बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

स्मार्टफोनच्या वापरामुळे आपलं शरीर अशक्त होत आहे का?

- जारिया गॉर्वेट
नव्या काळातलं राहणीमान फक्त आपल्या दिनमानावरच प्रभाव टाकत नाहीये. तर आपल्या शरीराची रचना देखील आपल्या राहणीमानामुळे बदलत असल्याचं दिसत आहे. नव्या संशोधनात असं कळलंय की कवटीच्या मागच्या भागात एक खिळ्यासारखं हाड तयार होत आहे आणि आपल्या कोपराचं हाड हे अशक्त होत आहे. शरीराच्या हाडातले हे बदल आश्चर्यकारक आहेत.
 
प्रत्येक मानवाच्या शरीराची रचना ही त्याच्या डीएनएनुसार असते. पण धकाधकीच्या जीवनामुळे मानवाच्या शरीरात बदल होत असल्याचं वैज्ञानिक सांगत आहेत.
 
हाडांच्या रचनेवरून त्या व्यक्तीचं जीवन कसं होतं हे सांगण्याचं शास्त्र असतं. त्याला ऑस्टिओ बायोग्राफी म्हणतात. त्या व्यक्तीचं राहणीमान कसं होतं, ती व्यक्ती कसं चालत होती, बोलत होती काय काम करत होती याचा अंदाज हाडांच्या रचनेवरून घेतला जातो. हा अभ्यास एका मान्यतेवर आधारित आहे. ते म्हणजे ज्याप्रमाणे आपलं जीवनमान आहे त्याप्रमाणेच आपल्या हाडांची रचना बनते.
 
जसं की, आता आपण लॅपटॉप, कंप्युटर, मोबाईलवर जास्त वेळ खर्च करतो. त्यामुळे आपले हात हे कोपरापासून दुमडलेले असतात. त्याचा परिणाम आपल्या कोपरांवर होऊ शकतो. यावर जर्मनीत संशोधन झालं आणि त्यात कळलंय की नवयुवकांचे कोपर हे अशक्त होत आहेत.
 
1924 साली मरियाना आणि गुआम बेटांवर खोदकाम सुरू होतं. खोदकामाच्या वेळी तिथं हाडांचे सापळे सापडले होते. हे सापळे 16 व्या किंवा 17 व्या शतकातील असावेत असा अंदाज आहे. या सापळ्यांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की तेव्हाच्या लोकांची कवटी, खांदा, खांद्यालगतच हाड, बाहू, पायांची हाडं ही मजबूत होती. त्या काळातले लोक आताच्या काळातल्या लोकांपेक्षा शारीरिकदृष्ट्या अधिक सक्षम असावेत.
 
याच बेटांवर एका दंतकथा प्रचलित आहे. त्यांच्या कथांमध्ये ताऊ ताऊ ताग्गा या व्यक्तीचा उल्लेख येतो. त्या व्यक्तीमध्ये अफाट शारीरिक शक्ती होती असं म्हटलं जातं. पण प्रश्न हा आहे की त्याच्यात इतकी शक्ती आली कुठून. हे सापळे जिथं सापडले होते तिथं लोक दगडकाम करत असत.
 
त्या वेळी हे लोक मोठं मोठे डोंगर फोडून तिथं आपले घरं बनवत असत. या बेटावर असलेल्या सर्वांत मोठ्या घरात 16 फुटांचे स्तंभ आहेत. त्यांचं वजन हे 13 टन इतकं आहे. त्या वेळी आजच्या काळाप्रमाणे मशीन्स नव्हत्या. त्यामुळे लोकांना सर्व कामं हातानं करावी लागत. या कामामुळेच त्यांची हाडं मजबूत झाली होती.
 
स्क्रीनटाईममुळे झाला बदल
त्या काळातल्या लोकांच्या तुलनेत सध्याच्या काळातल्या व्यक्तीचं शरीर फारच कमकुवत आहे. आपण स्क्रीनवर जास्त वेळ घालवतो आणि अंगमेहनतीची कामं कमी करतो त्यामुळे हा बदल होत आहे.
 
ऑस्ट्रेलियाचे वैज्ञानिक डेव्हिड शाहर हे गेल्या वीस वर्षांपासून मानवाच्या शरीर रचनेतील बदलांचा अभ्यास करत आहेत. ते सांगतात गेल्या दशकापासून मानवाच्या कवटीच्या खालच्या भागात एक खिळ्यासारखं नवं हाड तयार होत असल्याचं दिसत आहे.
 
याला वैज्ञानिक भाषेत एक्सटर्नल ऑक्सिपिटल प्रोट्युबरन्स म्हणतात. कवटीच्या खालच्या भागात मानेच्या वर हे हाड तयार होत आहे. जर डोक्यावर हात फिरवला तर हे हाड हाताला लागू शकतं. जर डोक्यावर केस नसतील तर ते हाड अजूनही स्पष्टपणे जाणवू शकतं.
 
