मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 16 सप्टेंबर 2019 (10:22 IST)

काश्मीरमध्ये एक महिला असणं आणि त्यातही एक आई असणं किती कठीण बनलंय?

पुनम कौशल

श्रीनगरमधल्या बहुतेक भागांमध्ये शुकशुकाट आहे. पण इथल्या लाल देड हॉस्पिटलजवळच्या गल्ल्यांमध्ये मात्र वर्दळ आहे.
 
पण बाहेर असलेला तणाव इथेही स्पष्ट दिसतो. श्रीनगरमधलं सगळ्यात मोठं प्रसुतीगृह असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये नव्या जीवांना जन्म देणाऱ्या मातांच्या चेहऱ्यावर आनंदापेक्षा जास्त काळजी आहे.
 
आपल्या नवजात लेकीला छातीशी कवटाळून एक आई सांगते, "माझी मुलगी कठीण काळात या जगात आलीय, अल्लाहने तिला चांगलं आयुष्य द्यावं."
 
तर पहिल्यांदाच आई झालेली समीरा सांगते, "ज्या वातावरणात आम्ही मोठे झालो त्याच वातावरणात आमच्या मुलांनी मोठं व्हावं असं मला वाटत नाही. आता मी माझ्या लेकीला कुशीत घेऊन शांततेसाठी प्रार्थना करते."
 
आकडेवारीकडे पाहात एक डॉक्टर सांगतात, "रोज साधारण 100 बाळांचा इथे जन्म होतोय. आमची पूर्ण तयारी असल्याने यामध्ये अडचण येत नाहीये."
 
हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर गरोदर महिलांना आवश्यक त्या सगळ्या सेवा मिळत असल्या तरी इथे येणं हीच मुळात मोठी अडचण आहे.
 
गरोदर महिलांना येणाऱ्या अडचणी
 
5 ऑगस्टला जम्मू -काश्मीरला असणारा घटनात्मक विशेष दर्जा समाप्त करण्यात आला आणि केंद्र सरकारने भारत प्रशासित काश्मीर खोऱ्यामध्ये कडक निर्बंध लागू केले.
 
याचा फटका सगळ्यांनाच बसतोय, पण याचा सगळ्यांत मोठा परिणाम होतोय महिला आणि लहान मुलांवर.
लाल देड हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वाट पाहणाऱ्या एका गरोदर महिलेने सांगितलं, "खूप अडचणींनंतर आम्ही इथे पोचलो. गाडीमध्ये रुग्ण असूनही आम्हाला ठिकठिकाणी थांबवण्यात आलं. आशा करूयात की लवकरच सगळं ठीक होईल."
 
ग्रामीण भागातून आलेल्या आणखी एका गरोदर महिलेची शुश्रुषा करणारे गृहस्थ सांगतात, "औषधं घेणं आणि चेकअप करून घेणं निर्बंधांमुळे कठीण झालं होतं."
 
काश्मीर खोऱ्यातल्या एका ग्रामीण भागामध्ये दोन महिने राहून परतलेली एक महिला सांगते, "गरोदर महिलांना सगळ्यांत जास्त अडचणी येत आहेत. हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी गाडीही मिळत नाही. फक्त गरोदर महिलाच नाही तर सगळ्याच आजारी लोकांची परिस्थिती वाईट आहे."
 
कोमेजलं बालपण
शाळा बंद असल्याने लहान मुलं घरातच आहेत. झपाझप चालणाऱ्या दोन लहान मुली श्रीनगरच्या एका रिकाम्या गल्लीत भेटल्या.
 
त्यांच्या निरागस चेहऱ्यांवर काळजी होती. त्यांना शाळेत जाता येत नाहीये. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या मुलींनी सांगितलं, "संपामुळे शाळा बंद आहे. सगळीकडे लष्कर आहे. आम्हाला खेळताही येत नाही."
 
