शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 13 जुलै 2020 (13:45 IST)

कोरोना व्हायरस : ऑक्सिजन पुरवठा मोठं आव्हान ठरण्याची चिन्ह

सौतिक बिस्वास
एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातल्या एका हॉस्पिटलला तातडीने कोरोना व्हायरसच्या पेशंट्ससाठी अधिकच्या 200 बेड्सचा वॉर्ड सज्ज करण्यास सांगण्यात आलं.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शनचं प्रमाण झपाट्याने वाढत होतं. सेवाग्राममधल्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये 934 बेड्सची सोय आहे आणि इथे दरवर्षी सुमारे 10 लाख रुग्णांवर उपचार केले जातात.
या हॉस्पिटलमधल्या क्रिटिकल केअरमधल्या 30 बेड्ससह बहुतेक सगळ्या कोव्हिड बेड्सना पाईपद्वारे ऑक्सिजन पुरवण्यात येण्याची गरज होती. या नवीन बेड्सना तांब्याच्या पाईप्सद्वारे ऑक्सिजन सिलेंडर्सना जोडण्यासाठी या हॉस्पिटलने पुढच्या काही आठवड्यांमध्ये 30 लाखांचा खर्च केला.
या हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. एस. पी. कलंत्री सांगतात, "ते मोठं आव्हान होतं. ऑक्सिजन पाईप्सनी जोडलेले अधिकचे बेड्स सज्ज करण्यासाठी खरंतर प्लानिंगने काम करण्याची गरज असते. पण कोरोना व्हायरसच्या पेशंट्ससाठी ऑक्सिजन अतिशय महत्त्वाचा आहे."
जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोव्हिड-19च्या एकूण रुग्णांपैकी साधारण 15% लोकांची फुफ्फुसं झपाटयाने निकामी होतात आणि त्यांना श्वास घेण्यासाठी मदत लागते.
काही रुग्णांमध्ये श्वसनाचा हा त्रास दिसून येत नसला तरी त्यांच्या शरीरातली ऑक्सिजनची पातळी धोकादायकरीत्या कमी असल्याचं आढळून आलंय. याला सायलंट हायपॉक्सिया म्हणतात. यातल्या काही गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज लागते.
"जागतिक साथीच्या या काळात 'हाय फ्लो ऑक्सिजन'साठीची मागणी वाढलेली आहे," मुंबईतल्या 600 बेड्सच्या कोव्हिड रुग्णालयाचे प्रमुख डॉ. मुझ्झफरल लकडावाला सांगतात. या कोव्हिड रुग्णालयाची स्वतःची ऑक्सिजन टँक आहे.
जगभरातल्या कोव्हिड-19 च्या रुग्णसंखेत दर आठवड्याला 10 लाखांची भर पडत असताना जगभरात दररोज 6,20,000 क्युबिक मीटर ऑक्सिजनची म्हणजेच सुमारे 88,000 मोठ्या सिलेंडर्सची गरज भासणार असल्याचा WHOचा अंदाज आहे.
यापैकी जवळपास 80% पुरवठा हा मोजक्या कंपन्यांद्वारे केला जातो आणि अनेक देशांमधली ऑक्सिजनसाठीची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे.
भारतामध्ये आतापर्यंत कोव्हिडचे 7,00,000 रुग्ण आढळले असून ऑक्सिजनसाठीची मागणी वाढलेली आहे. हॉस्पिटल्स आणि केअर सेंटर्सद्वारे दररोज 1300 टन ऑक्सिजन वापरला जातो. ही साथ सुरू होण्याआधी हा वापर दररोज 900 टनांपर्यंत होता.
देशात असलेल्या काही कंपन्या हवेतून ऑक्सिजन वेगळा करून शुद्ध करतात. देशभरात अशा 500 फॅक्टरीज आहेत. एकूण ऑक्सिजन उत्पादनापैकी जवळपास 15% हा वैद्यकीय क्षेत्रात वापरला जातो. उर्वरित इंडस्ट्रीयल ऑक्सिजन हा मुख्यतंः स्टील आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये ब्लास्ट फर्नेस आणि वेल्डिंगसाठी वापरला जातो.
