शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (13:03 IST)

Cyclone Gulab: बंगालच्या उपसागरातल्या चक्रीवादळानं महाराष्ट्रात एवढा पाऊस का पाडला?

- जान्हवी मुळे
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरचं मुंबई आणि पूर्व किनाऱ्यावरचं कलिंगपटनम. ही दोन शहरं एकमेकांपासून तब्बल तेराशे किलोमीटर दूर आहेत.
 
तरीही कलंगपटनमजवळ जमिनीवर आदळलेल्या गुलाब चक्रीवादळानं मुंबईला झोडपून काढलं. त्यामुळे शहरात 24 तासांत अनेक ठिकाणी 90 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली.
 
वाटेत महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक भागाला या वादळाचा तडाखा बसला. विदर्भ आणि मराठवाड्यात तर नद्यांना मोठे पूर आले. ठिकठिकाणी पिकांचं नुकसान झालं आणि जीवितहानीही झाली. खरंतर विदर्भापर्यंत पोहोचेपर्यंत या वादळाची तीव्रता कमी झाली, मात्र तरीही एवढा पाऊस का पडला?
 
अगदी गुजरातमध्येही हेच चित्र होतं. सामान्यतः समुद्रातून जमिनीवर आलेल्या चक्रीवादळांची गुजरातला सवय आहे. मात्र यावेळी एक कमी दाबाचं क्षेत्र जमिनीवरून समुद्राकडे सरकताना दिसलं.
 
साहजिकच मग प्रश्न पडतो, असं अनियमित हवामान का पाहायला मिळत आहे? किनाऱ्यापासून एवढ्या दूरवर चक्रीवादळांचा प्रभाव का जाणवतो आहे?
 
क्लायमेट चेंज आणि चक्रीवादळाचा संबंध
याआधी, मे महिन्यात तौक्ते चक्रीवादळादरम्यानही हेच पाहायला मिळालं. त्या चक्रीवादळानं आधी केरळपासून गुजरातपर्यंत पश्चिम किनारपट्टीला झोडपून काढलं होतं.
 
मग 'तौक्ते'च्या अवशेषांनी थेट दिल्लीपर्यंत पाऊस पाडला. भर उन्हाळ्यात दिल्लीचं तापमान तेव्हा 16 अंशांपर्यंत खाली आलं होतं. जमिनीला धडकल्यानंतर अठरा तासांपर्यंत या वादळाचा जोर कायम होता.
 
गुलाब चक्रीवादळानं तर भारताच्या दोन्ही किनाऱ्यांवर पाऊस पाडला.
 
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजीमधले हवामान शास्त्रज्ञ रॉक्सी कोल यांना आम्ही त्यामागचं कारण विचारलं.
 
कोल सांगतात, "एखादं चक्रीवादळ जमिनीवर धडकतं तेव्हा त्याचा जोर कमी होतो. कारण वादळाला समुद्रातून मिळणारं बाष्प आणि उष्णता कमी होते. त्यामुळेच वादळ निवळतं, शमतं."
 
"आजवरच्या अभ्यासातून हे स्पष्ट झालं आहे की क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदलामुळे समुद्राचं तापमान वाढलं आहे आणि त्यामुळे चक्रीवादळातील बाष्पाचं प्रमाण वाढलं आहे. अटलांटिक महासागरात हे स्पष्टपणे दिसून आलं आहे आणि हिंद महासागरातील प्राथमिक संशोधनातही असेच संकेत मिळत आहेत."
 
"महासागरांचं तापमान जसं वाढत आहे, तसं वाढत्या बाष्पामुळे चक्रीवादळांना अधिक उर्जा मिळते आहे. जमिनीवर आदळल्यावर त्यांची तीव्रता कमी होत असली, तरी ते भौगोलिक परिस्थितीनुसार मोठ्या प्रदेशात पाऊस पाडू शकतात."
 
गुलाब चक्रीवादळाच्या बाबतीत काहीसं असंच झालं आहे.
 
