शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (16:36 IST)

Housefull-4: ट्विंकल खन्ना पाहणार नाही अक्षय कुमारचा नवीन सिनेमा कारण...

सुप्रिया सोगळे
अक्षय कुमारचा 'हाऊसफुल-4' सिनेमा दिवाळीत रिलीज झाला. या फिल्मने 100 कोटींचा गल्लाही पार केला, म्हणजे "कमर्शियल हिट सिनेमा"चा ठप्पाही यावर लागला.
 
हा सिनेमा पाहायला लोकांनी जरी सिनेगृहांमध्ये गर्दी केली असली तरी अक्षय कुमारला एका गोष्टीची खंत राहणार आहे - की त्याची पत्नी, बॉलिवुड अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना हा सिनेमा पाहणार नाहीये. किंवा, तिला तो पाहायचा नाहीये.
 
आपण हा सिनेमा पाहणार नसल्याचं ट्विंकलने स्पष्टपणे सांगितल्याचं अक्षय कुमारने बीबीसीशी बोलताना सांगितलं. ट्विंकलला हा सिनेमा पाहण्याची अजिबात इच्छा नाही. तिला या प्रकारची कॉमेडी आवडत नाही, त्यामुळे अशा प्रकारचे सिनेमे पाहणं ती टाळत असते, असं तो म्हणाला.
 
फिल्मबाबतचे वाद
रीलिज झाल्याच्या आठवड्याभरातच हाऊसफुल-4 ने 137 कोटींचा धंदा केलाय. हाऊसफुल सिनेमांच्या मालिकेतला हा चौथा सिनेमा आहे. पण या सिनेमाच्या कमाईचे आकडे फुगवून सांगितल्याचं म्हणत सुरुवातीला वाद निर्माण झाला होता.
पण आरोप फेटाळत अक्षय कुमारने सांगितलं, "फॉक्स-डिस्नेने हाऊसफुल-4 ची निर्मिती केलेली आहे आणि ही काही लहान कंपनी नाही. ही कंपनी कोट्यवधी डॉलर्सचं बजेट असणाऱ्या फिल्म्स बनवते. त्यांच्यासाठी हाऊसफुल-4 ही काही फार मोठी फिल्म नाही. दोन-पाच कोटींसाठी ते खोटं बोलणार नाहीत."
 
मात्र अक्षय सांगतो की "अशा नकारत्मकतेचा माझ्यावर काही परिणाम होत नाही."
 
'कॉफी-विथ-करण' शोमध्ये अक्षय कुमारसोबत रणवीर सिंग सहभागी झाला होता. अक्षय आपला आदर्श असल्याचं रणवीरने तेव्हा सांगितलं होतं. पण फक्त रणवीरच नाही तर नवीन पिढीतले अनेक कलाकार अक्षयला आपला आदर्श मानतात. पण खुद्द अक्षयला मात्र कुणासाठीही 'बेंचमार्क' व्हायचं नाहीये.
 
तो म्हणतो, "नवीन अभिनेत्यांना मला कोणताही सल्ला द्यायचा नाही. ते सगळे हुशार आहेत. मला कोणासाठीही बेंचमार्क व्हायचं नाही. उलट मला त्यांच्या बरोबरीने काम करायचंय. म्हणजे मला आणखी फिल्म्स करता येतील."
 
अनेकदा एखाद्या फिल्मचा सीक्वल करताना त्यामध्ये मूळ फिल्ममधल्या कलाकारांनाच घेतलं जातं. पण अक्षय कुमारच्या अनेक फिल्मचे सीक्वल येत असूनही त्यामधल्या बहुतेकांमध्ये अक्षय नाही.
 
भूलभुलैयाच्या सीक्वलमध्ये कार्तिक आर्यन असेल. अक्षय कुमारचा हिट सिनेमा असणाऱ्या 'नमस्त लंडन'चा सीक्वल सिनेमा - 'नमस्ते इंग्लंड' गेल्यावर्षी आला होता. या सिनेमात अर्जुन कपूरची मुख्य भूमिका होती. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला.
आपल्या हिट फिल्म्सच्या सीक्वलमध्ये नसल्याचा अक्षयला खेद आहे. तो म्हणतो, "मी वेलकम बॅक, नमस्ते इंग्लंडंमध्ये नव्हतो. मला याचं दुःख आहे, पण मी कोणावरही मला घेण्याची जबरदस्ती करू शकत नाही. प्रत्येक फिल्मचं एक नशीब असतं आणि जर ती माझ्या नशीबात असेल, तर मलाच मिळेल."
 
सिनेमा स्वीकारताना अक्षय कुमार काही गोष्टी पाळतो. तो सांगतो, "अभिनेता म्हणून मला स्वतःसाठी आव्हान हवं असतं आणि असं करायची मला संधीही मिळते."