- प्रमिला कृष्णन
तामिळनाडूतल्या पुडुकोट्टई जिल्ह्यातल्या इराइयूर भागात दलित वस्त्यांच्या पाण्याच्या टाकीत मलमुत्र मिसळण्यात आलं.
या टाकीतलं पाणी प्यायल्यानंतर अनेक लहान मुलं आजारी पडली. ती का आजारी पडतात याचा शोध घेतल्यानंतर या टाकीत मानवी मलमूत्र मिसळलं असल्याचं समोर आलं.
ही घटना घडून अनेक दिवस उलटून गेल्यावरही या प्रकरणातले गुन्हेगार सापडलेले नाहीत. पण तपासाअंती इथे अजूनही अस्पृश्यतेच्या काही प्रथा पाळल्या जात असल्याचं इथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं.
ही घटना घडून अनेक दिवस उलटून गेल्यावरही या प्रकरणातले गुन्हेगार सापडलेले नाहीत. पण तपासाअंती इथे अजूनही अस्पृश्यतेच्या काही प्रथा पाळल्या जात असल्याचं इथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं.
इथे अजूनही दलितांसाठी वेगळा कप ठेवला जातो, दलितांना मंदिरात प्रवेश नाहीये. या प्रथा पाळण्यावरून तीन लोकांना अटक झाली आहे.
बीबीसी तामिळने इराइयूर गावाला भेट देत नक्की काय घडलं हे जाणून घेतलं.
हे गाव पुडुकोट्टई मुख्यालयापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. इकडे मुथाराईयार आणि अगामुंडियार समाजाची एकूण 300 कुटुंब राहातात.
आम्ही गावात गेल्या गेल्या आम्हाला पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात दिसला. दलित वस्ती तसंच सवर्ण वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त होता. इथल्या 10 हजार लीटरच्या पाण्याच्या टाकीत मलमूत्र मिसळलं गेलं होतं.
ज्या मुलांनी या टाकीतलं पाणी प्यायलं त्यांच्या पालकांना आम्ही भेटलो.
पांडीचेल्वी यांचा चार वर्षांचा मुलगा या टाकीतलं पाणी पिऊन आजारी पडला होता.
त्या सांगतात, “आम्ही त्याला घेऊन सरकारी दवाखान्यात गेलो. त्याचा ताप कमी होतच नव्हता. त्याला उलट्या जुलाबांचाही त्रास होत होता. सात दिवस झाले तरी त्याचा ताप उतरला नाही.”
“गावातली अनेक लहान मुलं आजारी पडली आणि एकेक करून दवाखान्यात अॅडमिट झाली. डॉक्टरांनी गावकऱ्यांना पाण्याच्या साठ्यांची तपासणी करायला सांगितलं तेव्हा कळलं की पाण्यात मलमूत्र मिसळलं गेलं होतं,” पांडीचेल्वींच्या डोळ्यात पाणी तरळतं.
गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर कलेक्टरने चौकशीचे आदेश दिले.
“मी स्वतः माझ्या मुलाला ते पाणी पाजलं. आता ती टाकी स्वच्छ केलीये पण तरीही पाणी पिण्याची किळस येते. लोक आम्हाला मलमूत्रमिश्रित पाणी पिणारे लोक म्हणून ओळखतात आता. कित्येक पिढ्या गेल्या पण हा अन्याय तसाच आहे. पुढेही अशा घटना घडतील अशी आम्हाला भीती आहे,” त्या म्हणतात.
दलितांना वेगळा कप, मंदिरात प्रवेश नाही
पांडीचेल्वींच्या मुलाला 10 दिवसांनंतर बरं वाटलं. गावातल्या पाच मुलांना दवाखान्यात अॅडमिट केलं होतं. अशाच प्रकारचा त्रास मोठ्यांनाही झाला. लहान मुलं आणि प्रौढ असे मिळून एकूण 30 जण आजारी पडले होते.
इथेच आम्हाला सिंधूजा ही तरूण मुलगी भेटली. तिच्या आवाजात राग होता.
