सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 4 जानेवारी 2023 (20:34 IST)

राहुल गांधी: मोदींना विरोध करताना काँग्रेस हिंदू-मुस्लिमांमध्ये कसं संतुलन साधणार?

rahul gandhi
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असताना काँग्रेसमध्ये आणखी एका विषयावर चर्चा सुरू आहे ती म्हणजे हिंदू मतदारांनादेखील पक्षानं बरोबर घेतलं पाहिजे. नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेस पक्षाला हिंदूंची साथ महत्त्वाची आहे. फक्त अल्पसंख्याकांच्या आधारावर त्यांच्याविरोधात लढता येणार नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अॅन्टोनी यांनी म्हटलंय.
 
अॅन्टोनी यूपीए सरकारच्या काळात संरक्षण मंत्री होते. केरळचं मुख्यमंत्रिपदसुद्धा त्यांनी भूषवलं आहे. सध्या ते काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.
ए. के. अॅन्टोनी यांनी तिरुअनंतपूरममध्ये गेल्या बुधवारी म्हटलं होतं, “मंदिरात जाणाऱ्या आणि कपाळावर टिळा लावणाऱ्यांना सॉफ्ट हिंदुत्ववादी म्हटलं तर त्याचा फायदा नरेंद्र मोदींना होईल, ते पुन्हा जिंकून येतील. मोदींविरुद्धच्या लढाईत आपल्याला हिंदुंना बरोबर घेण्याची गरज आहे.”
 
नुकताच 28 डिसेंबरला काँग्रेसचा 138 वा स्थापना दिवस साजरा झाला त्यावेळी पक्ष कार्यकर्त्यांना याबाबत कुठला गुरुमंत्र देण्यात आला आहे हे मात्र अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
 
राजकारणातील धर्मावर काँग्रेसची निती
एकेकाळी काँग्रेसची ओळख म्हणजे सर्व जातीधर्मांचा पक्ष अशी होती. पण आता मात्र बहुसंख्य समाजातल्या एका मोठ्या वर्गानं पक्षापासून फारकत घेतली आहे आणि तोच त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे.
 
जाणकारांच्या मते पक्षाला अजूनही यावर सुस्पष्ट अशी भूमिका घेता आलेली नाही.
 
काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये मुंबईत झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर पक्षानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं.
 
काँग्रेस पक्षात वेळोवेळी अशा प्रकारची विधानं होत आहेत. या मुद्द्यावर काँग्रेसनं केलेली चालढकल कारणीभूत असल्याचं राजकीय विश्लेषक आणि लेखक रशीद किदवई यांना वाटतं.
 
काँग्रेसवर आतापर्यंत अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करण्याचे आरोप इतक्यांदा करण्यात आले आहेत की आता त्यावर उतारा म्हणून अशी विधान करण्यात येत असल्याचं लोकमतचे माजी संपादक शरद गुप्ता यांना वाटतं.
 
मुस्लिमांचं लांगुलचालन केल्याचा आरोप
भाजप आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी काँग्रेसवर वेळोवेळी मुस्लिमांचं लांगुलचालन केल्याचा आरोप केला आहे.
 
ए. के. अॅन्टोनी यांचं हे वक्तव्य म्हणजे काँग्रेस हिंदुंना फक्त एक व्होट बँक समजते, असा आरोप भाजपनं केला आहे.
 
ए. के. अॅन्टोनी यांचं हे म्हणणं काही नवं नाही, वेळोवेळी ते असं बोलले आहेत आणि ते त्यांच्या या विचारांवर कायम आहेत, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं आहे.
 
तसंच अॅन्टोनी यांचं सध्याचं वक्तव्य विपर्यास करून दाखवण्यात आल्याचा दावासुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
 
बीबीसीनं या प्रकरणी ए. के. अॅन्टोनी यांच्याशी संपर्क करून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी त्यावर काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
 
अॅन्टोनी यांचं वक्तव्य
ए. के.अॅन्टोनी यांचं वक्तव्य त्यांनी जसं केलं आहे तसं दाखवण्यात आलं नसल्याचं केरळमधील पत्रकार व्ही. के. चेरियन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलंय.
 
