'शिवसेनेबरोबर जाऊ नका,' सोनिया गांधी यांना मुस्लिम संघटनांनी खरंच असं पत्र लिहिलं?
राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्यात काँग्रेसची द्विधा मनस्थितीत आहे.
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देणं हानीकारक असेल, असं जमात-उलेमा-ए-हिंद संघटनेनं म्हटल्यचं एक पत्र सर्वत्र फिरत आहे. यात संघटनेने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्याचा दावा केला जात आहे.
या कथित पत्रात जमात-उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अर्शद मदनी लिहितात, 'मी महाराष्ट्रातील खराब राजकारणाकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो. तुम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत विचार करत आहात हे दुर्देवी आहे. काँग्रेस पक्षासाठी हा निर्णय अत्यंत धोकादायक आणि घातक असेल'.
दरम्यान या पत्रासंदर्भात आम्ही जमात-उलेमा-ए-हिंद संघटनेशी आम्ही संपर्क केला. तेव्हा असं कोणतंही पत्र संघटनेनं काँग्रेस पक्षाला लिहिलेलं नाही असं संघटनेचे अध्यक्ष अर्शद मदनी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
ते म्हणाले, "सरकार कोणाचं येतंय याच्याशी आमचा काही संबंध नाही. असं आमचं उद्दिष्टही नाही. आम्ही कोणाला अशा सूचना करतही नाही. आम्ही काँग्रेस पक्षाला किंवा नेत्यांना कोणतंही पत्र लिहिलेलं नाही. राजकारणाशी आमचा संबंध नाही."
राज्यातील निवडणुकांचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. भाजपला सर्वाधिक मतं मिळाली. भाजप-शिवसेना युतीची सरकार येणार असं चित्र होतं मात्र मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरून या दोन पक्षांची बोलणी फिस्कटली.
भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला नाही. शिवसेनेने राज्यपालांसमोर सत्ता स्थापनेसाठी दावा केला मात्र त्यांनी दिलेल्या निर्धारित वेळेत त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र मिळू शकले नाही.
त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू असेल. एनडीएतून बाहेर पडलेल्या शिवसेनेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीने सत्ता स्थापनेचा प्रयत्न आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.
सत्तास्थापनेसंदर्भात राज्यात तसंच दिल्लीत बैठका सुरू आहेत. मात्र तीन पक्षांचं सरकार स्थापन होणार का? याविषयी संदिग्धता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली. मात्र या भेटीत महाराष्ट्रात सत्तास्थापनेविषयी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आघाडीतील घटक पक्षांना विचारात घेऊन पुढचा निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले.
शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसचे आमदार उत्सुक होते. म्हणूनच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रत्येक काँग्रेस आमदाराशी चर्चा केली. मात्र यानंतरही शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. तीन पक्षांचं सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचं हिंदुत्ववादी धोरण आणि काँग्रेसचं धर्मनिरपेक्षवादी धोरण हे एकत्र नांदू शकतं का, याचीही चर्चा आहे.