“ते म्हणतात हे कोणी केलं याचा शोध लागला नाही. स्वातंत्र्याला 75 वर्षं झाली, सरकार अमृत महोत्सव साजरा करतंय आणि आम्हाला हे मलमुत्र मिश्रित पाणी प्यावं लागतंय. जातीभेद, दलितांवर अन्याय अजूनही होत आहेत याचं ठसठशीत उदाहरण म्हणजे आमचं गाव.
"कोणत्या मोठ्या राजकारण्याच्या घरासमोर कोणी जराही घाण केली असती तर त्यांनी लगेच त्या लोकांना शोधून काढलं असतं. पण आमच्या पिण्याच्या पाण्यात विष्ठा मिसळली गेली आणि कोणावरही काही कारवाई झाली नाही. का? कारण आम्ही सामान्य लोक आहोत,” सिंधूजा सांगते.
पुटुकोट्टईच्या जिल्हाधिकारी कविता रामू जेव्हा इराइयूर गावाला भेट द्यायला आल्या तेव्हा त्यांना दिसलं की मुकाईया नावाच्या सवर्ण व्यक्तीकडून एक छोटं हॉटेल चालवलं जातं. इथे दलितांना चहा पिण्यासाठी वेगळा कप दिला जातो.
कविता रामू यांना असंही कळलं की इथल्या अय्यंगार मंदिरात दलितांना प्रवेश नाहीये. कविता रामू यांनी जेव्हा इथल्या दलितांना घेऊन मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा इथली स्थानिक महिला सिंगमालच्या अंगात आलं.
सिंगमाल सवर्ण समाजातून येते. या महिलेच्या अंगात आलं आणि तिने दलितांना मंदिर प्रवेश करण्यापासून रोखलं.
सिंगमालच्या विरोधात आता गुन्हा दाखल झाला आहे आणि तिला अटकही झाली आहे.
मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना सिंधूजा म्हणते, “जेव्हा जिल्हाधिकारी आल्या तेव्हा त्या आम्हाला मंदिरात घेऊन गेल्या. गेल्या तीन पिढ्यापासून आमचे लोक मंदिर प्रवेशाची वाट पाहात होते, आता कुठे आम्हाला आशेचा किरण दिसला. आम्ही इतर जातीच्या लोकांबरोबर पोंगलही साजरा केला. आता आमच्या गावात पोलीस बंदोबस्त आहे. आता आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या पाण्याच्या टाकीत विष्ठा मिसळली त्या लोकांना अटक करा आणि कडक शिक्षा करा. तेव्हाच आम्हाला न्याय मिळेल.”
आम्ही 59 वर्षांच्या सिद्धसिवम यांच्याशीही बोललो. ते म्हणतात या गावातली अस्पृश्यता प्रथा कधीच संपली नाही. “मी लहान होतो तेव्हा सवर्ण समाजाली लहान मुलंही माझ्या वडिलांना एकेरी हाक मारायची. आम्हाला कधीच सन्मान मिळाला नाही, आम्हाला कधी समानतेने वागवलं गेलं नाही. आम्ही कधीच मंदिरात गेलो नाही. जिल्हाधिकारी आल्या तेव्हा पहिल्यांदा मंदिरात गेलो. आता त्या नाहीत तर आम्हाला पुन्हा मंदिरात जाऊ देतील की नाही याबद्दल आम्हाला शंकाच आहे. मला वाटलं होतं निदान आमच्या पुढच्या पिढीच्या वाटेला हे भोग येणार नाहीत. पण त्यांनाही अस्पृश्यता भोगावी लागतेय.”
सवर्ण म्हणतात कोणताही जातीभेद झाला नाही
इराइयूर गावातलं प्रकरण प्रकाशात आल्यनंतर अनेक दलित कार्यकर्त्यांनी इथे भेटी दिल्या, अनेक राजकीय नेत्यांनी निदर्शनं केली. दलित नेते इथे खरंच अजूनही अस्पृश्यता पाळली जाते का याचा शोध घ्यायला आले.
