बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

फेसबुक: नवीन फीचर्स मिळवून देऊ शकतात तुम्हाला पुढची डेट

- झोए क्लिनमन
 
फेसबुक तसेच इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप या सोशल मीडिया अॅपमध्ये मोठे बदल होणार आहेत. तरुण वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी फेसबुकचे सह-संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी नवं फीचर आणलं आहे. या फीचरमुळे तुम्हाला तुमच्या सोशल सर्कलमधील व्यक्तीसोबत डेटिंग करता येऊ शकतं.
 
हे नवं फीचर टिंडरसारखंच असेल पण टिंडरवर अनोळखी लोकांसोबत तुम्हाला डेटिंग करायची की नाही याचा निर्णय घ्यावा लागतो मात्र याठिकाणी तुमच्याच संपर्कातील व्यक्तीला जर तुम्ही आवडत असाल तर तुमची आणि त्या व्यक्तीची जोडी जमू शकते. ही या अॅपची जमेची बाजू आहे.
काय आहे हे फीचर?
'Secret Crush' असं या फीचरचं नाव असेल. फेसबुक डेटिंग फिचरचाच हा एक भाग असणार आहे. यात काही निवडक देशातले फेसबुक यूजर त्यांच्या फेसबुक मित्र-मैत्रिणींपैकी त्यांना आवडणाऱ्या किंवा ते ज्यांच्याकडे आकर्षित झाले आहेत अशा जास्तीत जास्त नऊ मित्रांना टॅग करू शकतील. ज्याला तुम्ही टॅग केलं असेल ते नाव जाहीर होणार नाही.
 
तुम्ही ज्या व्यक्तीला टॅग केलं त्याच व्यक्तीने जर तुम्हाला टॅग केलं असेल तर तुम्हा दोघांनाही मेसेज येईल की 'Matched' याचाच अर्थ आहे की तुम्ही ज्या व्यक्तीकडे आकर्षित झाला त्या व्यक्तीलाही तुमच्याबद्दल आकर्षण आहे.
 
फेसबुक डेटिंग फिचर आणखी 14 देशांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. यात फिलिपिन्स, व्हिएतनाम आणि सिंगापूर या देशांचाही समावेश आहे. हे फिचर युरोप किंवा अमेरिकेत सध्या उपलब्ध नाही, अजून ते भारतातही उपलब्ध नाही. पण आशावादी राहा.
अजून काय बदल होणार आहेत?
फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप या सोशल मीडिया अॅप्समध्ये लवकरच महत्त्वाचे आणि मोठे बदल होणार आहेत. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी स्वतः या बदलांविषयी माहिती दिली. यूजर्सची खाजगी माहिती सुरक्षित ठेवत नसल्याची सर्वत्र टीका झाल्यानंतर कंपनीने त्यांच्या वेगवेगळ्या अॅप्लिकेशन्सचे डिझाईन आणि फिचर्स बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
 
यापुढे गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं. गेलेला विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी बरंच काही करण्याची आवश्यकता असल्याची कबुलीही त्यांनी दिली. डेव्हलपर्ससमोर दिलेल्या भाषणात त्यांनी गोपनीयता हा कंपनीचा नवा केंद्रबिंदू असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
 
या कंपनीचे अॅप्स वापरणाऱ्या यूजर्सना जे प्रत्यक्ष बदल दिसतील, ते आहेत...
 
मेसेंजरने पाठवलेले मेसेज हे end-to-end encrypted असतील. म्हणजे हा डेटा कुठल्याच थर्ड पार्टीला (खुद्द फेसबुकलासुद्धा) बघता येणार नाही. शिवाय, मेसेंजर व्हॉट्सअॅपशी पूर्णपणे जोडलं जाईल.
 
इन्स्टाग्रामवर 'private like counts'चा पर्याय तपासला जातोय. यात एखाद्या पोस्टला मिळालेले 'लाईक्स' ज्याचं ते अकाउंट आहे, त्या व्यक्तीशिवाय कुणालाच दिसणार नाही.
 
याव्यतिरिक्त मेसेजेसवर 'अल्पकालिक' कॉन्टेंट शेअर करण्याची सोय असेल. म्हणजेच हे फिचर वापरून पाठवण्यात आलेला मेसेज दीर्घकाळ राहणार नाही.
 
व्हॉट्सअॅपद्वारे सुरक्षित पैसे पाठवण्याच्या (secure payment) सेवेची भारतात ट्रायल झाली आहे. ही सेवा यावर्षी इतर देशांमध्येही सुरू करण्यात येईल.
 
कम्युनिटी ग्रुप हे न्यूजफीड केंद्रीत करण्यासाठी फेसबुक अॅप नव्याने डिझाईन करण्यात येतंय. यात फेसबुकचा ब्रँड असलेला निळा रंगही बदलणार आहे. फेसबुकचं हे बदललेलं रुप सर्वात आधी अमेरिकेत सुरू करण्यात येईल.
 
इन्स्टाग्राममध्ये एखादी पोस्ट टाकायची असेल तर त्याची सुरुवात फोटो किंवा व्हिडियोने करण्याची गरज उरणार नाही. केवळ टेक्स्ट, स्टिकर्स किंवा चित्र काढूनही इन्स्टाग्राममध्ये पोस्ट करता येईल. 'creat' कॅमेरा या नव्या मोडमुळे हा बदल शक्य होणार आहे.
 
