अमेरिकेतील कॅपिटल हिलमधील हिंसेच्या 24 तासांनंतर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्हीडिओ ट्वीट करून हिंसेंचा निषेध केला आणि त्याचसोबत सत्ता हस्तांतरणाचीही तयारी दर्शवली.
				  													
						
																							
									  
	 
	डोनाल्ड ट्रंप म्हणाले, "कॅपिटल हिलमधील हिंसेपासूनच मी सुरुवात करू इच्छितो. इतर अमेरिकन नागरिकांप्रमाणे मलाही यूएस कॅपिटल हिलमध्ये झालेल्या हिंसेमुळे संताप आलाय. इमारतीच्या सुरक्षेसाठी आणि घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी मी तातडीने नॅशनल गार्ड आणि लॉ इन्फोर्समेंट फोर्स तैनात केली होती."
				  				  
	 
	मात्र, काही वृत्तसंस्थांचं म्हणणं आहे की, सुरक्षारक्षकांना तैनात करण्याचा निर्णय माईक पेन्स यांनी घेतला होता, तर ट्रंप हे त्या निर्णयाच्या विरोधात होते.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	ट्रंप म्हणाले, "अमेरिकेला कायमच एक कायद-व्यवस्था असणारा देश म्हणूनच राहिले पाहिजे. कॅपिटल हिलमध्ये हिंसा करणाऱ्या घुसखोरांनी लोकशाहीला अपवित्र केलं आहे."
				  																								
											
									  
	"जे लोक हिंसा आणि तोडफोडीत सहभागी होते, ते आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. ज्यांनी कायद्याचा भंग केलाय, त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल," असंही ट्रंप म्हणाले.
				  																	
									  
	सत्ता हस्तांतरणासाठी तयार
	राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्हीडिओ ट्वीट करून 'व्यवस्थित' हस्तांतरणासाठी तयार असल्याचं सांगितलं.
				  																	
									  
	 
	ते म्हणाले, "नवीन प्रशासन 20 जानेवारी 2021 रोजी येईल आणि सुव्यवस्थित सत्तेच्या हस्तांतरणाचं वचन देतो."
				  																	
									  
	यूएस कॅपिटल हिल हिंसेनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे ट्विटरवर परतले, मात्र फेसबुकनं ट्रंप यांचं अकाऊंट दोन आठवड्यांसाठी निलंबित केलं आहे. तसंच, इंस्टाग्रामवरील अकाऊंटही निलंबित करण्यात आलंय.
				  																	
									  
	 
	डोनाल्ड ट्रंप हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समर्थकांना निवडणुकीचे निकाल न मानण्याचे आवाहन करत होते. कॅपिटल हिलवर झालेल्या हल्ल्यासाठी समर्थकांना भडकवल्याचा आरोपही ट्रंप यांच्यावर करण्यात येत आहे.
				  																	
									  
	 
	कॅपिटल हिलमध्ये काय घडलं?
	बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठीची चर्चा सदनात सुरू असताना अमेरिकेत बुधवारी (6 जानेवारी) कॅपिटल बिल्डिंगवर ट्रंप समर्थकांनी हल्ला केला. हा हल्ला करताना कॅपिटल इमारतीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करताना चार जणांचा मृत्यू झाल्याचं वॉशिंग्टन डीसी पोलिसांनी म्हटलंय.
				  																	
									  
	 
	या हल्ल्यानंतर अमेरिकन संसदेतल्या कामकाजाला पुन्हा सुरुवात करण्यात आली होती.
	बुधवारी ( 6 जानेवारी) ही चर्चा सुरू असतानाच कॅपिटल इमारतीच्या बाहेर निदर्शनं करत असलेले ट्रंप समर्थक इमारतीत घुसले. हे आंदोलक सदनापर्यंत पोहोचल्याने चर्चा थांबवण्यात आली होती.
				  																	
									  
	 
	या दरम्यान पोलिसांनी झाडलेली गोळी लागून एका महिलेचा मृत्यू झाला, तर इतर तीन जणांचा मृत्यू 'मेडिकल इमर्जन्सी'मुळे झाल्याचं वॉशिंग्टन डीसी पोलिसांनी म्हटलंय.
				  																	
									  
	 
	आतापर्यंत 52पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली असून त्यातल्या 47 जणांना कर्फ्यूच्या नियमांचा भंग केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
				  																	
									  
	अमेरिकन काँग्रेसचं सत्र सुरू असताना ट्रंप समर्थकांनी बॅरिकेड तोडून आत घुसखोरी केली. पोलिसांबरोबर त्यांची झटापटही झाली.
				  																	
									  
	 
	वॉशिंग्टन डीसी मेट्रोपोलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये हँडगन आणि लाँग गनचा समावेश आहे.
				  																	
									  
	 
	अटक करण्यात आलेले लोक डीसीमध्ये राहात नसल्याचे पोलीसप्रमुख रॉबर्ट कॉन्टी यांनी सांगितले. या घटनेत जखमी झालेल्या अधिकाऱ्यांवर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.