बीबीसी तामिळने या गावाला भेट दिली तेव्हा इथल्या सवर्ण समाजातील लोक बोलायला तयार नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की या प्रकरणी त्यांची मतं मांडून फायदा नाही कारण कोणी ऐकून घ्यायलाच तयार नाहीये.
इथल्या महिलांचं म्हणणं होतं की सतत मीडिया गावात येतो त्यामुळे त्रास होतो.
आम्ही पुन्हा सवर्ण लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या लोकांनी आमच्या रिपोर्टर आणि कॅमेरामनभोवती वेढा घातला. परिस्थिती तणावाची झाली.
त्यातल्या एका तरुण मुलाने म्हटलं, “कोणी आमच्याबद्दल बोलत नाही, लिहित नाही. आम्ही आतापर्यंत सगळे बंधुभावाने राहात होतो. मंदिरात येण्याबद्दलही काही अडचण नव्हती. ते लोक मंदिराच्या प्रवेशव्दारापर्यंत यायचे. जुनी परंपरा त्यांनी चालू ठेवली.”
त्यातल्या एकाने असंही सांगितलं की मंदिरात एक विशिष्ट विधी करण्याचा अधिकार फक्त दलितांना आहे आणि इथे कोणीही अस्पृश्यता पाळत नाही.
इथल्या माहेश्वरी नावाच्या तरुणीने बोलताना म्हटलं, “इथे जातपात कोणी पाळत नाही. कोणी म्हणत नाही की आम्ही उच्च जातीचे आणि तुम्ही खालच्या. ते स्वतःला खालच्या जातीचे म्हणवून घेतात. इथे जवळच एक अंगणवाडी आहे. तिथे सगळी लहान मुलं एकत्र खेळतात. आम्ही एकाच रस्त्याने ये-जा करतो. ते म्हणतात आम्ही दलितांना वेगळ्या कपात चहा देतो, किंवा वेगळ्या भांड्यात पाणी प्यायला देतो. असं काही नाहीये. आम्ही त्या लोकांना वेगळा कप देतो ज्यांनी देवाला हार चढवला आहे. त्यांचा गैरसमज झालेला आहे.”
“त्यांच्या पाण्यात कोणी मलमूत्र मिसळलं हे कळलं तर आम्हाला आनंदच आहे. आमच्या जातीच्या लोकांनी हे काम केलेलं नाही. पोलिसांना जर गुन्हेगार सापडले तर त्यांच्यापेक्षा आम्हालाच सुटल्यासारखं होईल. एवढी वर्षं इथे एक तक्रार नव्हती, आता अचानक एवढ्या तक्रारी, अनेकांना अटक झाली. इथलं वातावरण बिघडलं आहे याचं दुःख वाटतंय.”
तपास कुठे अडलाय?
या प्रकरणातले गुन्हेगार अजूनही सापडलेले नाहीत. आम्ही इथल्या एसपी वंदिता पांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला काही प्रतिसाद मिळाला नाही.
त्रिचीचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल सर्वनासुंदर म्हणाले की 11 जणांची विशेष समिती या प्रकरणी स्थापन केलेली आहे. जिल्हा प्रशासन या गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावत असल्याचीही माहिती आम्हाला मिळाली.
सामाजिक कार्यकर्ते काधीर म्हणतात की तपासात जो उशीर होतोय क्षम्य नाही.
“मंदिर प्रवेश आणि दलितांसाठी वेगळा कप या प्रकरणात अधिकाऱ्यांनी जो हस्तक्षेप करून दलितांना न्याय मिळवून दिला ती चांगली गोष्ट आहे. लोकांना त्यांनी मदत केली पण मुळ गुन्हेगारांना अजून अटक झालेली नाही. जेवढा जास्त उशीर होईल तेवढं हे प्रकरण विरत जाईल. या प्रकरणामागे नक्कीच एकापेक्षा जास्त लोकांचा हात आहे.”