मान्सूनच्या काळातलं चक्रीवादळ
गुलाब चक्रीवादळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मान्सूनच्या परतीच्या काळात हे वादळ आलं. असं फारच क्वचित घडत असल्याचं रॉक्सी कोल सांगतात.
 
"मान्सूनच्या काळातली परिस्थिती चक्रीवादळाला पूरक नसते. कारण या काळात वातावरणाच्या खालच्या स्तरात एका दिशेनं आणि वरच्या स्तरात दुसऱ्या दिशेनं असे वारे वाहात असतात. ते वारे चक्रीवादळाच्या उभ्या दिशेनं वाहणाऱ्या वाऱ्यांना टिकू देत नाहीत. "
 
त्यामुळेच मॉन्सूनच्या काळात कधी चक्रीवादळं येताना दिसत नाहीत. पण गेल्या काही वर्षांत मॉन्सून येण्याचा काळ (Monsoon Onset) आणि परतीचा काळ (Monsoon recall) या दिवसांच्या जवळ चक्रीवादळं तयार होऊ लागली आहेतच.
यंदा 14 मे रोजी अरबी समुद्रात तौक्ते आणि 26 सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात गुलाब अशी दोन चक्रीवादळं मान्सूनच्या आसपास भारताच्या किनाऱ्यावर थडकली.
 
'गुलाब'चं 'शाहीन' चक्रीवादळात रुपांतर?
याआधी 2018 साली 'गजा' या चक्रीवादळानं बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत प्रवास केला होता. अर्थात तोवर त्याची तीव्रता बरीच कमी झाली होती.
 
तर 1984 सालीही पाँडिचेरीजवळ तयार झालेल्या एका चक्रीवादळानं पुढे अरबी समुद्रात प्रवेश करून थेट सोमालियापर्यंत प्रवास केला होता.
 
गुलाब चक्रीवादळाचे वादळाचे अवशेष आता पुन्हा समुद्रात शिरल्यावर आता या कमी दाबाच्या क्षेत्राला बाष्प आणि उष्णता मिळून त्याचं दुसऱ्या वादळातही रुपांतर होऊ शकतं, अशी शक्यता भारतीय हवामान खात्यानंही वर्तवली आहे.
 
गुलाब चक्रीवादळाचे कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष सध्या दक्षिण गुजरात आणि खंबातचे आखातवर असून 30 सप्टेंबरला पहाटे ते उत्तर-पूर्व अरबी समुद्रात डिप्रेशन बनण्याची आणि त्यानंतरच्या 24 तासांत त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाचे वैज्ञानिक के.एस होसळीकर यांनी सांगितलं आहे. हे वादळ पुढे पाकिस्तान-माकरान किनारपट्टीकडे सरकेल.
 
अशा पद्धतीनं एका वादळातून दुसरं वादळ किंवा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत.
 
2019 साली फिलिपिन्सजवळ पॅसिफिक महासागरात जन्मलेल्या मात्मो वादळाच्या अवशेषातूनच बंगालच्या उपसागरात पुढे 'बुलबुल' चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. त्या वादळाचा तडाखा बांगलादेशासह भारतात बंगाल आणि ओडिसालाही बसला होता.
 
गुलाब चक्रीवादळाचे अवशेष पाहता, ही 'वेदर सिस्टिम' 2000 किलोमीटरचा प्रवास करण्याची शक्यता आहे.
 
चक्रीवादळं किती मोठं अंतर पार करतात?
लांब अंतरावर प्रवास करणारी चक्रीवादळं किंवा कमी दाबाचे पट्टे यांच्याविषयी बोलताना हरिकेन-टायफून जॉनचा उल्लेख करायलाच हवा. 1994 साली या वादळानं पॅसिफिक महासागरात तेरा हजार किलोमीटर्सचा प्रवास केला होता.
 
