रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

Huaweiला गुगलकडून धक्का, स्मार्टफोनमधून गायब होणार महत्त्वाचे अॅप

फोनचं उत्पादन करणाऱ्या हुआवे (Huawei) या कंपनीला गुगलनं अँड्रोईड ऑपरेटिंग सिस्टिममधील काही गोष्टी वापरण्यास प्रतिबंध केला आहे. हुआवेच्या नवीन स्मार्ट फोनमधून गुगलचे महत्त्वाचे अॅपही गायब होतील.
 
फोन उत्पादनातलं महत्त्वाचं नाव असलेल्या या चायनीज कंपनीला गुगलच्या निर्णयाचा चांगलाच फटका बसू शकतो.
 
ज्या कंपन्यांकडे परवाना नाही, त्यांच्यासोबत अमेरिकन कंपन्या व्यापार करू शकणार नाहीत, असा निर्णय ट्रंप प्रशासनानं घेतला आहे. अशा कंपन्यांची एक यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. हुआवेचाही या यादीमध्ये समावेश झाल्यानंतर गुगलने त्यांना सेवा न देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात गुगलनं म्हटलं आहे, की प्रशासनाच्या निर्णयानुसार हे पाऊल उचलण्यात आलं आहे आणि त्याचे काय परिणाम होतील याचा आम्ही अभ्यास करत आहोत.
 
हुआवेनं या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.
 
गुगलच्या या निर्णयाबद्दलची माहिती सर्वांत प्रथम रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिली. गुगलनं उचललेल्या पावलानंतर हुआवेच्या स्मार्ट फोनमध्ये गुगलचे सिक्युरिटी अपडेट्स असणार नाहीत. तसंच त्यांना गुगलकडून कोणताही तांत्रिक पाठिंबा मिळणार नाही. या फोनमधून यूट्यूब आणि गुगल मॅप्ससारखे अॅपही आता दिसणार नाहीत.
 
ओपन सोर्स लायसन्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या अँड्रॉईड सिस्टीमचा वापर मात्र सध्या तरी हुआवे करू शकते.
 
CCS Insight consultancy च्या बेन वूड यांच्या मते गुगलच्या या निर्णयाचा फार मोठा फटका हुआवेच्या ग्राहकांना बसू शकतो.
 
हुआवे 'काळ्या यादीत'
गेल्या आठवड्यात ट्रंप प्रशासनानं हुआवेचा समावेश 'एन्ट्री लिस्ट'मध्ये केला होता. 'एन्ट्री लिस्ट' म्हणजे अशा कंपन्यांची यादी ज्यांना सरकारी परवानगीशिवाय अमेरिकन कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचं तंत्रज्ञान विकत घेता येणार नाही.
 
अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांकडून हुआवेला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. हुआवेच्या 5जी मोबाईल नेटवर्कच्या वापरावरून हा विरोध केला जातोय.
 
हुआवे स्मार्टफोनच्या माध्यामातून चीन आपल्या देशातील नागरिकांवर पाळत ठेवू शकतो, अशी भीती अनेक देशांनी व्यक्त केली आहे. कंपनीनं मात्र ही भीती निराधार असल्याचं स्पष्ट केलं.
 
आपल्या फोनमुळे कोणताही धोका नाही आणि आम्ही स्वतंत्र आहोत, चिनी सरकारचा आमच्या उत्पादनांशी संबंध नाही, असंही हुआवेनं म्हटलं आहे.
 
मात्र तरीही अनेक देशांनी आपल्या टेलिकॉम कंपन्यांना हुआवेचं 5जी मोबाईल नेटवर्क वापरण्यास मनाई केली आहे.
 
हुआवे त्यांची स्वतःची अॅप गॅलरी तसंच इतर सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. स्वतःचं भवितव्य सुरक्षित करण्याच्या दृष्टिनंच हा निर्णय घेतला असावा, असं मत वूड यांनी व्यक्त केलं.
 
हुआवेला बसणार फटका?
 
आगामी काळात पाश्चिमात्य देशांमध्ये हुआवेच्या प्रतिमेला फार मोठा धक्का बसू शकतो.
 
गुगल प्ले स्टोअर, यूट्युब, गुगल मॅप्स यांसारखे फीचर नसलेले अँड्रॉईड फोन विकण्यासाठी कोणतेही दुकानदार तयार नाहीत.
 
पण जर दूरगामी परिणामांचा विचार केला तर भविष्यात स्मार्टफोन उत्पादक गुगलच्या ऑपरेटिंग सिस्टिमला पर्याय शोधू शकतात.
 
हुआवेचा विचार करता त्यांनी अमेरिकन बाजारपेठेतून बाहेर पडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या स्मार्टफोन्समध्ये सध्या त्यांचा स्वतःचा प्रोसेसर आहे. आता त्यांची पुढची पायरी किंवा प्लॅन बी हा स्वतःची ऑपरेटिंग सिस्टिम विकसित करणं असले.
 
आता या सगळ्याचा परिणाम हुआवेच्या सॅमसंग ही कंपनी ताब्यात घेणं आणि 2020 पर्यंत सर्वाधिक खपाचा स्मार्टफोन ब्रँड म्हणून विकसित होणाच्या महत्त्वाकांक्षेला फटका बसेल.