ते पुढे असंही म्हणतात की अट्रोसिटीच्या केसेसमध्ये गुन्हेगारांना शिक्षा होण्याचं प्रमाण खूपच कमी असतं. “जरी तक्रार दाखल झाली तरी दलितांवर अन्याय करणाऱ्या लोकांना फार कमी प्रमाणात शिक्षा होते. तामिळनाडूचीच आकडेवारी सांगायची झाली तर गेल्या सात वर्षांत अशा प्रकरणांमध्ये फक्त 5 % ते 7% आरोपींना शिक्षा झालेल्या आहेत. ही माहिती आरटीआयव्दारे मिळाली आहे. त्यामुळे इराइयूर प्रकरणात लवकरात लवकर आरोपींना अटक होऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजे.”
अस्पृश्यतेबद्दल कोणी बोलत नाही
आम्ही जिल्हाधिकारी कविता रामू यांनाही भेटलो. आम्ही त्यांना विचारलं की जिल्ह्यात अस्पृश्यतेची प्रथा संपवण्यासाठी प्रशासन काय करतंय?
त्या म्हणाल्या, “इराइयूर प्रकरणानंतर आम्ही एक व्हॉट्सअप नंबर जाहीर केला. जातीभेदाचा कोणताही त्रास होत असेल किंवा अस्पृश्यतेला सामोरं जावं लागत असेल तर असे पीडित तातडीने या नंबरवर संपर्क करून आपली तक्रार दाखल करू शकतात.”
त्या पुढे म्हणतात, “तस दलित समुदायाच्या कल्याणासाठी अनेक योजनाही राबवल्या जात आहेत दसं की व्हिलेज कँप, शिक्षणासाठी कर्ज, आरोग्याच्या सुविधा आणि स्वतःच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज. आम्ही इथे सर्वसमावेश पोंगल सणही साजरा केला. एका गावात अशा प्रकारची घटना घडली, पण इतर गावात लोकांना काही त्रास होत आहे का यावरही आम्ही लक्ष ठेवून आहोत.”
बीबीसी तामिळने इराइयूर प्रकरणातले आरोपी सापडले का असं विचारलं असता त्या म्हणतात, “या भागात सीसीटीव्ही नाहीत त्यामुळे आरोपी सापडायला अडचण येतेय. पण आम्ही वेगाने तपास करतोय. एक खास समितीही स्थापन केलेली आहे. या प्रकरणाकडे कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष होत नाहीये.”
इराइयूर प्रकरणातून काय समोर येतं?
मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीजचे लक्ष्मण अस्पृश्यता या विषयाचे अभ्यासक आहेत. ते आमच्याशी अस्पृश्यता या विषयावर बोलले. ते म्हणतात की ही प्रथा अजूनही तामिळनाडूमध्ये या ना त्या प्रकारे पाळली जाते. पण याकडे कोणाचं फारसं लक्ष नाहीये.
“तामिळनाडू आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी अशा नागरी सुविधांच्या बाबतीत पुढारलेलं राज्य आहे पण जेव्हा सामाजिक समतेची बाब येते, इथल्या समाजात अजूनही मागासलेपणा आढळतो. लोकांच्या विचारसरणीत बदल झाला पाहिजे. नुस्त पेरियारांचं नाव घेऊन उपयोग नाही. त्यामुळे अशा घटनांवर पांघरूण घातलं जातं.”
ते पुढे म्हणतात, “काही महिन्यांपूर्वी वेल्लोर जिल्ह्यात एका वृदध माणसाचा मृतदेह दोरीने बांधून खाली सोडावा लागला कारण दलितांना त्या रस्त्यावरून जायची परवानगी नव्हती. अशा घटना घडतात. अनेक जिल्ह्यांमध्ये दलित शाळकरी मुलांना स्वच्छतागृह स्वच्छ करायला लावतात. कोरोना लॉकडाऊनच्या काळात दलितांविरोधात होणाऱ्या अट्रोसिटीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोची आकडेवारी सांगते. 2020 मध्ये PCR कायद्याअंतर्गत रजिस्टर होणाऱ्या केसेसची संख्या होती 1234, 2021 मध्ये हाच आकडा 2021 झाला. लोकांच्या मानसिकतेत बदल झाल्याशिवाय समाजात बदल होणार नाही.”