कंपन्यांमध्ये शुद्ध करण्यात आलेला ऑक्सिजन हा टँकर्सद्वारे द्रवरूपात हॉस्पिटलपर्यंत पोहोचवला जातो. त्यानंतर पाईपद्वारे हा ऑक्सिजन बेड्सपर्यंत पोहोचवला जातो.
स्टील आणि अॅल्युमिनियम सिलेंडर्सद्वारेही ऑक्सिजन पुरवठा करण्यात येतो. तर 'कॉन्सन्ट्रेटर्स' (Concentrators) नावाच्या पोर्टेबल मशीन्सद्वारे हवेतला ऑक्सिजन फिल्टर करून वापरणं शक्य होतं. कोव्हिड 19च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या या सगळ्या पर्यायांचा वापर केला जातोय.
भारतातली कोव्हिड 19ची पहिली केस जानेवारी महिन्यात आढळली आणि एप्रिलमध्ये प्रसार वाढू लागला. पण वैदयकीय वापरासाठीच्या ऑक्सिजन पुरवठ्याविषयीची आकडेवारी त्यावेळी उपलब्ध नव्हती.
"सिलेंडर्स आणि टँक्सद्वारे किती ऑक्सिजनपुरवठा केला जातो हे माहिती नव्हतं. आमच्याकडे किती सिलेंडर्स आहेत हे देखील माहिती नव्हतं," ऑल इंडिया इंडस्ट्रियल गॅसेस मॅनिफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष साकेत टिक्कू सांगतात.
एप्रिल महिन्यात अधिकारी आणि गॅस कंपन्यांची बैठक झाली. संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये एकही लिक्विड ऑक्सिजन फॅक्टरी नसल्याचं त्यावेळी आढळलं.
सोबतच अंदमान बेटांवर वैदयकीय ऑक्सिजन उत्पादक नसल्याचं आढळलं. इथे ऑक्सिजन सिलेंडर्स पाठवावे लागतात. तर ईशान्येकडच्या राज्यांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याचा तुटवडा आहे.
यानंतर सरकारने इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा वैद्यकीय वापर करण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही प्रकारच्या ऑक्सिजन्समध्ये फारसा फरक नसतो. पण वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन जास्त शुद्ध असतो, त्याचा पुरवठा कठोर नियमांनुसार केला जातो आणि त्याचं योग्य वितरण करावं लागतं.
याशिवाय या गॅस उत्पादकांनी एक कंट्रोल रूम सुरू केली. देशभरातल्या हॉस्पिटल्स आणि केअर सेंटर्सकडून येणारे मागणीसाठीचे कॉल्स इथे स्वीकारले जातात आणि त्यांच्यापर्यंत वेळेत पुरवठा पोहोचेल याची काळजी घेतली जाते.
पण तरीही अडचणी संपलेल्या नाहीत.
घाऊक प्रमाणात ऑक्सिजन घेणाऱ्या अनेक सरकारी हॉस्पिटल्सनी आपल्याला त्यासाठीचे पैसे दिले नसल्याची तक्रार गॅस पुरवठा करणाऱ्या अनेक लहान कंपन्यांनी केलीय. उदाहरणार्थ आसाममध्ये सरकारने गेलं वर्षभर सप्लायर्सना पैसे दिले नसल्याचं टिक्कू सांगतात. तर पैशांची चणचण झेलणाऱ्या एका मेडिकल ऑक्सिजन कंपनीने वीज बिल न भरल्याने त्यांचा वीज पुरवठा कापण्यात आला होता.