त्यांच्यानुसार ऍन्टोनी यांचं वक्तव्य असं होतं, “मोदींविरोधातल्या लढाईत आपल्याला अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक अशा दोन्ही सुमदायांच्या समर्थनाची गरज आहे. अल्पसंख्याकांप्रमाणेच बहुसंख्याकांनासुद्धा मंदिरात जाण्याचा आणि टिळा लावण्याचा अधिकार आहे.
 
"पण, अशा लोकांना सॉफ्ट हिंदुत्ववादी म्हणणं म्हणजे मोदींना पुन्हा सत्तेत येण्यास मदत करणं आहे. मोदींविरोधातल्या राजकीय लढाईत आपल्याला हिंदूंना बरोबर घेण्याची गरज आहे. काँग्रेस अशा सर्वांना बरोबर घेत पुढे जात आहे,” चेरियन सांगतात.

ए. के. अॅन्टोनी यांनी 1996, 1999, 2004 मध्येसुद्धा अशा प्रकराची विधानं केली होती. त्यावेळी पक्षाच्या पराभवासाठी आर्थिक उदारीकरणाबरोबरच ‘भगवा दहशतवाद’, ‘शिक्षणाचं भगवीकरण,’ सारख्या शब्दांच्या वापराला कारणीभूत ठरवण्यात आलं होतं.
 
उदयपूर चिंतन शिबीर
गेल्या काही दिवसांपासून ऍन्टोनी यांचं हे विधान चर्चेत आहे.
 
पण काँग्रेस पक्षात त्यांची ‘मुस्लिमांचा पक्ष’ अशी तयार झालेली प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न किती गंभीरपणे सुरु आहे हे सोनिया गांधी यांच्या एका वक्तव्यातून दिसून येतं. 2018 मध्ये कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्याला संबोधित करताना सोनिया गांधी म्हणाल्या होत्या, “काँग्रेस मुस्लिमांचा पक्ष आहे हे लोकांवर बिंबवण्यात भाजपला यश आलं आहे.”
 
हेच विधान सोनिया यांनी त्यानंतर दिलेल्या काही मुलाखतींमध्येसुद्धा केलं आहे.
 
मे 2022 मध्ये उदयपूरला झालेल्या पक्षाच्या शिबीरामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गहन चर्चा झाली.
 
त्यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचं म्हणणं होतं की काँग्रेसनं हिंदू सणांपासून स्वतःला जबरदस्ती दूर ठेवण्याची गरज नाही.
 
तर दुसरीकडे दक्षिणेतले काही नेते आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं होतं की, वैचारिक मुद्द्यांवर काँग्रेसची सुस्पष्ट भूमिका पाहिजे.
 
काँग्रेसचा ‘आउटरीच प्रोग्राम’
उदयपूरमध्ये झालेल्या शिबिरात विचारधारेबरोबरच आणखी एक गोष्ट पुढे आली ती म्हणजे – जनसंपर्क अभियान. ज्याला ‘आउटरीज प्रोग्राम’ म्हटलं गेलं. ज्याची रुपरेखा सोनिया, राहुल आणि प्रियांका यांच्या उपस्थितीत आखण्यात आली होती.
 
या कार्यक्रमाअंतर्गत काही राज्यांमध्ये स्थानिक नेत्यांनी मग दहीहांडी, गणेशोत्सवासारखे कार्यक्रम आयोजित केले.
 
पण याचे वेगळे परिणामसुद्धा दिसून आले. जसं की मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये बकरी ईदच्या दिवशी काही कार्यकर्ते पक्ष कार्यालयात बकरी घेऊन पोहोचले आणि विचारू लागले की पक्ष जर हिंदू सण साजरे करू शकतो तर मग मुस्लिम सण का नाही?
 
शेवटी पक्षाला पोलिसांना पाचारण करून त्यांना हटवावं लागलं.
छत्तीसगडमधलं भुपेश बघेल सरकार असो किंवा मध्य प्रदेशातलं आधीचं कमलनाथ सरकार. राम वनगमन पथ, गोमुत्र आणि शेण खरेदी, गोशाळा आणि अध्यात्मिक विभागाची स्थापना तसंच संस्कृतच्या शिक्षणावर भर यासांरख्या त्यांच्या निर्णयांकडे हिंदूंना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं गेलं.
 