तंत्रज्ञान क्षेत्रातल्या दिग्गज कंपन्यांकडून झालेल्या खाजगी डेटा चोरीच्या घटनांची दखल घेत झुकेरबर्ग म्हणाले, "भविष्य खाजगी आहे." ते पुढे म्हणाले, "अगदी ढोबळमानाने सांगायचं तर गोपनीयतेच्या मापदंडावर आमची कामगिरी फार चांगली नाही."
 
कंपनीच्या सर्वच उत्पादनांमध्ये गोपनीयतेला सर्वोच्च स्थान देण्यासाठीच्या पर्यायांवर काम करणे, हेच आमचं मुख्य उद्दिष्ट असल्याचंही ते म्हणाले. "हे एका रात्रीतून होणार नाही आणि स्पष्टच सांगायचं तर आमच्याकडे सर्वच प्रश्नांची उत्तरंही नाहीत", असंही झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं. भविष्यात लोकांना छोट्या-छोट्या ग्रुपमध्ये आणि कम्युनिटीमध्ये खाजगीत बोलायचं असेल, असं झुकेरबर्ग यापूर्वीच म्हणाले होते. मात्र, फेसबुक हे त्यासाठीचं व्यासपीठ असल्याचं, त्यांना लोकांना पटवून द्यावं लागणार आहे, अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केलीय.
 
सोशल मीडिया कन्सलटंट असलेले मॅट नॅव्हरा यांनी सांगितलं, "2019 आणि त्यानंतरच्या सोशल मीडियाच्या नियंत्रित युगात फेसबुक कशी कामगिरी करतं, हा मोठा प्रश्न आहे." "माझा अंदाज - ते मोठा पल्ला गाठतील. मात्र, येणारी बरीच वर्षं त्यांच्या प्रतिष्ठेला लागलेला डाग पुसला जाणार नाही."
टेक्नॉलॉजी प्रतिनिधी डेव्ह ली यांचे विश्लेषण
खासगी, खासगी, खासगी.... मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितल्याप्रमाणे फेसबुकचं भविष्य हे खासगी असणार आहे. मात्र, याबाबतचा अधिक तपशील त्यांनी आता सांगितला.
 
फेसबुकच्या डिझाईनमध्ये गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यांचा भर हा ग्रुप्स आणि खाजगी संवादावर असणार आहे. माहिती इन्क्रिप्टेड म्हणजे गुप्त असेल. स्वतः फेसबुकलाही ती हाताळता येणार नाही.
 
आणि मोठी बातमी म्हणजे - फेसबुक यापुढे निळं असणार नाही. अॅपलच्या आयमेसेजसारखी काहीतरी प्रतिमा झुकेरबर्ग यांच्या डोक्यात घोळत असल्याचं जाणवतं. मात्र, सध्या फेसबुक ज्या संकटातून जातंय ते बघता कंपनी जे बदल करतेय तो केवळ दिखावा नाही, हे त्यांना सिद्ध करावं लागेल.
 
गोपनीयतेच्या बाबतीत कंपनीची प्रतिमा फार चांगली नाही, याचा ओझरता उल्लेख झुकेरबर्ग यांनी केला. मात्र, विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं. शिवाय मोठमोठ्या अडचणी असतानाही त्यांना लोकांना सतत काहीतरी नवीन देता आलं पाहिजे. फेसबुक आपल्या अडचणी दूर करत असताना स्पर्धक कंपन्याही त्यांचं स्थान बळकट करण्यासाठी जोर लावतील. फेसबुकसाठी कदाचित हीच सर्वात मोठी जोखीम असेल.
 
आभासी वास्तव (Virtual Reality)
पूर्णपणे फेसबुकची निर्मिती असलेले वायरलेस व्हिआर हेडसेटही लवकरच लॉन्च करण्यात येतील. त्याची तारीखही जाहीर करण्यात आलीय. ऑक्युलस क्वेस्ट असं या हेडसेटचं नाव आहे. हा हेडसेट तुमचा पीसी, हॅन्डसेट किंवा कुठल्याही गेम कन्सोलशी जोडण्यासाठी केबलची गरज पडणार नाही. परिषदेत उपस्थित प्रत्येकालाच हा हेडसेट भेट म्हणून देणार असल्याची घोषणाही झुकेरबर्ग यांनी केली.
 
मी मात्र 21 मे रोजी म्हणजे ज्या दिवशी हा सामान्यांसाठी खुला होईल, त्याचदिवशी जाऊन विकत घेईल. "व्हिआरची सुरुवात जरा धीम्या गतीने झाली असली तरी फेसबुकचं यापुढचं कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म हे व्हीआरच असणार आहे, या निर्णयाशी फेसबुक बांधील आहे", अशी प्रतिक्रिया CCS Insightचे विश्लेषक जॉफ ब्लॅबर यांनी दिलीय. "नव्या ऑक्युलसमुळे व्हीआरचा अनुभव अधिक दर्जेदार होणार असला तरी व्हीआरचा वापर हा सोशल मीडियावर संवाद साधण्याचा पर्याय यापेक्षा गेमिंगसाठी अधिक होतो. त्यामुळे व्हीआरबाबतीत फेसबुकने कितीही स्वप्न बघितली तरी ती स्वप्न आणि वास्तव यात दरी आहेच."