शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 26 मार्च 2020 (14:24 IST)

कोरोना व्हायरस : ‘डॉक्टर म्हणतात, सर्दी-खोकल्याचे पेशंट असतील तर इथं आणू नका’

श्रीकांत बंगाळे
"माझ्या भावाच्या मुलीला सर्दी आणि खोकला असल्यामुळे मी तिला गावातल्या खासगी डॉक्टरांकडे घेऊन गेलो, तेव्हा त्यांनी तपासणी करण्यास नकार दिला."
 
कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे ग्रामीण भागातील खासगी डॉक्टर रुग्णांची तपासणी करण्यास नकार देत असल्याची उदाहरणं समोर येत आहेत.
 
सोपान कांबळे नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातल्या सुगावमध्ये राहतात. त्यांच्या पुतणीला सर्दी-खोकला असल्यामुळे ते तिला गावातल्या खासगी डॉक्टरांकडे घेऊन गेले.
 
"दोन दिवसांपासून माझ्या पुतणीला सर्दी-खोकला आहे. पहिले गावातील डॉक्टर घरी येऊन पेशंटला तपासायचे, आता मात्र कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे ते घरी येत नाहीत. त्यामुळे बुधवारी सकाळी मी माझ्या पुतणीला दवाखान्यात घेऊन गेलो. त्यावेळेस डॉक्टर म्हणाले की, सर्दी-खोकल्याचे पेशंट असतील तर त्यांना इथं आणू नका. दवाखाना बंद आहे."
 
पण, सरकारने तर तुम्हाला पेशंट तपासण्याची परवानगी दिली आहे, सोपान यांच्या या प्रश्नावर डॉक्टर म्हणाले, "आम्ही सध्या पेशंट तपासणार नाही. आम्हालाही आमच्या फॅमिलीचं बघावं लागतं."
 
यानंतर डॉक्टरांनी चेकअप न करताच औषधं लिहून दिल्याचं सोपान सांगतात.
 
सोपान हे काही एकटे नाहीत, ज्यांना या अनुभवाला सामोरं जावं लागलं. पुणे जिल्ह्यातल्या नारायणगाव तालुक्यातील मानिकडोह येथील दत्तात्रय भोर यांनाही असाच अनुभव आला.
 
आपल्या भावजयीची तब्येत ठीक नसल्यानं ते चेकअपसाठी गावाहून 18 किलोमीटर अंतरावरील नारायणगावला आले.
 
"तुमच्या भावजयीला टायफाईड झाला आहे, पुढच्या उपचारासाठी त्यांना नारायणगावला घेऊन जा, असं गावातल्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे मग आम्ही नारायणगावला आलो. इथं आलो तर इथले डॉक्टर लोक पेशंटला हातसुद्धा लावायला तयार नाहीत. आम्ही पेशंटला तपासू शकत नाहीत, असं ते लांबूनच सांगत आहेत. नारायणगावमधल्या दोन दवाखान्यांत आम्हाला हाच अनुभव आला."
 
त्यानंतर दत्तात्रय यांनी भावजयीला नारायणगावपासून 45 किलोमीटर अंतरावरील चाकणच्या दवाखान्यात अॅडमिट केलं.
 
"नारायणगावहून एका खासगी अॅम्बुलन्समध्ये आम्ही पेशंटला चाकणला घेऊन आलो. त्यासाठी आम्हाला 2 हजार रुपये मोजावे लागले. सध्या चाकणमधल्या दवाखान्यात पेशंटवर उपचार सुरू आहेत," दत्तात्रय यांनी पुढे सांगितलं.
 
'दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश'
 
पुणे आणि नांदेड जिल्ह्यातील ग्रामस्थांच्या या तक्रारींविषयी आम्ही संबंधित जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
 
खासगी डॉक्टरांना दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत, असं पुण्याचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी बीबीसीला सांगितलं.
 
ते म्हणाले, "ग्रामीण भागातले काही खासगी डॉक्टर रुग्णांना तपासत नसल्याचं समोर आल्यानंतर या डॉक्टरांना दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एखादा रुग्ण संशयित वाटला, तर त्याला आपल्या भागातील सरकारी डॉक्टरांकडे रेफर करा, असंही त्यांना सांगितलं आहे."
 
तर नांदेडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एम. शिंदे यांनी बीबीसीला सांगितलं, "ग्रामीण भागातल्या खासगी डॉक्टरांनी ओपीडी चालू ठेवल्याच पाहिजेत, तसं पत्रकच जिल्हाधिकाऱ्यांनी काढलं आहे. कोरोनाच्या भीतीमुळे एखादा डॉक्टर ओपीडी बंद ठेवत असल्याची तक्रार आली आणि त्यात तथ्य आढळल्यास संबंधित डॉक्टरांचा परवाना रद्द केला जाईल."
 
...तर डॉक्टरवर कारवाई - आरोग्य राज्यमंत्री
 
ग्रामीण भागातील डॉक्टर रुग्णांची तपासणी करण्यात टाळाटाळ करत असल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील, असं मत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं.
 
ते म्हणाले, "ग्रामीण भागातील खासगी डॉक्टर उत्तम काम करत आहेत. पण, काही डॉक्टर असे आहेत, जे रुग्णांची तपासणी करण्यास टाळाटाळ करत आहेत, यासंबंधीच्या तक्रारीही आमच्याकडे आल्या आहेत. यामागे कोरोना व्हायरसची भीती असेल किंवा इतर कोणती कारणं असतील, तरीही गावातील नागरिकांना ताप, सर्दी, खोकला जाणवत असल्यास त्यांचं चेकअप करण्यात यावं, अशा सूचना राज्यातील सगळ्या खासगी डॉक्टरांना दिलेल्या आहेत."
 
"तरीसुद्धा एखादा डॉक्टर टाळाटाळ करत असेल, तर आम्ही ग्रामीण भागातील नागरिकांना आवाहन करतो की, संबंधित डॉक्टरची माहिती जिल्ह्यातील सिव्हिल सर्जनकडे द्यावी, या माहितीत तथ्य आढळल्यास डॉक्टरवर कारवाई करण्यात येईल. त्यांचा परवाना रद्द केला जाईल."