ऑक्सिजन पुरवठा नसल्याने घडलेल्या घटनेच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. ऑगस्ट 2011 मध्ये उत्तर प्रदेशातल्या सरकारी हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा कंपन्यांनी पैसे न मिळाल्याने थांबवला आणि ऑक्सिजन न मिळाल्याने 30 मुलांचा मृत्यू झाला.
"एकीकडे सरकार आम्हाला नियमित पुरवठा करायला सांगतं. आणि दुसरीकडे ते पुरवठादारांना वेळेत पैसे देत नाहीत, अगदी या जागतिक साथीच्या काळातही," टिक्कू सांगतात.
भारतात आता 3000 कोव्हिड हॉस्पिटल्स आणि केअर युनिट्समध्ये ऑक्सिजनपुरवठा असणारे 1,30,000 बेड्स असल्याचं सरकारने म्हटलंय. याशिवाय कोव्हिडवरच्या उपचारांसाठी सरकारी हॉस्पिटल्सना 50,000 व्हेंटिलेटर्स पुरवण्याचाही सरकारचा विचार आहे.
यातल्या किती ठिकाणी द्रवरूप ऑक्सिजनसाठीच्या टँक्स (Liquid Oxygen Tanks) आहेत किंवा किती ठिकाणी रुग्णांना सिलेंडर बँकमधून पाईपद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जातो हे स्पष्ट नाही. देशातल्या अनेक सरकारी हॉस्पिटल्समध्ये पाईपद्वारे ऑक्सिजन पुरवण्याची पुरेशी सोय नाही आणि ही हॉस्पिटल्स ऑक्सिजनसाठी मोठ्या सिलेंडर्सवर अवलंबून आहेत.
कोरोना व्हायरसची ही साथ आता लहान शहरांत आणि गावांतही पोहोचतेय आणि इथली आरोग्य यंत्रणा फारशी चांगली नाही. पाईपद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्याची पुरेशी सोय नसल्याने अनेक मृत्यू होण्याची भीती डॉक्टर्स व्यक्त करत आहेत.
"खरंतर आम्हाला जास्तीच्या व्हेंटिलेटर्सची गरज नाही. आम्हाला ग्रामीण भागांमध्ये ऑक्सिजनचा योग्य पुरवठा हवाय," डॉ. अतुल वर्मा सांगतात. बिहारमध्ये त्यांचं 20 बेड्सचं हॉस्पिटल आहे.
भारतामध्ये सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा करण्याची क्षमता पाच पटींनी जास्त आहे. त्यामुळे सध्यातरी ऑक्सिजनचा तुटवडा भासण्याची शक्यता नाही.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये खासगी हॉस्पिटलच्या ऑक्सिजनच्या मागणीत घट झाल्याने एकूण ऑक्सिजन पुरवठ्यात वाढ झालीय.
कोव्हिड 19च्या भीतीमुळे सध्या इतर रुग्णं उपचार वा शस्त्रक्रिया टाळत हॉस्पिटलपासून दूर रहात आहेत. "आमच्या मेडिकल ऑक्सिजन पुरवठ्यात एकूण 20% घट झालेली आहे, कारण खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झालीय," आघाडीची गॅस कंपनी असणाऱ्या लिंडे इंडिया कंपनीचे विक्री विभाग प्रमुख अनिर्बन सेन सांगतात.
कोव्हिड 19ची साथ अधिकाधिक पसरत असताना ऑक्सिजन पुरवठा असणारे बेड्स रुग्णांना उपलब्ध करून देणं हे येत्या काही आठवड्यांत आणि महिन्यांत मोठं आव्हान ठरेल.
"लहान शहरं आणि गावांत ऑक्सिजन पुरवणं एक आव्हान असणार आहे. इथल्या सोयी फारशा चांगल्या नाहीत. इथे पुरेसे सिलेंडर्स किंवा पाईप्ड ऑक्सिजन उत्पादक नाहीत आणि एकही लिक्विड ऑक्सिजन उत्पादक नाही. ही परिस्थिती कठीण असेल आणि यासाठी आता तयारी करावी लागेल."