गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 26 मार्च 2020 (14:29 IST)

कोरोना व्हायरस : आजारापेक्षा भूकच घेणार नाही ना बळी, गरिबांना वाटतेय भीती

विकास पांडे
कोरोना विषाणुचा वाढता फैलाव कमी करण्यासाठी अखेर केंद्र सरकारने संपूर्ण भारतात लॉकडाऊन घोषित केला आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली.
 
या लॉकडाउनची घोषणा करताना सर्वांनी घरातच राहण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मात्र, रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेकांसाठी जास्त दिवस घरातच थांबणं शक्य नाही.
 
भारतात मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या या मजुरांचं काय म्हणणं आहे, पुढचे 21 दिवस ते काय करतील, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आम्ही केला.
 
राजधानी दिल्लीजवळच्या नोएडा भागातला कामगार चौक रोजंदारीवर काम करणाऱ्या मंजुरांनी गजबजलेला असतो. आजूबाजूच्या परिसरातले बिल्डर इथे येऊन मजूर घेऊन जातात.
 
मात्र, रविवारी मी या चौकात गेलो तेव्हा तिथे नीरव शांतता होती. सगळीकडे शुकशुकाट. एरवी माणसांचाही आवाज नीट ऐकू येणं दुरापास्त असणाऱ्या या भागात आज पाखरांचा किलबिलाटही स्पष्ट ऐकू येत होता. माझा स्वतःचाच माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता.
 
काही वेळात मला जवळच काही माणसं दिसली.
 
मी त्यांना हाक मारली आणि सुरक्षित अंतरावरून त्यांची चौकशी केली. तुम्ही लॉकडाऊन पाळत आहात का, मी विचारलं.
 
तिथे उभे असलेले रमेश कुमार म्हणाले, "कुणी काम द्यायला येणार नाही, हे आम्हाला माहिती आहे. पण तरीही आम्ही आलोय. बघू कुणी येतं का?" रमेश कुमार मुळचे उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातले आहेत.
 
ते पुढे म्हणाले, "मी रोज 600 रुपये कमावतो आणि माझं पाच जणांचं कुटुंब आहे. काही दिवसातच आमच्या घरातलं धान्य संपेल. कोरोना विषाणुच्या धोक्याची मला कल्पना आहे. पण मी माझ्या मुलांना उपाशी बघू शकत नाही."
 
भारतातील लाखो मजुरांची हीच अवस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. याचाच अर्थ येणारे 21 दिवस त्यांना रोजगार मिळणार नाही. रोजगार नाही तर पैसे नाही आणि पैसे नाही तर घरात अन्न शिजणार नाही.
 
भारतात जवळपास 500 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर जवळपास 10 जणांचा कोव्हिड 19 आजाराने मृत्यू झाला आहे.
 
उत्तर प्रदेश, केरळ, दिल्ली यासारख्या काही राज्य सरकारांनी रमेश यांच्यासारख्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या बँक खात्यांमध्ये थेट पैसे ट्रान्सफर करण्याची घोषणा केली आहे.
 
स्वतः पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील लॉकडाऊनमुळे प्रभावित होणाऱ्या मजुरांना अर्थसहाय्य देण्याचं आश्वासन दिलं आहे.
 
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनुसार देशातले जवळपास 90 टक्के लोक सिक्युरिटी गार्ड, क्लीनर, रिक्षा चालक, रस्त्यावर दुकान लावणारे, कचरावेचक आणि मोलकरण अशा असंघटित क्षेत्रात काम करतात.
 
यातल्या अनेकांना निवृत्तीवेतन नसतं. त्यांना आजारपणाची रजा मिळत नाही की कुठल्याही प्रकारची सुट्टी मिळत नाही. त्यांचा विमाही नसतो. अनेकांची तर बँक खातीही नाही. या लोकांचा सगळा व्यवहार रोज मिळणाऱ्या रोख पैशांवर अवलंबून असतो.
 
