शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

गे सेक्स करणाऱ्यांना इथे मिळणार दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा

दक्षिणपूर्व आशियाई देश ब्रुनेईत, गे सेक्स करणाऱ्यांना दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा देण्यात येणार आहे. नव्या कठोर इस्लामिक कायद्यान्वये ही शिक्षा देण्यात येईल.
 
आंतरराष्ट्रीय एलजीबीटी समुदायाने तसंच अन्य देशांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.
 
बुधवारपासून नव्या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. चोरीप्रकरणी दोषी आढळणाऱ्या व्यक्तींचे हातपाय तोडण्याची शिक्षा देण्यात येणार आहे .
 
सरकारचा नवा कायदा मध्ययुगीन आहे असं ब्रुनेईतील समलैंगिक समाजाने म्हटलं आहे.
 
नव्या कायद्यानुसार, समलैंगिक व्यक्तींनी शरीरसंबंधांची कबुली दिली किंवा चार साक्षीदारांनी समलैंगिक व्यक्तींना शरीरसंबंध ठेवताना पाहिल्यास, समलैंगिक व्यक्तीला दोषी ठरवण्यात येईल.
 
"एके दिवशी तुम्ही उठता आणि तुमच्या लक्षात येतं की तुमचे शेजारी, तुमच्या घरचे अगदी कोपऱ्यावर प्रॉन्सची भजी विकणारी म्हातारी आजीसुद्धा तुम्हाला माणूस समजत नाही. त्यांना वाटतं तुम्हाला दगडाने ठेचून मारण्यात काहीही गैर नाही," ब्रुनेईमधल्या एका गे व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं.
 
ब्रुनेई सरकारने याआधीच समलैंगिक संबंध बेकायदेशीर ठरवले आहेत. समलैंगिक व्यक्तींना दहा वर्षांची शिक्षा देण्यात येते.
 
ब्रुनेई हा बोर्नेओ बेटावरील देश असून इथे सुलतान हसानल बोलकिआ यांची सत्ता आहे. ब्रुनेईत खनिज तेलाचे मुबलक साठे असून, ते मोठ्या प्रमाणावर तेल निर्यातही करतात.
 
72 वर्षीय सुलतान हे ब्रुनेई इनव्हेस्टमेंट एजन्सीचे प्रमुख आहेत. लंडनमधील डॉर्चेस्टर तसंच लॉस एंजेलसमधील बेव्हर्ली हिल्स ही पंचतारांकित हॉटेल्स या एजन्सीअंतर्गत काम करतात.
 
हॉलीवूड अभिनेता जॉर्ज क्लुनी यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी या हॉटेलमध्ये जाऊ नये असं आवाहन केलं आहे.
 
ब्रुनेईच्या राजाकडे प्रचंड संपत्ती असून ही वडिलोपार्जित आहे. ब्रुनेईत मलाय समाज प्रामुख्याने असून, त्यांना सरकारकडून सढळहस्ते मदत केली जाते. मलाय समाज कोणताही कर देत नाही.
 
ब्रुनेईची लोकसंख्या 420,000 असून त्यापैकी मुस्लिम समाज दोन-तृतीयांश आहे.
 
ब्रुनेईमध्ये देहदंडाची शिक्षा कायम आहे पण 1957 नंतर त्यांनी या शिक्षेची अंमलबजावणी केलेली नाही.
 
इस्लामिक कायद्याची ब्रुनेईत पहिल्यांदाच अंमलबजावणी?
ब्रुनेईत 2014 मध्ये शरिया कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यावेळी या कायद्याला तीव्र विरोध झाला होता.
 
बलात्कार, व्यभिचार, अनैसर्गिक संभोग, चोरी, मोहम्मद प्रेषितांचा अपमान या गुन्ह्यांसाठी देहदंडाची तरतूद आहे.
 
गर्भपातासाठी जाहीर फटक्यांची शिक्षा देण्यात येते.
 
ब्रुनेईवासीयांचा काय प्रतिसाद?
ब्रुनेईतील 40वर्षीय गे व्यक्तीने या निर्णयाचे पडसाद जाणवत असल्याचं सांगितलं आहे. या व्यक्तीने कॅनडात आश्रय मागितला आहे.
 
फेसबुकवर सरकारवर टीका करणाऱ्या पोस्टसाठी एका व्यक्तीला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. या व्यक्तीने थोड्या दिवसानंतर देशच सोडला.
 
ब्रुनेईतील समलैंगिक व्यक्ती आपल्या लैंगिक ओळखीबाबत उघडपणे बोलत नसत. मात्र ग्रिंडर (गे व्यक्तींसाठीचे अॅप) अॅप ब्रुनेईत उपलब्ध झाल्यानंतर समलैंगिक व्यक्ती एकमेकांना भेटू लागल्या. मात्र नवीन कायद्याच्या अंमलबजावणीनंतर लोकांनी हे अॅप वापरणं सोडून दिलं आहे असं शहीरान एस. शाहरानी यांनी बीबीसीला सांगितलं.
 
गे व्यक्ती बोलतोय असं भासवून पोलीस अधिकारी आपल्याशी बोलत असावा अशी भीती समलैंगिक व्यक्तींना वाटते आहे.
 
मला भीती वाटते, संवेदनाहीन झाल्यासारखं वाटतंय अशा शब्दांत ब्रुनेईतील आणखी एका व्यक्तीने आपल्या भावना व्यक्त केल्या. ही व्यक्ती समलैंगिक नाही मात्र त्याने इस्लाम धर्म अहेरला आहे.
 
शरिया कायद्याची अंमलबजावणी आम्ही रोखू शकत नाही, आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत असं एका 23 वर्षीय व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.
 
मी समलैंगिक आहे हे कळलं तर शरिया कायद्यानुसार फाशीची शिक्षा होईल किंवा मला वाळीत टाकलं जाईल.
 
हा कायदा झाला आहे मात्र त्याची तितकी कठोर अंमलबजावणी होणार नाही असा आशावाद एका व्यक्तीने व्यक्त केला.