मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 16 सप्टेंबर 2019 (10:32 IST)

पंकजा मुंडे: एकनाथ खडसे पुढच्या मंत्रिमंडळात दिसावेत, अशी इच्छा

प्राजक्ता पोळ
एकनाथ खडसे यांच्यावर कथित जमीन व्यवहारात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणात त्यांना क्लीन चीटही मिळाली होती. एकनाथ खडसे मंत्रिमंडळात पुन्हा यावेत असं तुम्हाला वाटतं का, असं विचारलं असता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
 
"एकनाथ खडसे हे पुढच्या मंत्रिमंडळात दिसावेत, अशा त्यांना शुभेच्छा आणि तशी इच्छाही व्यक्त करते. त्यांनी मंत्रिमंडळात असावं, असं मला वाटतं," असं राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
 
खडसेंवर अन्याय झालाय का, या प्रश्नाला उत्तर देणं मात्र त्यांनी टाळलं. त्या म्हणाल्या, "नाथाभाऊंवर अन्याय झाला की नाही, हे बोलण्याच्या रोलमध्ये मी नाही. पण त्यांच्या बाबतीतले विषय मार्गी लागावे आणि त्यांनी आमच्यासोबत यावं, असं मला वाटतं."
 
बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. भाऊ धनंजय मुंडे यांच्यापासून ते अगदी भाजपमधील इनकमिंगबद्दलही आपली भूमिका मनमोकळेपणानं मांडली.
 
'वडील गेल्यानंतर ढोलताशे घेऊन मैदानात उतरायचं का?'
पंकजा मुंडे या सहानुभूतीच्या नावानं मतं मागतात, या धनंजय मुंडेंच्या आरोपावर उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "एखाद्या मुलीचे वडील वारल्यानंतर तिनं काय हसत, ढोलताशे वाजवत मैदानात उतरायचं का? आठवण आल्यावर दोन शब्द बोलायचे नाही का?"
 
त्या पुढे म्हणाल्या, "सहानुभूती घेण्याचा प्रश्न नाही, लोकांची सहानुभूती आहेच. सहानुभती देखील त्याच लोकांना मिळते ज्यांचे जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध असतात."
 
"धनंजय मुंडेंच्या कुठल्याच विधानाला मी सिरियसली घेतलं नाही. त्यांचा अजेंडा एकच होता, तो म्हणजे आरोप करणं, तो पाच वर्षे त्यांनी चांगला निभावलाय. धनंजय मुंडे यांचंही भाषण मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. मुंडेसाहेब जीवंत असताना धनंजय मुंडे आग ओकत असत."
 
'पक्षप्रवेशासाठी फिल्टर असावं'
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसात लक्षणीय संख्येनं वाढलीय. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय डावपेचांचा दाखला दिला.
 
त्या म्हणल्या, "मुंडे साहेबांचं एक वाक्य नेहमी असायचं की, बेरजेचं गणित केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनीही मुंडेसाहेबांसोबत काम केलंय. ते देखील हेच करत आहेत. स्थिर सरकार देणं हे आमचं दायित्व आहे."
 
त्या पुढे म्हणाल्या, "ज्या ठिकाणी आमचा कधीच स्पर्श झाला नाही, तिथला नेता जर त्याच्या पक्षाला कंटाळून किंवा लोकांसाठी आमच्याशी जोडला जात असेल, तर स्वागत आहे. त्यासाठी एक फिल्टर असावं आणि आहे. त्या फिल्टरमधून आले तर ते आमच्याबरोबर फिट होतील."
 
'...तर युतीसाठी उद्धव ठाकरेंशी नक्की बोलेन'
पंकजा मुंडे म्हणतात, "युतीत सर्व आलबेल आहे. युतीमध्ये सलोखा आहे. आमच्यात कुठल्याही शाब्दिक अडचणी नाहीत. युतीशी बोलण्याची जबाबदारी माझ्याकडं नाहीय, पण युती झाली पाहिजे. युती होईल असं वाटतंय, व्हावी असतं वाटतंय. लोकसभेत युती होती आणि त्यामुळं युती झाली तर एका विचारांची ताकद एकत्र राहील."
 
शिवाय, ज्या पद्धतीनं लोकसभेत एकत्र गेलो, तसं विधानसभेत एकत्र गेलो, तर आम्हाला विरोधक राहील का, असाच प्रश्न मला पडलाय, असंही त्या म्हणाल्या.
 
युती होण्यास काही अडचणी आल्या आणि उद्धव ठाकरे आणि तुमचे चांगले संबंध पाहता तुम्ही युतीबाबत त्यांच्याशी बोलाल का, या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, "पक्षानं जबाबदारी दिली पाहिजे. माझे संबंध सगळ्या पक्षांशी चांगले आहेत. उद्धव ठाकरेंशी माझे वैयक्तिक संबंध आहेत. मी त्यांना दादा म्हणते. सगळं जग त्यांना साहेब म्हणतं. पक्षानं त्यांच्याशी बोलायला सांगितलं, तर मी नक्कीच बोलेन."
 
'डिस्टिंक्शनमध्ये आलेय, मेरिटमध्ये यायचंय'
"लोकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणं, हे एखाद्या नेत्याचं ध्येय असू शकतं. पण ते कधीही पूर्ण होत नसतं, कारण जेव्हा एक अपेक्षा पूर्ण करतो, त्याचवेळी दुसरी अपेक्षा निर्माण होत असते. मात्र, ज्या प्रमुख अपेक्षा होत्या, त्या पूर्ण करू शकले म्हणून मी इथवर येऊ शकले," असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
 
त्या म्हणाल्या, "परफॉर्मन्स सुद्धा चांगलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनेक पुरस्कार मिळालेत. माझ्या अखत्यारित असलेल्या खात्यांमध्ये सुद्धा 20-25 योजना नव्यानं आणल्या आणि सगळ्या योजना हिट झाल्या. म्हणजे सरपंचाची थेट निवड असेल, सरपंचांचं मानधन वाढवणं असेल, अंगणवाडी सेविकांच मानधन वाढवणं असेल, भाग्यश्री योजना, जलयुक्त शिवार योजना, राज्य सरकारच्या ज्या लोकप्रिय योजना ठरल्या, त्यात मला योगदान देता आलं. डिस्टिंक्शनमध्ये गेलोय, असं म्हणायला हरकत नाही, पण मेरिटमध्ये यायला हवं."
 
यावेळी पंकजा मुंडे यांनी दुष्काळमुक्तीच्या आश्वासनावरही आपलं मत मांडलं. त्या म्हणाल्या, "दुष्काळावर मात करणं हे पुढचं पहिलं ध्येय आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणं हे माझ्या जीवनातलं एकमेव ध्येय आहे."
 
"एका-एका थेंबासाठी लोकांना तडफडताना पाहिलंय. मी कोल्हापुरातही जाऊन आले. एकीकडे लोक पाण्यात बुडून त्रासली आहेत, दुसरीकडं एका थेंबासाठी त्रासली आहेत. या स्थितीकडं आम्हाला लक्ष द्यावं लागेल. पण ती कामं एक-दोन वर्षात होणारी नाही. त्यासाठी चार-पाच वर्षांचं टार्गेट ठेवायचंय. त्यामुळं पुढचं पंचवार्षिक दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं असणार आहे," असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.