मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (09:02 IST)

Heart Attack आल्यानंतर पहिला तास महत्त्वाचा का? त्याला ‘गोल्डन अवर’ का म्हणतात?

हार्ट अॅटॅक आल्यानंतरच्या पहिला तासाला डॉक्टर 'गोल्डन अवर' म्हणतात. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आणि रिकव्हरीसाठी हा एक तास अत्यंत महत्त्वाचा ठरतो.सोप्या शब्दात सांगायचं तर हार्ट अॅटॅकची लक्षणं दिसताच रुग्णाला पहिल्या तासात वेळेवर आणि योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो.
 
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार,भारतात 2019 मध्ये 28,000 पेक्षा जास्त लोकांचा हार्ट अॅटॅकमुळे मृत्यू झाला. हृदयरोगतज्ज्ञ सांगतात, स्ट्रेस, बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे भारतात वयाच्या तिशीत किंवा चाळीशीत युवांना हार्ट अॅटॅक येण्याचं प्रमाण वाढलंय.
 
मग 'गोल्डन अवर' म्हणजे काय? या पहिल्या एका तासात कुटुंबियांनी काय केलं पाहिजे? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
पहिल्या तासाला 'गोल्डन अवर' का म्हणतात?
हार्ट अॅटॅक ची लक्षणं दिसू लागताच पहिला एक तास म्हणजे 'गोल्डन अवर'.
 
हार्ट अॅटॅक अत्यंत तीव्र असो किंवा माईल्ड (मध्यम) स्वरूपाचा. पहिल्या तासात रुग्णाची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि गंभीर असते. यावेळेत योग्य उपचार मिळाले. तर रुग्णांचा जीव वाचू शकतो.
 
मुंबईतील व्हॉकार्ट रुग्णालयाचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नईम हसनफट्टा सांगतात, "हार्ट अॅटॅकची लक्षणं दिसू लागल्यानंतर तात्काळ उपचार झाले पाहिजेत, अजिबात उशीर करू नये. जेणेकरून उपचारांचा जास्तीत-जास्त फायदा रुग्णांना मिळू शकेल."
 
पहिल्या एका तासात रुग्णांवर योग्य उपचार झाले नाहीत. तर, जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता खूप जास्त वाढते.त्यामुळे,लक्षणं दिसू लागल्यानंतर तात्काळ रुग्णालयात जावं, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.त्यामुळे, हार्ट अॅटॅक आल्यानंतर पहिल्या तासाला हृदयरोगतज्ज्ञ 'गोल्डन अवर' म्हणतात.
 
का महत्त्वाचा आहे 'गोल्डन अवर'?
डॉ. विवेक महाजन फोर्टीस रुग्णालयात इंटरव्हेन्शनल कार्डियोलॉजिस्ट म्हणून वैद्यकीय सेवा देतात. रुग्णांसाठी गोल्डन अवर किती महत्त्वाचा आहे याबाबत त्यांनी माहिती दिली.
 
ते म्हणतात, "हृदयाच्या रक्तवाहिनीत निर्माण झालेला अडथळा पहिल्या तासातच मोकळा करण्यात आला. तर, हार्ट अॅटॅक रिव्हर्स करू शकतो. हृदयाला कायमची इजा होण्यापासून थांबवू शकतो."हृदयाच्या रक्तवाहिन्यात अडथळा निर्माण झाला किंवा रक्तप्रवाह ब्लॉक झाला, तर हार्ट अॅटॅक येतो.
 
नानावटी रुग्णालयाचे कार्डियोलॉजिस्ट डॉ. सुशांत पाटील म्हणतात, "हृदयाला रक्तपुरवठा न झाल्याने हृदयाचे स्नायू 80-90 मिनिटांनी हळूहळू मृत पावण्यास सुरूवात होते. उपचारासाठी उशीर झाला तर हृदयाचे ठोसे अनियमित होतात. स्नायू कुमकुवत होण्यास सुरूवात होते."हार्ट अॅटॅकनंतर उपचाराला उशीर झाला. तर, हृदयाच्या स्नायूंना कायमची इजा होते. हृदय कमकुवत होतं आणि हृदयाची कायमची हानी होते.
 