"परीक्षा जवळ येतेय. शाळा लवकर सुरू व्हावी, असं आम्हाला वाटतंय."
 
श्रीनगर आणि भागांमधल्या बहुतेक शाळा सुरू झाल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण या शाळांमध्ये मुलं दिसत नाहीत.
 
श्रीनगरच्या जी. बी. पंत हॉस्पिटलच्या बाहेर आपल्या लेकीला मांडीवर घेऊन बसलेली महिला सांगते, "माझ्या लेकीचं भलं व्हावं असं मला वाटतं. तिला भविष्यात चांगलं काहीतरी करता यावं. पण आताची परिस्थिती वाईट आहे. शाळा बंद असल्याने आमच्या मुलांचं शिक्षण थांबलंय. सध्यातरी सगळीकडे आगच आग आहे."
 
महिलांमध्ये वाढता संताप
पुरुष घराबाहेर पडत असले तरी महिला मात्र पूर्णपणे घरात अडकून पडल्या आहेत. त्यामुळे त्यांचा राग आणि संताप वाढतोय.
 
रागातच एका महिलेने सांगितलं, "गरजेच्या वस्तू गोळा करून ठेवायला अधिकाऱ्यांना सांगितलं. पण आम्हाला याची सूचना देण्यात आली नाही. आता आमच्याजवळच्या खाण्यापिण्याच्या वस्तू संपायला आल्यात. आम्ही घरात मरतोय, पण विचारणारं कोणी नाही."
 
"काश्मीर खोऱ्यामध्ये काहीही ठीक नाही. जुलूम इतका वाढलाय की बाळं आता पोटातच दगावायला लागतील. कारण प्रेग्नंट महिलांना हॉस्पिटलमध्ये पोहोचताच येत नाहीये."
 
काश्मीर खोऱ्यामध्ये सगळं काही सामान्य असल्याचं सांगणाऱ्या बातम्यांमुळे त्या मीडियावर सर्वात जास्त नाराज आहेत.
 
भडकून त्या सांगतात, "असं वाटतं की टीव्ही फोडून टाकाव. सरकारने आम्हाला सांगितलं असतं, तर आम्ही आनंदाने भारतासोबत राहिलो असतो."
 
भीती
मोबाईल आणि इंटरनेट सेवांवर निर्बंधी आल्याने त्याचा परिणाम महिलांच्या मानसिक आरोग्यावर झाला आहे. घरातून बाहेर पडलेला पुरुष सुरक्षित असेल की नाही याची काळजी त्यांना लागून राहते.
 
दाल लेकजवळ दुकान चालवणारे एक व्यापारी सांगतात, "लँडलाईन सुरू झाल्यानंतर परिस्थिती काहीशी सुधारली. आधी माझी आई दिवसभर दरवाज्याजवळ बसून मी परतण्याची वाट पाहत असे. आता दिवसातून अनेकवेळा फोन करून परिस्थिती विचारते."
 
काश्मीरमध्ये महिलांसाठी परिस्थिती आधीही कठीण होती पण आता परिस्थिती असह्य झालीय. गेल्या काही आठवड्यांपासून घराच्या चार भिंतींमध्ये बंदिस्त राहिलेली एक महिला इतकंच म्हणाली, "आमचा जीव गुदमरतोय. घराबाहेर डोकावून पाहिलं तर फक्त शुकशुकाटच दिसतो."
 
गेल्या दहा वर्षांपासून लंडनमध्ये राहणारी हिबा तिच्या आई-वडिलांची चौकशी करण्यासाठी श्रीनगरला आलीय. अनेक प्रयत्नांनंतरही तिचा तिच्या आई-वडिलांशी संपर्क होऊ शकला नव्हता.
तिच्या वडिलांनी अखेरीस एका सीआरपीएफ अधिकाऱ्याच्या फोनवरून दिल्लीमधल्या त्यांच्या एका नातेवाईकाला फोन केला. त्या नातेवाईकाने नंतर दुसऱ्या फोनवरून हिबाला वडिलांचा आवाज ऐकवला.
 