भाजपने आम्हाला एक मुस्लिम पक्ष म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला पण, त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आम्ही विचारपूर्वक हे निर्णय घेतल्याचं, काँग्रेसच्या मध्य प्रदेश निवडणूक घोषणापत्राच्या प्रमुखांनी म्हटलं होतं.
 
भुपेश बघेल तर जाहिररित्या हिंदू कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, याआधी त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं, “काँग्रेसने हिंदू कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवण्यात काहीच अर्थ नाही, तिथं रिक्त स्थान सोडणं म्हणजे भाजपला ते भरण्यासाठी संधी देणं आहे.”
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी कायम आरएएस आणि भाजपवर राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर केल्याचा आरोप करतात. पण स्वतः मंदिर-मठांचा दौरा सतत करत राहतात. दुसरीकडे राहुल गांधी कसे जानवं घालणारे हिंदू आहेत हे सांगताना काँग्रेसचे नेते थकत नाहीत.
 
“राजकारणातला धर्माचा मुद्दा काँग्रेससाठी शरिरात रुतलेल्या काट्या सारखा आहे. विचारधारेच्या मुद्द्यावर काँग्रेसमध्ये सुस्पष्टता नाही. ऍन्टोनींना हाच मुद्दा समोर आणायचा आहे. काँग्रेसला स्वतःलाच माहिती नाही की मांजराच्या गळ्यात घंटा कशी बाधायची,” असं रशीद किदवई सांगतात.
 
“अर्थव्यवस्था, धर्म आणि जातीयवादाच्या मुद्द्यावर डाव्या, उजव्या, समाजवादी आणि दक्षिण भारतातल्या डीएमकेसारख्या पक्षांची भूमिका सूस्पष्ट आहे. पण, काँग्रेस पक्षात मात्र या मुद्द्यांवर अजूनही स्पष्टता नाही. या मुद्द्यांवर काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या भूमिका आहेत. ज्यावर एकच भूमिका असावी अशी मागणी त्यामुळेच वेळोवेळी केली जात आहे.”
 
'काँग्रेसची दुटप्पी भूमिका'
उत्तर प्रदेशातल्या दादरीमध्ये कथित गोमांसाच्या मुद्द्यावरून जेव्हा झुंडबळी घेण्यात आला त्यावेळी भाजपने गोवंश हत्याबंदीची मागणी केली.
 
तेव्हा काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी वक्तव्य केलं होतं की भाजपनं हे याद राखावं की गोवंश हत्याबंदीची सुरुवात काँग्रेसने 1955 मध्येच केली होती. तसंच काही राज्यांमध्ये तेव्हाच गोवंश हत्येवर प्रतिबंध आणण्यात आले होते.
 
तेव्हा काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी गोवंश हत्याबंदीसाठी काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर कायदा आणण्याच्या मुद्द्यावर चर्चेला तयार असल्याचं म्हटलं होतं. तसंच या मुद्द्यावर सोनिया आणि राहुल गांधीशी चर्चा करू असंसुद्धा त्यांनी जाहीर केलं होतं.
 
शबरीमालाच्या मुद्द्यावरदेखील पक्षानं दुटप्पी भूमिका घेतली. आधी पक्षानं कोर्टाच्या निर्णायचं स्वागत केलं, ज्याध्ये कोर्टानं सर्व वयाच्या महिलांना मंदिरात जाण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं होता. पण नंतर मात्र पक्षानं वेगळीच भूमिका घेतली.
पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशावरून स्थानिक पातळीवरील नेत्यांनी हिंदू सण साजरे करण्यास सुरुवात केल्याचं मात्र शरद गुप्ता यांना मान्य नाही.
 
हिंदू मतांची गरज
सर्व धर्मांचा सन्मान करण्यावर काँग्रेसचा विश्वास आहे, पण धर्मनिरपेक्षतेसारख्या मुद्द्यांना स्पष्टपणे समजावणं आजकाल कठीण आहे, असं पृथ्वीराज चव्हाण सांगतात.
 
