शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

यंदासुद्धा माऊलींच्या पालखीत धारकरी चालणारच, संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यांचा निर्धार

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुण्यात दाखल होत आहे. पालखी पुण्यात आल्यानंतर त्यापुढे धारकरी चालतात. गेल्या काही वर्षांतच या गोष्टीला सुरुवात झाली आहे. हातात तलवारी घेतलेले हे 'धारकरी' म्हणजे श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते असतात. यंदा मात्र पालखीपुढे धारकऱ्यांनी चालण्याच्या प्रकाराला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. हा वादग्रस्त प्रकार टाळण्यासाठी यंदा आळंदी संस्थानाने खबरदारीचा उपाय म्हणून संभाजी भिडे यांच्या संस्थेच्या लोकांना पालखीत चालण्याची परवानगी देऊ नये, अस पत्र पुणे पोलिसांना लिहिलं होतं.
 
'वारकरी-धारकरी संगम होणारच!'
श्री शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांनी मात्र ही गोष्ट फेटाळून लावली आहे. बीबीसी मराठीशी बोलताना नितीन चौगुले यांनी म्हटलं, की कोणत्याही संस्थानानं पुणे पोलिसांना अजूनतरी कोणतंही पत्र पाठवलेलं नाहीये. त्यांना पत्र कुठे आहे, हे विचारा ना! उलट सर्व मंडळांनी आमच्या या धारकरी परंपरेचं स्वागत केलं आहे.
 
"संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पाच वर्षे हा उपक्रम चालू आहे. वारकरी आणि धारकरी यांच्या कोणताही भेद नसून उलट या उपक्रमास वारकर्‍यांमधील प्रमुखांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. 26 जून या दिवशी होणार्‍या भक्तीगंगा-शक्तीगंगा अर्थात वारकरी-धारकरी संगम कार्यक्रमास पोलिसांनी कोणत्याही प्रकारची मनाई केलेली नाही. त्यामुळे भक्तीगंगा-शक्तीगंगा कार्यक्रम नियोजनाप्रमाणेच उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात होणारच आहे," असा विश्वास नितीन चौगुले यांनी व्यक्त केला आहे.
 
काय आहे नेमकं प्रकरण?
पुणे शहरात आधी तुकाराम महाराजांची पालखी दाखल होते. त्यांच्यापाठोपाठ संताजी महाराज जगनाडे, गवर शेठ वाणी, ज्ञानेश्वर महाराज अशा क्रमानं इतर पालख्या प्रवेश करतात.
 
ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यातील प्रत्येक दिंडीचा क्रमांक आणि क्रम ठरलेला आहे. या शिस्तीचा भंग करून अन्य कोणत्याही संस्थेला अथवा संघटनेला सोहळ्यात अनाहूतपणे चालण्याची अनुमती पोलिसांनी देऊ नये, अशी आळंदी संस्थानाची भूमिका सुरुवातीपासून राहिली आहे.
 
मात्र 2017 साली काही धारकरी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर शिवाजी नगर ते डेक्कनच्या संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत चालले. त्यावरून पालखी सोहळा प्रमुखांनी 'आम्ही पालखी पुढे नेणार नाही,' अशी भूमिका घेतली. अखेरीस डेक्कन पोलिसांनी भिडेंविरोधात तक्रार दाखल केली होती. मागील वर्षी म्हणजे 2018 साली मात्र भिडे हे पालखी निघून गेल्यानंतर संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत चालत गेले आणि तिथे त्यांनी एक छोटी सभा घेतली होती.


 
भिडेंना विरोध का?
भिडे हे आपल्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांसाठी ओळखले जातात. 1 जानेवारी 2018 ला पुण्याजवळील भीमा कोरेगावात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून ते अधिकच चर्चेत राहिले आहेत.
 
"वारकरी विचार हा समन्वयवादी आहे. तिथे विवेकावर भर आहे. एकांगी, टोकाचा विचार आणि तशी भूमिका संतांच्या शिकवणीशी विसंगत आहे. त्यामुळे संतांच्या शिकवणीशी विसंगत अशा विचारसरणीचे लोक अनाहूतपणे सोहळ्यात समाविष्ट झाले तर विपरीत संदेश जाऊ शकतो. हे टाळण्यासाठी संस्थानाची ही भूमिका आहे," असं ज्ञानेश्वर माऊली संस्थानाचे विश्वस्त अभय टिळक यांनी सांगितलं.
 
वारकरी संप्रदायात हिंदू आहेत. पण वारकरी संप्रदाय हा फक्त हिंदूंचाच नाहीये, असंही त्यांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकाराबद्दल बोलताना पुणे पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) मितेश घट्टे यांनी सांगितलं, "संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वर्षानुवर्षे सुरू असलेल्या परंपरा यापुढेही कायम राहतील. त्यात नवीन पायंडे पाडण्याचा प्रयत्न करू नये."