अनुच्छेद 371 रद्द करा, आम्ही पाठिंबा देतो! - शरद पवार
राज्यघटनेतील अनुच्छेद 371 मुळे ईशान्येकडील राज्यांत जमीन-घर खरेदी करता येत नाही. हे कलम रद्द करा, त्यास आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहोत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारला लगावला. बुटीबोरीमध्ये आयोजित प्रचारसभेत पवार बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, 370 रद्द झाल्याने काश्मीरमध्ये घर, जमीन खरेदी करता येते. याचे आम्ही स्वागत करतो. पण 371 अनुच्छेदानुसार नागालँड, मेघालय, सिक्कीम, मणिपूर या ईशान्येकडील राज्यांमध्ये कुणालाच जमीन खरेदी करता येत नाही. हा अनुच्छेद रद्द करत असाल तर त्यासाठी आम्ही सहकार्य करू. पण हे सरकार 371 संदर्भात काहीही करायला तयार नाही. त्याचे कारण एकच आहे. 370च्या नावाने, पुलवामाच्या नावाने त्यांनी लोकांची दिशाभूल चालवली आहे.