शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 16 सप्टेंबर 2019 (11:34 IST)

बीएस-6 मुळे वाहन उद्योगात मंदी या दाव्यात किती तथ्य?

वाहनांची मागणी घटण्याबरोबरच प्रदूषण नियंत्रणासाठी बीएस-6 नियम लागू करण्यानेही वाहन उद्योगात मंदी आली असावी असा अंदाज बांधला जात आहे.
 
वाहन उद्योगात मंदी येण्यामागील कारणांमध्ये बीएस-6 सुद्धा असल्याचं मत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (10 सप्टेंबर) व्यक्त केलं.
 
सध्याच्या बीएस-4 नंतर बीएस-5च्या ऐवजी थेट बीएस-6 नियम 31 मार्च 2020 नंतर लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणजेच केवळ याच नियमांतर्गत तयार झालेली वाहनं कंपन्यांना विकावी लागणार आहेत.
 
2000 मध्ये भारत सरकारनं युरोपीय मापदंडानुसार उत्सर्जन मापदंड नीती तयार केली आणि 2002मध्ये बीएस-1 (भारत स्टेज-1) लागू केले.
 
नव्या मापदंडांत अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. यातल्या नव्या नियमांनुसार इंजिन तयार केले जातील तसेच त्या मापदंडांनुसार इंधन वापरलं जाईल
 
पण उत्सर्जन मापदंडांना लागू करण्यासाठी जो संक्रमणकाळ दिला आहे त्यावरून वाहन उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत.
 
एन्वेंट्री करेक्शन काय आहे?
गेल्या जून महिन्यातच मारुती सुझुकीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ केनिची आयुकावा म्हणाले होते, "या संक्रमणकाळात काही चढ-उतार दिसतील त्यामुळे मागणीमध्ये घट दिसेल. बीएस-6 जोपर्यंत लोकांसाठी सवयीचे होत नाही तोपर्यंत त्याचे परिणाम दिसतील. याला काही काळ लागेल."
 
ते म्हणाले, "इतक्या वेगाने आणि साहसी पद्धतीने कोणत्याही देशाने प्रदुषणाचे मापदंड लागू केले नाहीत. अगदी जपाननेसुद्धा"
याप्रकारचे तंत्रज्ञान आणण्यासाठी भरपूर गुंतवणूक करावी लागेल आणि त्यामुळे गाड्यांच्या किंमती वाढतील असेही ते म्हणाले.
 
वाहन उत्पादकांची संस्था सियाम म्हणते,"ऑगस्ट महिन्यात पॅसेंजर वाहनं आणि व्यावसायिक वाहनं तसेच कारच्या विक्रीमध्ये मोठी घट नोंदवली गेली आहे. वाहन उद्योगाच्या क्षेत्रात सलग 9 महिने घट नोंदवली गेली आहे."
 
सियामच्या एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितले, "या क्षेत्रामध्ये झालेल्या घसरणीसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. बीएस-6 संक्रमण काळ सुद्धा त्या कारणांपैकी एक आहे. कारण यामुळे कंपन्यांना आपल्या उत्पादनांना नव्या तंत्रज्ञानाशी अनुरूप बनवावे लागत आहे."
 
ते म्हणाले, "यामुळे जुन्या मापदंडांनुसार तयार होणाऱ्या गाड्यांचे उत्पादन आम्ही करत आहोत. त्याला इन्वेंट्री करेक्शन म्हटलं जातं. प्रदूषण मापदंड बदलल्यावर ते केले जाते. 31 मार्चची तारीख येईपर्यंत थोडं इन्वेंट्री करेक्शन झालेलं असेल."
 
डिझेल गाड्या पूर्णतः बंद करण्याची बातमी आल्यामुळे बाजारात गाड्यांच्या मागणीत घट झाली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण तयार झाले, असंही ते म्हणाले.
 
प्रदूषण करणाऱ्या वायूंना रोखणार बीएस-6
इंटर्नल कंबशन इंजिनमधून कार्बन डाय ऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, हायड्रोकार्बन और नायट्रोजन ऑक्साइड सारखे घातक वायू तयार होतात. त्याचप्रमाणे डिझेल आणि डायरेक्ट इंजेक्शन पेट्रोल इंजिनमधून पर्टिक्युलेट मॅटर (पीएम) तयार होतात.
 
प्रदूषण कमी करण्यासाठी इंधन जाळणाऱ्या चेंबरमध्ये सुधारणा केली जाते. त्यामुळे बायप्रॉडक्ट्स कमी बाहेर पडतात.
 
त्याचप्रमाणे पर्टिक्युलेट मॅटर आणि नायट्रोजन ऑक्साईडसारख्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं.
 
बीएस-4 मधील इंधनात सल्फरचे प्रमाण प्रतिकिलो 50 मिलीग्राम असायचं आता बीएस-6मध्ये 10 मिलिग्राम असेल.
 
बीएस-4च्या तुलनेत बीएस-6 मध्ये नायट्रोजन ऑक्साईडचं उत्सर्जन पेट्रोल इंजिनमध्ये 25 टक्के आणि डिझेल इंजिनमध्ये 68 टक्के कमी असेव. डिझेल इंजिनमदील पर्टिक्युलेट मॅटरचं प्रमाण 82 टक्क्यांनी कमी असेल. तसेच पर्टिक्युलेट मॅटरच्या नियंत्रणासाठी डायरेक्ट इंजेक्शनवाल्या पेट्रोल इंजिनला पहिल्यांदाच या मापदंडांत आणलं गेलं आहे.
 
बीएस-4मध्ये पेट्रोल आणि डीझेल इंजिनांसाटी वेगवेगळे मापदंड होते. आता त्यातले अंतर अगदी कमी होईल.