एखाद्या चक्रीवादळानं असं मोठं अंतर कापणं किंवा जमिनीचा एखादा भाग ओलांडून पलिकडच्या दुसऱ्या समुद्रात प्रवेश करणं ही गोष्ट तशी नवी नाही. पण भारतात असं सर्रास होताना दिसत नाही.
 
इथे एक लक्षात घ्यायला हवं, की बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र हे एकाच महासागराचे, हिंद महासागराचे भाग आहेत. पण हिंद महासागरही इतर महासागरांशी जोडला गेला आहे आणि तिथल्या घडामोडींचाही भारतातल्या हवामानावर परिणाम होत असतो.
अनेकदा साऊथ चायना समुद्रातून आणि पश्चिम पॅसिफिक महासागराच्या क्षेत्रात उसळलेल्या चक्रीवादळांचे अवशेष बंगालच्या उपसागरात प्रवेश करतात आणि परिस्थिती पूरक असेल तर त्यांचं चक्रीवादळात उदाहरण होतं.
 
गुलाब चक्रीवादळाचा उगमही असाच झाल्याचं हवामान अभ्यासक सांगतात.
 
युकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ रिडींगमधले हवामान संशोधक अक्षय देवरस सांगतात, "गुलाब चक्रीवादळाचा जन्म सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर पॅसिफिक महासागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रातून झाला. पश्चिमेकडे प्रवास करत हा कमी दाबाचा पट्टा 24 सप्टेंबरच्या आसपास बंगालच्या उपसागरात पोहोचला आणि पुढे त्याचं चक्रीवादळात रुपांतर झालं."
 
'गुलाब' चक्रीवादळातून काय शिकायचं?
गुलाब चक्रीवादळानं आणखी एक गोष्ट नमूद केल्याचं अक्षय सांगतात. "साधारणपणे लोकांचा असा गैरसमज असतो की हवामानातील सगळ्या घटनांचा उगम स्थानिक पातळीवर होत असतो. पण हवामानशास्त्रामध्ये एक संकल्पना आहे. टेलीकनेक्शन पॅटर्न - ज्यात एखाद्या ठिकाणी होणाऱ्या हवामानाच्या घटनेचा परिणाम हजारो किलोमीटर दूरपर्यंत पाहायला मिळतो. "
 
पॅसिफिक महासागरतील परिस्थितीचा एरवीही मान्सूनवर परिणाम होत असतो, याकडे अक्षय लक्ष वेधतात. त्या प्रदेशातील विशेषतः साऊथ चायना समुद्रातील घडामोडींचा भारताच्या हवामानाशी संबंध आहे. त्यावर अधिक बारकाईनं अभ्यास व्हायला हवा, असं तज्ज्ञांना वाटतं.
 
रॉक्सी कोल सांगतात, "भारत तीन बाजूंनी समुद्रानं वेढलेला देश आहे. इथे सतत कमी आणि जास्त दाबाचे पट्टे तयार होत असतात आणि त्यांचा समुद्र सुदूर महासागरातील परिस्थितीशी असतो. फक्त भारतापुरता नाही, तर जगाच्या हवामानावर लक्ष ठेवणं म्हणूनच महत्त्वाचं आहे. या कामी उपग्रह पुरेसे ठरत नाही, तर महासागरांतील परिस्थितीचा अभ्यास करणाऱ्या उपकरणांचा वापर वाढवणं गरजेचं आहे."
 
महासागरांचं तापमान जसं वाढत जाईल, तशी चक्रीवादळासारख्या घटनांची तीव्रता, वारंवारता आणि नुकसान करण्याची क्षमता वाढत जाईल, असं अनेक संशोधनांतून आधीच समोर आलं आहे.
 
अशा घटनांचा सामना करू शकणारी व्यवस्था उभी करणं, तंत्रज्ञान विकसित करणं आणि शेतीच्या पद्धतींमध्ये बदल करणं त्यामुळेच महत्त्वाचं आहे. तसंच हवामान बदलाचा वेग कमी कसा करता येईल हे पाहणंही गरजेचं आहे.