हृदय कमकुवत झालं तर हार्टफेल झाल्याने कार्डिअॅक अरेस्ट येण्याची शक्यता असते. त्यामुळे हार्ट अॅटॅक आलेल्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी 'गोल्डन अवर' अत्यंत महत्त्वाचा आहे.
 
डॉ. हसनफट्टा पुढे सांगतात, "हार्ट अॅटॅक आलेल्या रुग्णांवर तात्काळ अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली पाहिजे. पहिल्या 15-20 मिनिटात शरीरात तयार झालेल्या गुठळ्या विरघळण्यासाठी औषध दिलं पाहिजे."
 
'गोल्डन अवर'मध्ये नातेवाईकांनी काय करावं?
हृदयरोगाचा झटका आल्यानंतर सर्वात महत्त्वाची भूमिका नातेवाईकांची आणि कुटुंबातील व्यक्तीची असते.
 
डॉ. विवेक महाजन या 'गोल्डन अवर'मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी काय करावं याची माहिती दिली.
 
* छातीत दुखू लागल्यानंतर नातेवाईकांनी क्षणाचाही वेळ घालवू नये
* तातडीने जवळच्या रुग्णालयात पोहोचून ECG काढावा.
* छातीत दुखण्याला अॅसिडीटी समजून घरच्या-घरी उपचार करू नयेत.

डॉ. नईम हसनफट्टा म्हणाले, रुग्णाला तात्काळ अॅस्प्रिनची गोळी चघळण्यासाठी देण्यात यावी आणि डॉक्टरांकडे न्यावं.तज्ज्ञ म्हणतात, छातीत दुखण्याची तीव्रता कमी आहे का जास्त यावर नातेवाईकांनी रुग्णालयात किंवा डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेऊ नये.* रुग्णाच्या छातीत अचानक दुखू लागलं तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.
 
ही आहेत हार्ट अॅटॅकची लक्षणं
तज्ज्ञ सांगतात, गोल्डन अवरमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हार्ट अॅटॅकची लक्षणं ओळखणं.
 
* श्वास घेण्यास त्रास
* खूप थकवा येणं
* हृदयाचे ठोके अनियमित किंवा खूप जास्त जोरात होणं
* अचानक खूप वजन कमी होणं

हार्ट अॅटॅक आल्यानंतर CPR का महत्त्वाचा आहे?
हार्ट अॅटॅक आलेल्या व्यक्तीचं हृदय अचानक बंद पडतं आणि तो व्यक्ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतो. अशा व्यक्तीला योग्य वेळी CPR दिल्यास जीव वाचू शकतो.वैद्यकीय भाषेत CPR ला कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन म्हणतात.
 
टीव्ही किंवा सोशल मीडियावर तुम्ही अनेक दृष्य पाहिली असतील. ज्यामध्ये हार्ट अटॅकमुळे अचानक बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीच्या छातीवर दोन्ही हातांच्या मदतीने लोक दबाव देतात. या प्रक्रियाला कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन असं म्हटलं जातं.
 
हृदयरोगतज्ज्ञ म्हणतात, हार्ट अटॅकचे 50 टक्के मृत्यू रुग्णालयात वेळेवर न पोहोचल्याने होतात. कार्डिअॅक अरेस्टमुळे रुग्णांचा मृत्यू होतो. कार्डिअॅक अरेस्ट आलेल्या रुग्णांसाठी CPR अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
 
डॉ. महाजन पुढे सांगतात, "कार्डिअॅक अरेस्ट आलेल्या रुग्णाला CPR वेळेत दिला गेला.तर, लोकांचे प्राण वाचवणं शक्य आहे.रुग्णाला रुग्णालयात हलवताना CPR देण्यात आला पाहिजे."
 