अनेक मजूर तर स्थलांतरित असतात. म्हणजे कामानिमित्त आपलं राज्य सोडून ते परराज्यात गेलेले असतात. शिवाय भारतात अनेक समाज भटके आहेत. म्हणजे ही फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे. हे लोक कामाच्या शोधात एका शहरातून दुसऱ्या शहरात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कायम भटकंती करत असतात.
 
"सरकारमधल्या कुठल्याच व्यक्तीने असं संकट कधीच बघितलेलं नाही" आणि त्यामुळे हे फार मोठं आव्हान असल्याचं उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणतात.
 
ते म्हणतात, "दिवसागणिक परिस्थिती बदलते आहे आणि म्हणूनच सर्व सरकारांनी अत्यंत वेगाने काम करण्याची गरज आहे. गरजूंना अन्न पुरवठा करता यावा, यासाठी कम्युनिटी किचनसारख्या योजना राबवण्याची गरज आहे. कोण कुठल्या राज्याचा आहे, हे न बघता गरज असेल त्याला तांदूळ, गहू किंवा रोख पैसे देण्याची गरज आहे."
 
उत्तर प्रदेश भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे. या एकट्या राज्याची लोकसंख्या जवळपास 22 कोटी एवढी आहे.
 
अखिलेश यादव म्हणतात, "कम्युनिटी ट्रान्समिशन थांबवण्यासाठी लोकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणं थांबवलं पाहिजे आणि हे करण्याचा एक मार्ग म्हणजे अन्न सुरक्षा. संकट काळात प्रत्येकच जण आपल्या गावाकडे धाव घेत असतो."
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे की राज्य सरकारचं एक पथक परराज्यातून येणाऱ्या मजुरांवर लक्ष ठेवून आहे आणि गरज असेल त्या प्रत्येकला राज्य सरकार मदत करेल.
 
भारतीय रेल्वेने 31 मार्चपर्यंत प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.
 
मात्र, रेल्वेसेवा बंद करण्याच्या एक-दोन दिवस आधी दिल्ली, मुंबई, पुणे, अहमदाबाद यासारख्या मोठ्या शहरातून लाखोंच्या संख्येने कामगारांनी बिहार, उत्तर प्रदेशातल्या आपल्या गावांकडे धाव घेतली. त्यावेळी रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी उसळली होती.
 
या गर्दीमुळे आता गावागावातही कोरोनाचा फैलाव होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करतात. त्यामुळे येणारे दोन आठवडे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
 
मात्र, प्रत्येकालाच गावची वाट धरता आलेली नाही.
 
किशनलाल अलाहबादमध्ये रिक्षा चालवतात. गेल्या चार दिवसांपासून आपण एकही रुपया कमावलेला नाही, असं ते सांगतात.
 
ते म्हणतात, "कुटुंबाचं पोट भरण्यासाठी मला कमवावंच लागतं. सरकार आम्हाला पैसे देणार असल्याचं मी ऐकलं आहे. पण कधी आणि कसं, हे माहिती नाही."
 
किशनलाल यांचे मित्र आहेत अली हसन. अली हसन एका दुकानात क्लीनर म्हणून काम करतात. लवकरच आपल्याजवळचे पैसे संपणार असल्याचं ते सांगतात.
 
ते म्हणाले, "दोन दिवसांआधी दुकान बंद झालं आणि त्यांनी मला पैसेही दिलेले नाही. दुकान कधी उघडेल, याची काहीच कल्पना नाही. मला खूप भीती वाटतेय. माझ्या घरी बायका-पोरं आहेत. मी त्यांचं पोट कसं भरणार?"
 
भारतात अनेक जण रस्त्यावर छोटी-छोटी दुकानं मांडून गुजराण करतात. यापैकीच एक मोहम्मद साबीर. दिल्लीत दही आणि दह्यापासून बनलेल्या पेयाचं एक छोटंसं दुकान ते चालवतात. उन्हाळ्यात जास्त विक्री होते म्हणून त्यांनी काही दिवसांआधीच मदतीसाठी म्हणून आणखी दोघांना कामावर ठेवलं.
 