हे खिळ्यासारखं हाड (स्पाइक) प्रत्येकाच्याच कवटीत असेल असं नाही. पहिल्यांदा हे हाड 1885 मध्ये सापडलं होतं. त्या काळातले वैज्ञानिक पॉल ब्रोका यांच्यासाठी हा नवा शोध होता. त्यांनी मानवाव्यतिरिक्त इतर प्रजातींवरही काम केलं होतं. त्यांना इतर कोणत्याही प्रजातीमध्ये हे हाड सापडलं नव्हतं.
 
डेव्हिड शाहर यांनी 18 ते 86 वयोगटातील किमान 1000 लोकांच्या कवट्यांचे एक्स रे अभ्यासले आहेत. 18 ते 30 या वयोगटातल्या व्यक्तीच्या कवटीमध्ये हे खिळ्यासारखं हाड दिसत आहे. याचं कारण हे गॅजेट आहे. जेव्हा आपण गॅजेटवर खूप वेळ काम करतो तेव्हा आपली मान खाली झुकते त्यामुळे मानेच्या स्नायूंवर तणाव पडतो. हा तणाव कमी व्हावा म्हणून एक नवं हाड 'संतुलन' म्हणून तयार होतं, असं शाहर सांगतात.
 
शाहर सांगतात, कुबड काढून बसल्यामुळे हे हाड तयार होत आहे. गॅजेट येण्यापूर्वी अमेरिकेत लोक बराच वेळ पुस्तक वाचत असत. असं म्हटलं जात होतं की साधारण व्यक्ती सरासरी रोज दोन तास पुस्तक वाचत असे. पण आताच्या काळात लोक स्मार्टफोनवर दुप्पट वेळ खर्च करत आहेत. खिळ्यासारखं हाड किंवा स्पाइक संदर्भात पहिला रिसर्च 2012मध्ये भाराच्या ऑस्टिओलॉजिकल लॅबमध्ये झाला होता. या लॅबमध्ये केवळ हाडांवरच संशोधन होतं.
 
इथं झालेल्या रिसर्चमध्ये स्पाइकची लांबी 8 मीमी इतकी आहे असं कळलं होतं तर शाहर यांनी संशोधन केल्यावर त्यांना असं आढळलं की स्पाइकची लांबी 30 मिलीमीटरपर्यंत असू शकते. शाहर यांचं म्हणणं आहे की स्पाइक कधी जाऊ शकणार नाही. पण या स्पाइकमुळे मानवाला काही त्रास देखील होणार नाही असं ते सांगतात.
 
सहज सोप्या जीवनशैलीचा प्रभाव
जर्मनीत एक वेगळ्या प्रकारचं संशोधन समोर आलं आहे. क्रिश्चियन शॅफलर याचं म्हणणं आहे की जर्मनीत नव्या पिढीच्या मुलांचं शरीर हे कमकुवत होत आहे. कोपर पातळ आणि नाजूक होत आहेत. सुरुवातीला असं वाटलं की हे अनुवांशिक आहे. नंतर वाटलं याचं कारण कुपोषण असेल पण जर्मनीत असं होण्याचंही काही कारण नव्हतं. आता असं आढळलं आहे की याचं कारण आधुनिक जीवनशैलीच आहे.
 
जेव्हा मुलं शारीरिक मेहनतीची काम करतात तेव्हा त्यांचे स्नायू आणि हाडं बळकट होतात. त्यामुळे त्यांचं शरीर मजबूत बनतं. पण नव्या लाइफ स्टाइलमध्ये मुलं व्यायाम करत नाहीयेत त्यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होत आहे.
 
मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास सांगतो आपल्याला दिवसाला तीस किलोमीटर चालण्याची सवय होती. पण आजकालची मुलं तर 30 मीटरही चालत नाहीत. हा बदल गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असावा त्याचा शोध अलीकडे लागला असंच म्हणावं लागेल. जबड्याच्या रचनेवरून खाण्यापिण्याच्या सवयीचा अंदाज लावता येऊ शकतो. कारण जबड्यावर जसा दबाव पडतो त्या तुलनेत स्नायू बळकट होतात आणि हाडांची रचना देखील प्रभावित होते.
 
आजकालच्या मुलांचे जबडे देखील मजबूत नसल्याचं वैज्ञानिकांच्या निरीक्षणास आलं आहे. आजकाल असं अन्न उपलब्ध आहे की जे खाण्यासाठी फार चावावं लागत नाही. अन्नदेखील अति शिजवलेलं असतं. त्यामुळे जबड्यांवर तणावच पडत नाही. बरेच जण लिक्विड डाएट घेतात. त्यामुळे दातांची तक्रार पण अनेकांत दिसते.
 
नाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे आधुनिक जीवनशैलीचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. फायदा करून घ्यायचा की नुकसान करून घ्यायचं हे आपल्या हातात आहे. आधुनिक राहणीमानानं आपलं जीवन सोपं आणि प्रगतीशील बनवलं आहे पण आपल्या चुकीच्या सवयींमुळे आपण आपल्यासमोरच अडचणी उभ्या केल्या आहेत. आता निर्णय तुमच्या हाती आहे.