बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

आपसातील वादामुळे दोघांचेही नुकसान-मोहन भागवत

आपसात वाद घातल्याने दोघांचेही नुकसान होते, तरीही कुणी वाद सोडत नाही. स्वार्थ भावनेमुळे नुकसान होते, हेही सर्वांना माहिती आहे. मात्र कुणीही स्वार्थ सोडायला तयार होत नाही. हे तत्व देश आणि व्यक्ती, सगळ्यांनाच लागू होतं, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना भागवत यांचे हे उद्गार सूचक मानले जात आहेत.  
 
"स्वार्थ अत्यंत वाईट गोष्ट आहे, हे सर्वांना माहिती आहे. मात्र खूप कमीजण आपला स्वार्थ सोडतात. देशांचे उदाहरण घ्या किंवा व्यक्तींचं. निसर्ग नष्ट केल्याने आपलाही विनाश होणार आहे. मात्र निसर्ग नष्ट करण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. आपसात भांडण केल्याने दोघांचेही नुकसान होते. परंतु आपसातील भांडणं अद्यापही बंद झालेली नाहीत," असं भागवत यांनी म्हटलं.
 
निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपद आणि सत्तेतील समान वाटा या मुद्यांवरून एकमत न झाल्याने महायुतीला सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालकांची भेट घेतली होती.