मेंदू आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांना CPR दिल्यामुळे रक्तप्रवाह सुरू रहातो.
 
मधुमेहाच्या रुग्णांना हार्ट अॅटॅक आल्यास काय काळजी घ्यावी?
डायबिटीसग्रस्त रुग्णांना अनेकवेळा हार्ट अॅटॅकची लक्षणं दिसून येत नाहीत. याचं कारण, सामान्यांना हार्ट अॅटॅक येताना दिसून येणारी लक्षणं मधुमेहींमध्ये दिसून येत नाहीत.
 
डॉ. सुशांत पाटील म्हणाले, "मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांना (नर्व्ह) इजा झालेली असते. त्यामुळे हार्ट अॅटॅक ओळखणं कठीण होतं."मधुमेह आणि हायरिस्क रुग्णांनी ज्यांना श्वास घेण्यासंबंधीचा त्रास असतो. अशा रुग्णांनी रक्तवाहिन्यातील ब्लॉकेज शोधण्यासाठी कॉरोनरी आर्टरीचं (धमनी) सीटी स्कॅन, कार्डिअॅक स्ट्रेस टेस्ट करून घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
डॉ. महाजन पुढे सांगतात, "मधुमेहींमध्ये काहीवेळी पोट अचानक मोठं होणं, विकनेस किंवा गरगरण्यासारखी हार्ट अटॅकची लक्षणं दिसून येतात." त्यासाठी मधुमेहानेग्रस्त रुग्णांनी शरीरातील सारखेचं प्रमाण, रक्तदाब आणि इतर महत्त्वाच्या चाचण्या वेळोवेळी करायला हव्यात, तज्ज्ञ म्हणतात.
 
वयोवृद्ध लोक आणि महिलांमध्येही हार्ट अॅटॅकची लक्षणं सारखीच दिसून येत नाहीत. डॉ. नईम पुढे म्हणाले, "याला सायलेंट हार्ट अॅटॅक म्हणतात. जो सहजरित्या ओळखता येत नाही."
 
'गोल्डन अवर'मध्ये रुग्णालयात आल्यामुळे जीव वाचला
मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागात रुग्णवाहिका चोवीस तास उपलब्ध असतात. पण, दुर्गम आणि ग्रामीण भागात ही परिस्थिती नसते. ग्रामीण भागात अनेकवेळा रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाचा मृत्यू होतो.
 
डॉ. विपीन खडसे जळगावच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात सर्जरी विभागात शिक्षण घेत आहेत. पण, आदिवासी दुर्गम मेळघाटात हार्ट अटॅक आलेल्या एका रुग्णाचा 'गोल्डन अवर'मध्ये रुग्णालयात आल्यामुळे जीव कसा वाचला याची ते माहिती देतात.
 
ते म्हणाले, "मेळघाटात वैद्यकीय सेवा देत असताना एका 70 वर्षाच्या रुग्णाला त्याचे नातेवाईक 60 किलोमीटर लांबून मोटर सायकलवरून रुग्णालयात घेऊन आले. रुग्णाला हार्ट अॅटॅक आला होता. पण, वेळेत रुग्णालयात पोहोचल्याने त्याचा जीव वाचवता आला."
 
या रुग्णाच्या नातेवाईकांनी क्षणाचाही वेळ न घालवता तात्काळ रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतल्याने रुग्णाचा जीव वाचला.
 
डॉ. विपीन यांनी पुढे सांगितलं, "बऱ्याचवेळा ग्रामीण भागातील लोक सुविधा नसल्याने रुग्णालयात पोहोचू शकत नाहीत. रुग्णांना घरीच ठेऊन उपचार करतात. रुग्ण वेळेत रुग्णालयात पोहोचला नसता, तर त्याच्या जीवावर बेतलं असतं."