ती म्हणते, "सोशल मीडियावर काहीही लिहू नकोस असं मला माझ्या अब्बांनी सगळ्यांत आधी सांगितलं. त्यांना माझ्या सुरक्षिततेची काळजी होती आणि मला त्यांच्या."
 
हिबा म्हणते, "यानंतर माझा माझ्या घरच्यांशी संपर्क झालेला नाही. माझ्या वडिलांना मधुमेह आहे. त्यांच्याजवळ पुरेशी औषधं आहेत की नाही हे मला माहीत नव्हतं."
 
"प्रत्यक्ष परिस्थिती मला वाटली त्यापेक्षा बरीच वाईट आहे. माझी आजी हॉस्पिटलमध्ये आहे. मी तिला भेटायला गेले तेव्हा रस्त्यात किमान दहा वेळा मला थांबवण्यात आलं. कर्फ्यू नसूनही आम्हाला थांबवण्यात आलं कारण त्यांना रस्त्यावर कोणत्याही प्रकारची वर्दळ नको होती. मला माझ्या आजीला भेटता आलं नाही."
 
काश्मीरमध्ये संधी उपलब्ध नसल्याने काश्मीर सोडल्याचं हिबा सांगते. ती म्हणते, "हे आमचं काश्मीर नाही. मला माझं बालपण आठवतंय. संध्याकाळी साडेपाच वाजता माझ्या घराचे दरवाजे बंद होत."
 
आपली चुलत बहीणही सध्या अडचणीत असल्याचं हिबा सांगते. ती म्हणते, "काल रात्री मी माझ्या चुलत बहिणीशी बोलत होते. ती सातवीत आहे. तिला तिच्या भविष्याची काळजी वाटतेय. तिचं सिलॅबस पूर्ण झालेला नाही आणि शाळा बंद आहे. शाळा, मित्र-मैत्रिणी, अभ्यास या सगळ्याचीच तिला आठवण येतेय. हे सगळं महत्त्वाचं आहे कारण तिला शाळेत जाता येत नाही."
 
"गेली 10 वर्षं मी लंडनमध्ये आहे. पहिल्यांदाच भारताबाहेर काश्मीरवर इतकी चर्चा होतेय. जगातली सर्वांत मोठी लोकशाही असल्याच्या भारताच्या दाव्यावर लोक सवाल करतायत." हिबा सांगते.
 
युगुलांच्या अडचणींमध्ये वाढ
संपर्क सेवा बंद झाल्याचा परिणाम प्रेमी युगुलांवरही झालाय.
 
पत्र लिहून आपली ख्याली-खुशाली मैत्रिणीला देत असल्याचं श्रीनगर एअरपोर्टजवळ काम करणाऱ्या काही तरुणांनी सांगितलं.
 
आपल्या प्रेमिकेला लिहिलेल्या पत्रात एक तरूण म्हणतो, "तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क होऊ शकत नाही, याची मला जाणीव आहे. पण ज्याप्रकारे तू मला सोडून गेलीस ते योग्य नव्हतं. मी तुझी अडचण समजू शकतो. मी इतकंच सांगायला हे पत्र लिहितोय की मी आता मॅनेजर झालोय. आणि आता मी तुझी काळजी घेऊ शकतो. मी अगदी स्पष्टपणे सांगतो - माझं तुझ्यावर प्रेम आहे."
 
मोबाईल्स बंद असल्याने तिथल्याच अजून एका तरुणाचं त्याच्या प्रेयसीसोबत बोलणं होऊ शकलेलं नाही. तिच्याशी नेमकं कधी बोलता येईल हे त्याला माहीत नाही.
 
तो इतकंच बोलू शकला, "सरकारच्या या निर्णयामुळे माझ्या प्रेम कहाणीचा शेवट झाला. ती कशी आहे, काय करतेय हे मला माहीत नाही.