ते सांगतात, "आता त्यांना द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत. गावाकडे शेतीतून थोडं उत्पन्न होतं. पण यावर्षी आलेल्या चक्रीवादळामुळे पीकही गेलं. त्यामुळे आता गावात असलेलं माझं कुटुंब पैशासाठी माझ्या आशेवर आहे."
 
पीक गेलं आणि कोरोना विषाणुमुळे दुकानही बंद. त्यामुळे मोहम्मद साबीर खचून गेले आहेत. ते म्हणतात, "मला खूप असहाय्य वाटतंय. कोरोना विषाणुआधी भूकच आमच्यासारख्यांचा जीव घेईल, अशी भीती मला वाटते."
 
देशातली जवळपास सर्वच पर्यटन स्थळही बंद आहेत. याचा थेट परिणाम पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांवर झाला आहे.
 
तेजपाल कश्यप दिल्लीतील इंडिया गेटजवळ फोटोग्राफर आहेत. अशी परिस्थिती यापूर्वी कधीही आली नव्हती, असं तेजपाल सांगतात.
 
ते म्हणतात, "लॉकडाऊन नसूनही गेले दोन आठवडे खूप वाईट गेले. कुणीच पर्यटक इथे आले नाही. आता तर मी माझ्या गावी जाऊ शकत नाही आणि कामही करू शकत नाही. मी इकडे दिल्लीत अडकलो आहे आणि उत्तर प्रदेशातल्या गावात असलेल्या माझ्या कुटुंबाची मला काळजी वाटतेय."
 
ओला, उबर सारख्या कॅब सर्विसमध्ये ड्रायव्हर असणाऱ्यांनाही मोठा फटका बसतोय.
 
दिल्लीत एका विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्याचं काम करणारे ड्रायव्हर जोगिंदर चौधरी म्हणतात, 'सरकारने आमच्यासारख्या लोकांना काही मदत करायला हवी.'
 
जोगिंदर सांगतात, "लॉकडाऊनचं महत्त्व मला कळतं. कोरोना विषाणू घातक आहे आणि आपण सर्वांनीच स्वतःची काळजी घेतली पाहिजे. मात्र, लॉकडाऊन अनेक दिवस सुरू राहिला तर मी माझ्या कुटुंबाला कशी मदत करणार, हे मला कळत नाहीय."
 
काहींनी तर कोरोना विषाणुविषयी ऐकलं सुद्धा नाहीय.
 
रेल्वे स्थानकात शू पॉलीश करणाऱ्या एका व्यक्तीशी आम्ही बोललो. त्यांनी स्वतःचं नाव सांगितलं नाही. ते म्हणाले, "मी गेली कित्येक वर्ष अलाहबाद स्टेशनवर शू पॉलीश करतोय. पण आता लोक येतच नाहीत."
 
लोकांनी प्रवास करणं का बंद केलं, हेदेखील आपल्याला माहिती नसल्याचं ते सागंतात.
 
ते म्हणाले, "काय घडतंय, मला माहिती नाही. गेले काही दिवस स्टेशनवर लोक दिसतच नाहीत. काहीतरी कर्फ्यू लागला आहे, हे मला माहिती आहे. पण का, ते माहिती नाही."
 
आम्ही बोलत असताना जवळच बाटलीबंद पाणी विकणारे विनोद प्रजापती तिथे आले.
 
ते म्हणाले, "मला कोरोना विषाणुबद्दल सगळं माहिती आहे. तो खूप घातक आहे. संपूर्ण जगात त्याची दहशत आहे. ज्यांना परवडणारं आहे किंवा ज्यांची घरं आहेत ते सगळे घरातच आहेत. पण आमच्यासारख्या लोकांना दोनपैकी एकच पर्याय निवडायचा आहे. सुरक्षा किंवा भूक. आम्ही कोणता पर्याय निवडावा?"
 
विनोद प्रजापतींचा हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे.