बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 25 जून 2019 (16:10 IST)

पहिल्या रात्री कौमार्य चाचणीची क्रूर प्रथा फक्त भारतातच नाही

- माजेरम झेयनालोव्ह
नवविवाहित महिलांची 'कौमार्य' चाचणी करणाऱ्या अमानुष प्रथेच्या विरोधात महाराष्ट्रातल्या कंजारभाट समाजातल्या काही तरुणांनी विरोध करत काही महिन्यांपूर्वी आंदोलनही केलं होतं. पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेण्याच्या अशा प्रथा महाराष्ट्रातच नाही तर दुर्दैवाने जगभरातल्या विविध देशांमध्ये अजूनही पाळल्या जातात.
 
लग्नाची रात्र ही खरं तर त्या जोडप्याच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असायला हवा. पण भारतातीलच नाही तर जगभरातल्या अनेक तरुणींसाठी ही रात्र अशा अमानुष प्रथांमुळे क्लेषदायक ठरतेय. कॉकससमध्ये या प्राचीन प्रथेमुळे हा दिवस त्या नववधूसाठी मानसिक आणि शारीरिक अत्याचाराचा ठरतोय. अनेकदा या मुलींना याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतात.
 
"त्याने माझ्यासमोरच कपडे उतरवायला सुरुवात केली, आणि माझा थरकाप उडाला," एल्मिरा (बदललेलं नाव) सांगते. ''आता माझं लग्न झाल्याने हे होणारचं आहे, असं मी स्वतःलाच समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी शांत होऊ शकले नाही. माझ्या मनात सतत इतकंच येत होतं की आता मलाही कपडे उतरवावे लागणार.''
 
27 वर्षांची एल्मिरा तेव्हा नुकतीच पदवीधर होऊन दुभाष्याचं काम करायला लागली होती. तिच्या नवऱ्याची निवड तिच्या आईवडिलांनी केली होती. 'आईला खुश करण्यासाठी' ती या लग्नाला तयार झाली होती. ''तो आमचा शेजारीच होता, पण आम्ही दोघं अगदी वेगळे होतो. तो अशिक्षित होता. आमच्या काहीच समान नव्हतं'' ती सांगते.
 
''माझ्या भावांनी माझी त्याच्याशी ओळख करून दिली आणि तो चांगला मुलगा असल्याचं मला सांगितलं. मी शेजाऱ्याशीच लग्न करतेय म्हणून आई आनंदात होती. कारण मी जवळच असल्याने सगळं कसं सुरू आहे हे तिला समजणार होतं.'' आपल्याला एवढ्यात लग्न करायचं नसल्याचं एल्मिराने तिच्या आईला अनेकदा सांगितलं होतं. तिच्या आईने ही गोष्ट नातेवाईकांना सांगितल्यावर त्यांना एल्मिरा व्हर्जिन नसल्याची शंका आली, आणि त्यांनी दबाव टाकायला सुरुवात केली. पण खरं म्हणजे लग्नाच्या रात्री पहिल्यांदाच एल्मिराने सेक्स अनुभवला. पण हे माहीत असूनही तिच्या नवऱ्याने तिच्या भावना आणि तिचा आत्मसन्मानांची कदर केली नसल्याचं ती सांगते.
 
तो सरळ तिच्या अंगावरच आला आणि जेव्हा तिचं डोकं कपाटावर आपटू लागलं तेव्हा शेजारच्या खोलीतून कोणीतरी भिंतीवर थापा मारत म्हणालं, ''अरे, जरा आवाज कमी करा! किती तो धसमुसळेपणा!''
 
त्या खोलीमध्ये एल्मिराची आई, तिच्या दोन आत्या, तिची सासू आणि आणखी एक दूरची नातेवाईक अशा सगळ्या जणी होत्या. त्या दूरच्या नातेवाईक महिलेनेच ओरडून सूचना दिली होती. शारीरिक संबंध पार पडून लग्न सफल झाल्याची घोषणा करण्यासाठी आणि नववधूचं कौमार्य सिद्ध करण्यासाठी या सगळ्यांचं तिथं असणं परंपरेनुसार गरजेचं होतं.
 
''एकूण एक गोष्ट त्यांना ऐकू जात होती. मी वेदना आणि लाजेने थरथरत होते, मनात विचार आला, 'लग्न खरंच असं असतं का?''' ती दूरची नातेवाईक 'एन्जी'ची भूमिका बजावत होती. म्हणजे ती विवाहित महिला जी लग्नानंतर लगेचच नवदांपत्यासोबत त्यांच्या घरी जाते आणि पूर्ण रात्र त्यांच्या शेजारच्या खोलीत रहाते. सल्ला देणं ही तिची जबाबदारी असते. कारण शरीर संबंधांविषयीची माहिती नसणारी नववधू अनेकदा ज्येष्ठ आणि माहीतगार महिलेचा सल्ला मागण्यासाठी तिच्या खोलीतून बाहेर येण्याची शक्यता असते. या एन्जीची दुसरी जबाबदारी असते लग्नाच्या रात्रीच्या बेडशीट्स घेणं.
 
'लग्नाची गूढ रात्र'
लग्नानंतरच्या सकाळी सगळ्यांना बेडशीट दाखवण्यात येण्याची कॉककसमध्ये प्रथा आहे. त्यावरचं रक्त हे विवाहितांच्या नातेवाईकांसाठी लग्न सफल झाल्याचा पुरावा असतं. रक्ताचे डाग पाहिल्यावर कुटुंबाकडून नवदांपत्याचं अभिनंदन करण्यात येतं आणि यानंतरच लग्नाचे विधी पूर्ण झाल्याचं मानण्यात येतं. ''म्हणूनच लग्नाच्या रात्रीभोवती एक गूढ वलय नेहमीच असतं...सकाळी बेडशीट्सवर काय दिसणार?'' अझरबायजानमध्ये स्त्रीहक्कांचा अभ्यास करणाऱ्या शाखला इस्माईल सांगतात. बेडशीटवर रक्ताचे डाग नसतील तर त्या महिलेला वाळीत टाकण्यात येतं. आणि ती 'सदोष' असल्याचं सांगत तिच्या आईवडिलांकडे परत पाठवण्यात येतं. यानंतर ती घटस्फोटित असल्याचं मानलं जातं आणि पुन्हा लग्न करणं हे अनेकदा तिच्यासाठी अवघड असतं. शिवाय आईवडिलांच्या घरीही तिचा छळ होण्याची शक्यता असते.
 
लग्नाच्या रात्री साक्षीदार तिथे असण्याची आणि चारचौघांमध्ये बेडशीट दाखवण्याची ही प्रथा अजूनही अझरबायजानच्या ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असल्याचं मानवी हक्क कार्यकर्ते सांगतात. याशिवाय कधीकधी लग्नापूर्वी त्या महिलेची 'तज्ज्ञांकडून' कौमार्य तपासणी करून घेतली जाते. प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनांनी याविषयी आक्षेप घेतला आहे. गेल्या वर्षी युनायटेड नेशन्स (युएन) आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेन (डब्ल्यूएचओ)ने ही प्रथा संपवण्याचं आवाहन केलं होतं. किमान 20 देशांमध्ये अजूनही ही प्रथा पाळण्यात येते. हे महिलांसाठी अपमानास्पद आणि अत्यंत क्लेशकारक असल्याचं या संघटनांनी म्हटलंय. यासोबत वैद्यक शास्त्रामध्ये कौमार्य किंवा व्हर्जिनिटी अशी संकल्पनाच नसून ती फक्त सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्या अस्तित्वात असल्याचंही या संघटनांनी सांगितलंय.
 
'लाजेपेक्षा जास्त भीती वाटली'
भीती, वेदना आणि लाज या सगळ्या गोष्टी लग्नाच्या रात्रीचा उल्लेख केल्यावर आठवतात. ''काहीही बोलायची भीती वाटून मी एकटीच बसले होते. आख्खी रात्र मी झोपू शकले नाही. त्याला मात्र याची फिकीर नव्हती. तो शांतपणे झोपी गेला.'' सकाळ झाल्यावर हे 'साक्षीदार' बेडशीट्स घेण्यासाठी खोलीत आले. ''तोपर्यंत मी या सगळ्याची पर्वा करणंच सोडून दिलं होतं. हे सगळं घृणास्पद होतं पण आदल्या रात्री जे झालं त्याची भीतीच इतकी मनात बसली होती की त्यापुढे कसलीच लाज नव्हती,'' एल्मिरा सांगते. ''आता सगळेजण त्या बेडशीटची तपासणी करणार हे मला माहीत होतं. पण मी इतक्या धक्क्यात होते की त्यांनी ती बेडशीट कशी काढून घेतली हेही मला आठवत नाही.'' दरवर्षी या प्रथा महिलांसाठी अधिक क्लेशकारक होत असल्याचं मानसोपचारतज्ज्ञ एलाडा गोरिना सांगतात.
 
आधुनिक जगामध्ये बहुतेकजण उशिरा लग्न करतात. त्यांना लग्नाआधी शारीरिक संबंधांचा अनुभव असतो. या तरुणांना बाजूच्या खोलीतल्या नातेवाईकांच्या सल्ल्याची गरज नसते. म्हणून मग नववधूची कौमार्य तपासणी हा एकच उद्देश रहातो. ''आजही अनेक महिलांना एन्जी ही सामान्य गोष्ट वाटते. धक्का बसणं, वाद होणं आणि दुःख होणं हे तेव्हा होतं जेव्हा नवीन पिढी (त्यांच्या पालकांपेक्षा) अधिक प्रगत वातावरणात मोठी होते.'' आधी अझरबायजानच्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या नेगरला आठवतंय की तिच्या लग्नाच्या रात्री एक-दोन 'सल्लागार' नाही तर जवळपास 'आख्खं गाव' दरवाजापलीकडे होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना बेडशीट दाखवावी लागली होती.
 
''मला आयुष्यात इतकी लाज कधी वाटली नव्हती, पण मला वाटलं हे नॉर्मल आहे, कारण जुन्याजाणत्या लोकांना जास्त माहिती असते. '' नेगर सांगते की तिला किंवा तिच्या नवऱ्याला त्या रात्री सेक्स करावासा वाटत नव्हता कारण दरवाज्याबाहेरून 'लोकांचे खुर्च्या हलवण्याचे, श्वासाचे' आवाज येत होते. सकाळी त्यांना बेडशीट दाखवावी लागली. त्यावेळी नेगर फक्त 18 वर्षांची होती. आता ती तिशीत आहे आणि घटस्फोटित आहे. अझरबायजानची राजधानी बाकूमध्ये ती रहाते. तिचे नातेवाईक आता तिला विकृत वाटतात. पण नवीन आयुष्य सुरू करण्याची संधी प्रत्येकाला मिळतेच असं नाही आणि पुरुषसत्ताक समाजामध्ये महिलांची स्थिती पहाता हा बदल व्हायला वेळ लागणार आहे.
 
'रेड ऍपल'
बेडशीटची तपासणी होणाऱ्या अशाच काही चालीरीती शेजारच्या अर्मेनियामध्येही आहेत. जॉर्जियामध्ये आणि रशियातून फुटलेल्या उत्तर कॉकससमधील अनेक देशांमध्येही अशाच पद्धती पहायला मिळतात. याच्या अर्मेनियन आवृत्तींमध्ये दरवाजाबाहेर बसणारे 'साक्षीदार' नाहीत. बेडशीट्सवरच्या रक्ताच्या डागांवरून तिथे या प्रथेला 'रेड ऍपल' म्हटलं जातं. राजधानी येरेवानच्या बाहेर ही प्रथा सर्रास आढळते.
 
''राजधानीपासून आपण जितके दूर जाऊ तितकं हे प्रमाण वाढत जातं आणि बदलासाठी होणारा विरोधही प्रखर होत जातो. काही ठिकाणी तर हा प्रकार कट्टरतावादापर्यंत पोहोचला आहे,'' मानवी हक्क कार्यकर्त्या नीना कारापेटिअन्स सांगतात. आपली मुलगी शुद्ध आणि सदगुणी आहे हे दाखवण्यासाठी कधीकधी सगळ्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना बोलवलं जात असल्याचंही त्या सांगतात. ''म्हणजे एका अर्थी अख्खं गावचं या अपमानात सहभागी होतं,''कारापेटियन्स सांगतात.
 
ग्रामीण भागांमध्ये अनेकदा मुलगी 18 वर्षांची झाली की लगेच तिचं लग्नं लावून देण्यात येतं. अनेकजणींकडे इतर कोणतीही कौशल्यं किंवा नोकरी नसते. जर मुलगी ही 'रेड ऍपल टेस्ट' पास झाली नाही तर तिचे पालकही तिला सोडून देण्याची शक्यता असते.
 
'आम्ही त्या रात्रीविषयी कधीच बोललो नाही'
एलाडा गोरिना यांच्यामते काही महिला या प्रथेला तुलनेने सहजपणे सामोरं जाऊ शकतात, पण काहींना मात्र अनेक वर्षं यामुळे मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. ''एका प्रकरणात असं घडलं की त्या जोडप्याच्या पहिल्या रात्रीनंतर बेडशीटवर रक्त नव्हतं. म्हणून मग अर्ध्या रात्री नवऱ्यामुलाचं सगळं कुटुंब त्या नववधूला डॉक्टरकडे कौमार्य तपासणीसाठी घेऊन गेलं,'' गोरिना सांगतात. खासगी बाबी अशा चव्हाट्यावर मांडल्या गेल्यामुळे त्या महिलेला दीर्घकाल मानसिक वेदना होत असल्याचं गोरिना सांगतात. लग्नाच्या 6 महिन्यांनंतर एल्मिराच्या पतीचं निधन झालं. ''त्या सहा महिन्यांमध्ये आम्ही कधीही पहिल्या रात्रीबद्दल बोलो नाही,'' ती सांगते. पतीच्या निधनानंतर ती पुन्हा पुरुषांजवळ गेली नाही. एक मानसिक कुंपण तयार झाल्याचं ती सांगते.
 
''पुन्हा लग्नासाठी किंवा पुन्हा कोणासोबत नातं सुरू करण्यासाठी मी तयार होते, पण माझा पहिला अनुभव आठवून मी थांबते... आज पुन्हा एकदा मला त्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं, तर मी माझा नवरा आणि त्या बायकांसोबत पूर्णपणे वेगळी वागीन,' ती सांगते. या गोष्टी आता हळूहळू भूतकाळात जमा होऊ लागल्याचं अर्मेनिया आणि अझरबायजानमधले तज्ज्ञ सांगतात. ''नवीन पिढी आपल्या हक्कांसाठी भांडायला तयार आहे,'' नीना कारापेटिअन्स म्हणतात. 
 
''मला अशी काही कुटुंब माहीत आहेत ज्यांनी या प्रथेत सहभागी होण्यास नकार दिला. माझ्या मते ही लोकं विलक्षण आहेत आणि अशाच लोकांमुळे बदल घडतो,'' शाखला इस्माईल म्हणतात. साध्या अझेरी कुटुंबातील आरिफ आणि मलायका (काल्पनिक नावं)ची एकमेकांशी ओळख त्यांच्या नातेवाईकांनी करून दिली.
 
प्रथेनुसार त्यांच्या लग्नामध्ये वधू आणि वर उंच टेबलांवर वेगवेगळे बसतात. आणि फक्त त्यांच्याच टेबलवर दारू नसते. त्यांच्यासमोर त्यांचे सुमारे 400 पाहुणे नाचत - आनंद घेत असतात. वर त्याच्या वधूला किस करत नाही. ते चारचौघांत चालणारं नसतं. पण या थोड्याच वेळात मलायका सगळा गंभीरपणा बाजूला सारत नाचायला सुरुवात करते आणि नातलग तिच्याकडे पहात राहतात. कुजबूज आणि चर्चा सुरू होते. मलायकाला निर्लज्ज ठरण्यात येतं. ''हा काही डिस्को नाही!'' एक बाई तक्रारीच्या सुरात म्हणते.
 
''ही इतकी निर्लज्ज कशी! ही आपल्या प्रथांचा अपमान करतेय!'' दुसरं कोणीतरी म्हणतं. वधू आपल्याकडे अजिबात लक्ष देत नसल्याने पाहुणे नाराज होतात. पण ती नातेवाईकांऐवजी तिच्या मित्र-मैत्रिणींशी बोलते आणि कधीकधी तिच्या नवऱ्याच्या बॉससोबतही. पण मलायकादेखील ही प्रथा टाळू शकत नाही. या नवविवाहितांची कार लग्नाच्या हॉलमधून निघाल्यावर आणखी एक कार मागोमाग जाते. त्यात झिंगलेल्या चार महिला आहेत. आज रात्री आपण घरी एकटे नसणार, हे या आधुनिक जोडप्यालाही माहीत आहे.