एक मिनीटही विश्रांती घेता येत नाही. हा त्रास होऊ नये म्हणून पाणी पिणं थांबवलं तर लघवी पांढरी व्हायला लागते."
 
"डॉक्टरला दाखवलं होतं. पण ते म्हणतात की हे सगळं भट्टीवर काम केल्याने होतंय. काम केलं नाही तर सगळं नीटही होतं. पण काम कसं सोडणार? आमच्याकडे पर्याय नाही दुसरा."
 
इतकं म्हणून राम सूरत पुन्हा आग विझू नये म्हणून भट्टीत कोळसा टाकायला जातात.
 
या अहवालानुसार वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांवर याचा सगळ्यात जास्त परिणाम होईल. हे कामगार सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या तळागाळातले असतात आणि पुरेशी माहिती नसल्याने त्यांना सरकारी आरोग्य योजनांचाही फायदा घेता येत नाही.
 
सेंटर फॉर सायन्स ऍण्ड एन्व्हार्यनमेंटशी निगडीत असणारे निवित कुमार या अहवालाविषयी चिंता व्यक्त करताना म्हणतात, "यामध्ये फक्त 3.4 कोटी नोकऱ्या म्हटल्याचं मला आश्चर्य वाटतंय. येत्या काही काळात यापेक्षा कितीतरी जास्त लोकांच्या रोजीरोटीवर परिणाम होणार आहे."
 
"वीटभट्टीवर 60-70 डिग्री सेल्सियस तापमानात कोणतीही विशिष्ट सुरक्षा उपकरणं न वापरता सलग काही तास काम करणं कठीण आहे. हे लोक जिथे उभे असतात त्याच्या खालचं तापमान सहाशे-सातशे डिग्री सेल्सियस असतं. अशात जर उन्हाळा वाढला तर अशी कामं करणं कठीण होईल."
 
हे लोक हातमोजे, मास्क किंवा सुरक्षेसाठीच्या इतर कोणत्याही विशिष्ट गोष्टी न घेता उघड्या हातांनी ही कामं करतात. कारण त्यांना आपल्या मुलांच्या पोटापाण्याची चिंता असते.


 
शेतमजूरांवर संकट?
पर्यावरण विषयक काम करणाऱ्या 'डाऊन टू अर्थ' या मासिकाच्या एका अहवालानुसार 2001 सालापासून दररोज साधारण 10 हजार लोक स्वतःची शेतीसोडून शेत मजुरीचं काम करत आहेत.
 
वाढत्या उकाड्याचा परिणाम या शेत मजुरांवर दिसायला लागल्याचं बीबीसीला आढळलं.
 
पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये इतर कोणाच्या तरी शेतामध्ये मजुरी करणारे साठ वर्षांचे श्रवण सिंग सांगतात की त्यांनी त्यांच्या हयातीत इतका उन्हाळा कधी पाहिला नाही.
 
श्रवण सिंह म्हणतात, "मी पुष्कळ उन्हाळे पाहिले. पण यावर्षी इतका उकाडा कधी पाहिला नाही. कालच माझ्या मुलीने थोडा वेळ काम केलं आणि तिला उलट्या-जुलाब होऊ लागले. औषधोपचार केले पण अशात काय करायचं? आम्ही रिकामे तर बसू शकत नाही."
 
"यावेळी पाऊस पडला असता तर आतापर्यंत पीक आमच्या खांद्यापर्यंत आलं असतं. पण पाऊस झाला नाही. आणि उन्हाळ्याची झळ तो सहन करणाऱ्यांनाच कळतेय. मजूर किती तापमानात राहून तांदळाचं पीक घेतो, हे एसीमध्ये राहणाऱ्यांना समजणार नाही."
 
दुपारच्या रोजगारावर गदा
हायवेच्या कडेला इतर परंपरागत रोजगार करणाऱ्यांची परिस्थिती पाहण्यासाठी बीबीसीची टीम पोहोचली, तेव्हा तिथलं तापमान होतं 48 डिग्री सेल्सियस.
 
हायवेच्या कडेला मोटर सायकल दुरुस्त करणारे मोहम्मद मुस्तकीम सैफी सांगतात की गेली काही वर्षं दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अजिबात काम मिळत नाही. सैफी सांगतात, "उकाडा आता इतका वाढतोय की दिवसभर काही काम नसतं. माझं पूर्ण कुटुंब हेच काम करतं. पण आता कामच नाही. 12 वाजले की रस्त्यांवर शुकशुकाट होतो."
 
"येत्या काही वर्षांमध्ये जेव्हा उन्हाळा अजून वाढेल, तेव्हा काय होईल ते अल्लाच जाणे. कोण करणार आम्हाला मदत? मोदी सरकारकडून काहीच अपेक्षा नाही. आता फक्त अल्लाचाच सहारा आहे."
 
निवित कुमार सांगतात, "येत्या काही काळात उष्णता इतकी वाढेल की अशी पूर्वीसारखी कामं करणं कठीण होईल. अशात या सगळ्या उद्योगांना स्वतःत बदल घडवावा लागेल. म्हणजे वीट भट्ट्यांचं काही प्रमाणात यांत्रिकीकरण केलं तर या समस्येवरचा काही प्रमाणात तोडगा निघू शकतो. पण सरकारने याबाबत गंभीर विचार करायला हवा."
 
"पश्चिम उत्तर प्रदेशातल्या काही वीट भट्ट्यांनी आपल्या पद्धती बदलत मजुरांना आराम करण्यासाठी जागा तयार केल्या आहे. या भट्टयांचं उत्पादन पारंपरिक भट्ट्यांच्या तुलनेत बरंच जास्त होत आहे. अशात आपल्याला हे समजून घ्यायला हवं की आता भविष्यामध्ये आपण जुन्या पद्धतींनुसार व्यवसाय करू शकत नाही. आपल्याला बदलायलाच हवं."
 
"भट्ट्या झिग-झॅग पद्धतीने चालवून प्रदूषण कमी करता येऊ शकतं. याशिवाय त्यांना आधुनिक फॅक्टरीचं स्वरून दिलं तर इथे लोकांना वर्षभरासाठी रोजगार मिळू शकतो."
 
नवीन रोजगार निर्मिती करणं ही भारतातल्या राजकीय पक्षांसाठी एक मोठी अडचण आहे.
 
अशात आता सवाल राहतो तो म्हणजे वाढत्या उन्हाळ्यामध्ये या पारंपरिक रोजगारांना धोका निर्माण झाला तर यावर अलंबून असणारे लोक स्वतःच आणि त्यांच्या मुलांचं पोट भरणार तरी कसं.