“धार्मिक मुद्द्यावर काँग्रेसनं सर्व धर्मांपासून समान अंतर ठेवण्याची गरज आहे, तसंच कार्यकर्त्यांना संविधानाबाबत अधिक साक्षर करण्याची गरज आहे. म्हणजे ते लोकांपर्यंत संविधानातील मुद्दे पोहोचवू शकतील,” असं पृथ्वीराज चव्हाण यांना वाटतं.
 
काँग्रेस गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी संविधान शिबीराचं आयोजन करत आहे. 8 डिसेंबरला नवी मुंबईमध्ये त्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
 
भाजप जाणूनबुजून सर्व हिंदू त्यांच्या बरोबर असल्याचा प्रचार करते, असंसुद्धा काँग्रेसचं म्हणणं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला 31 टक्के मतं मिळाली होती.
 
तर 2019 मध्ये त्यात वाढ झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला 37 टक्के मतं मिळाली. याचाच अर्थ हिंदू मतदारांचा एक मोठा वर्ग अजूनही भाजपबरोबर गेलेला नाही.
 
धर्मनिरपेक्षतेवर संकट
“जेव्हा नव्वदच्या दशकात ‘बच्चा-बच्चा राम का, मंदिर के काम का' सारखे नारे दिले जात होते तेव्हा सामान्य लोकांची भूमिका तेवढी मुस्लिम विरोधी नव्हती जेवढी ती आता गेल्या आठ वर्षांमध्ये पाहायला मिळत आहे,” असं शरद गुप्ता सांगतात.
 
गुप्ता त्यांचा एक अनुभव सांगतात, "भाजपच्या एका मुस्लिम नेत्याला पक्षानं तिकीट नाकारल्यानंतर पुढे काय करणार असं त्यांना विचारल्यावर ते म्हणाले होते की, वाट पाहणार. तसंही इतर पक्षसुद्धा मुस्लिमांना तिकीट देण्याआधी विचार करतातच ना."
 
सत्तधारी पक्ष भाजप मुस्लिमांना उमेदवारी देण्यापासून दूर राहत असल्याचं दिसून येतंय. तर दुसरीकडे काँग्रेसही आता पूर्वी एवढ्या प्रमाणात मुस्लिमांना तिकीटं देत नाही.
2014 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसनं एकूण उमेदवारांच्या फक्त सहा टक्क्यांपेक्षाही कमी मुस्लिम उमेदवार दिले होते.
 
हिंदू राष्ट्रवाद
फ्रान्समधील स्कॉलर क्रिस्टोफ जेफरोले यांनी नुकताच एक लेख लिहिला होता. त्यांच्यानुसार, ‘भारतातील धर्मनिरपेक्षतेवर आलेलं संकट हे आताच निर्माण झालेलं नाही. स्वतः काँग्रेस पक्षात 1980 पासून त्याची पार्श्वभूमी तयार होत होती.
 
इंदिरा गांधी यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापिठाला अल्पसंख्याकाचा दर्जा देणं असो, भिंद्रनवालेंना प्रोत्साहन देणं असो किंवा विश्व हिंदू परिषदेने स्थापन केलेल्या भारत माता मंदिराच्या कार्यक्रमात सहभागी होणं असो, क्रिस्टोफ जेफरोले त्यांच्या लेखामध्ये या सर्व घटनांचा उल्लेख करतात.
 
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी बाबरी मशिदाचं टाळं खोलणं, राम मंदिराचा शिलान्यास आणि शहाबानो केसमध्ये निर्णय बदलण्याच्या घटना फार जुन्या नाहीत. शिवाय केंद्रात नरसिंह राव यांचं सरकार असताना बाबरी विध्वंस झाला होता.
 
जेफरोले म्हणतात की या घटनांनी हिंदुत्ववाद्यांना काँग्रेसला 'छद्म-धर्मनिरपेक्षतावादी’ म्हणण्याची संधी दिली. ते लिहितात, “भारताच्या धर्मनिरपेक्ष पंरपरेला या निर्णयांनी छेद देत इंदिरा आणि राजीव गांधी यांनी हिंदू राष्ट्रवादासाठी दरवाजे उघडले.”

Published By- Priya Dixit