शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 13 नोव्हेंबर 2019 (13:09 IST)

काश्मीरसंदर्भात मजूर पक्षाच्या भूमिकेमुळे युकेतील हिंदू नाराज

आगामी निवडणुकांमध्ये ब्रिटीश हिंदूंची मतं आपल्या विरोधात जाऊ नयेत यासाठी मजूर पक्षाची धडपड सुरू आहे.
 
भारताने काश्मीरसंदर्भात कलम 370 हटवण्याच्या कृतीवर टीका करणारा प्रस्ताव मजूर पक्षाच्या वार्षिक बैठकीत मंजूर करण्यात आला. याच मुद्द्यावर ब्रिटिश हिंदू समाजात असंतोष वाढीस लागला. मजूर पक्ष हिंदूविरोधी आणि भारतविरोधी आहे, अशा बातम्या पसरू लागल्या.
 
प्रमुख हिंदू धर्मादाय संस्थेने टीका केल्यानंतर मजूर पक्षाने स्वत:ला त्या ठरावापासून दूर ठेवत हात झटकले आहेत.
 
भारत आणि पाकिस्तान दोन देश निर्माण झाल्यापासून काश्मीर हा दोन्ही देशांदरम्यानचा धगधगता मुद्दा राहिला आहे. काश्मीर हा आपला भाग असावा असं दोन्ही देशांना वाटतं.
 
काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. हे कलम लागू असल्यानं काश्मीरला स्वत:चे कायदे बनवण्याचा अधिकार होता. काश्मीरचा स्वतंत्र ध्वजही होता.
 
भारताच्या या निर्णयानंतर सप्टेंबर महिन्यात युकेतील मजूर पक्षाने वार्षिक बैठकीत काश्मीरसंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला. काश्मीरमधील नागरिकांच्या मानवताधिकारांवर गदा आल्याचं या प्रस्तावात म्हटलं होतं. काश्मीरमधील नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळायला हवेत, असंही या प्रस्तावात नमूद करण्यात आलं होतं.
 
अशा आशयाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने युकेतील भारतीयांमध्ये मजूर पक्षाप्रती रागाची भावना निर्माण झाली.
 
मजूर पक्षाच्या प्रस्तावाने प्रचंड राग आला आहे. अतिशय नाराज आहे, अशा शब्दांत युकेतील हिंदू कौन्सिलचे चेअरमन उमेश चंदर शर्मा यांनी आपल्या भावना बीबीसी रेडिओ4शी बोलताना व्यक्त केल्या. हिंदूंधर्मीयांच्या भावनांचे रक्षण करणे हे आमचं काम आहे, असं त्यांनी सांगितलं.
 
मजूर पक्षाविरोधात का नाराजी?
युकेतील अनेक हिंदू मतदार मजूर पक्षाचे समर्थक आहेत. मात्र या प्रस्तावानंतर ते कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला मतदान करतील. या प्रस्तावामुळे मजूर पक्षाने युकेतील हिंदूंची नाराजी ओढवून घेतली आहे, यात शंका नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
 
भारतातील सत्ताधारी भाजपने परदेशातील नागरिकांना मजूर पक्षाला मतदान करू नका, असं आवाहन केलं आहे. 12 डिसेंबरला युकेत सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.
 
हिंदू कौन्सिलच्या कार्यक्रमात सदस्यांना मजूर पक्षाला मतदान करू नका, असे व्हॉट्सअप मेसेज पाठवण्यात आले.
 
सारासार विचार न केल्याने मजूर पक्ष काश्मीरसंदर्भात पाकिस्तानच्या प्रचाराला बळी पडला आहे. मजूर पक्ष भारताविरोधात आहे. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचं तसं नाही. असे मेसेज हिंदू संघटनांकडून पाठवले जात आहेत.
 
धर्माच्या नावावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पक्षांच्या प्रचाराला बळी पडू नका असं आवाहन स्लोव्घमधील मजूर पक्षाचे उमेदवार तनमनजीत सिंग धेसी यांनी सांगितलं. शांततामय समाजात व्हॉट्सअपच्या माध्यमातून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हाणून पाडा, असं त्यांनी पुढे सांगितलं.
 
काश्मीरप्रश्नी हिंदूधर्मीयांच्या भावना आम्ही समजू शकतो. वार्षिक बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रस्तावाने भारतीय वंशाच्या हिंदूधर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हे आमच्या लक्षात आलं आहे , असं मजूर पक्षाचे चेअरमन इयन लाव्हेरी यांनी सांगितलं.
 
काश्मीरप्रश्नी आम्हाला मनापासून जे वाटलं ते आम्ही मांडलं होतं. मजूर पक्षाची भूमिका आणि युकेतील हिंदूधर्मीय तसंच भारतीयांच्या भावना वेगळ्या असू शकतात. पण यामुळे युकेतील समाजात तेढ पसरू नये असं त्यांनी सांगितलं.
 
काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील अंतर्गत मुद्दा आहे. काश्मीरप्रश्नी शांततामय मार्गाने तोडगा काढण्यात यावा. हे करताना काश्मीरमधील नागरिकांचे मूलभूत अधिकार जपले जावेत. आपलं भवितव्य काय असावं हे ठरवण्यात त्यांचा सहभाग असावा अशी मजूर पक्षाची भूमिका असल्याचं इयान यांनी सांगितलं.
 
एखाद्या देशाच्या अंतर्गत मुद्यात अन्य देशाने हस्तक्षेप करण्यास लेबर पक्षाचा आक्षेप आहे. भारतविरोधी किंवा पाकिस्तानविरोधी भूमिका स्वीकारणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
युकेत हिंदूधर्मीयांची संख्या एक दशलक्ष एवढी आहे. याबरोबरीने युकेत तीन दशलक्ष मुस्लिम आहेत.
 
रनीमेड ट्रस्ट संस्थेने केलेल्या संशोधनानुसार, 2015 आणि 2017मध्ये मजूर पक्ष हा युकेतील अल्पसंख्याक नागरिकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय पक्ष होता. 2017मध्ये युकेतील 77 टक्के अल्पसंख्याक नागरिकांनी मजूर पक्षाला मतदान केलं होतं.
 
अल्पसंख्याक पाच मतदारांपैकी एकजण मजूर पक्षाला मतदान करतो तर कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या बाबतीत हे प्रमाण 20मध्ये एक असं आहे.