गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 29 जुलै 2021 (11:21 IST)

ऐन निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय झालेल्या राज ठाकरेंचा मनसेला किती फायदा होईल?

- दीपाली जगताप
"काल पण माझेच फोटो आणि आज पण, किती वेळा तेच तेच...मी काय कुंद्रा आहे का?" असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार आणि छायाचित्रकारांना टोला लगावला.
 
संघटनात्मक बैठकांसाठी ते तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून सध्या मोर्चेबांधणी केली जात आहे.
 
गेल्या आठवड्यातही राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. महापालिका निवडणुकांसाठी अवघे काही महिने असल्याने संघटनात्मक बांधणीसाठी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. दरम्यान, मनसे नेते अमित ठाकरे हे सुद्धा नाशिक दौऱ्यावर आहेत.
 
राज ठाकरे यांनी गेल्या काही काळात नाशिक, ठाणे आणि पुणे येथे बैठका घेतल्या. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय झालेल्या राज ठाकरेंचा मनसेला किती फायदा होईल असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे?
 
राज ठाकरे काय साध्य करू पाहत आहेत?
राज ठाकरे यांच्या उपस्थितीतच शाखा अध्यक्षांच्या नेमणुका करण्यात येत आहेत. यासाठी पक्षाचे शाखाध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, पदाधिकारी यांच्या मुलाखती घेणार आहेत. याआधी त्यांनी पुणे दौऱ्यात विधानसभानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन संवाद साधला होता.
 
जो शाखाध्यक्ष चांगलं काम करेल त्याच्या घरी आपण जेवायला जाऊ असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. पुणे महानगरपालिकेत मनसेचे 2 नगरसेवक आहेत.
 
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक यावेळी चुरशीही होणार असल्याचं चित्र आहे. एकाबाजूला काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे, नाना पटोले याठिकाणी सक्रिय झाले आहे आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत असणार आहे. शिवाय, भाजपचे आव्हान समोर आहे.
 
पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित सांगतात, "राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व पाहता त्यांना प्रसिद्धी चांगली मिळते पण तेवढ्यावर कोणताही पक्ष उभं राहत नाही. पुण्यात मनसेचे कुठल्याही प्रकारचे ग्राऊंड वर्क दिसत नाही. त्यासाठी वर्षांनुवर्षं जी संघटनात्मक फळी तयार करावी लागते ती सुद्धा मनसेकडे नाही. त्यामुळे राज ठाकरे यांचा चेहरा प्रसिद्धी तर मिळवून देऊ शकतो पण त्याचा प्रत्यक्ष निवडणुकीत फारसा फायदा होईल असं सध्यातरी वाटत नाही."
 
पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने सुद्धा कंबर कसली आहे. आगामी निवडणुकांसाठी तिन्ही पक्ष स्पर्धेत आहेत. नाना पटोले, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे प्रमुख चेहरे असणार आहेत.
 
प्रशांत दीक्षित सांगतात, मनसेचे काही मोजके उमेदवार व्यक्तिगत कामाच्या आधारे निवडून येऊ शकतात. पण हा अंदाज आताच सांगणं घाईचं ठरेल. अजून बऱ्याच गोष्टी समोर येतील.
 
ते पुढे सांगतात, "राजकारणात चेहरा दिसावा लागतो. तो नसेल तर तुम्ही मागे पडता. ही प्रत्येक पक्षाची गरज आहे. पक्षाचं अस्तित्व दाखवणे ही पक्षाची गरज आहे. मध्यमवर्गीय मानसिकतेला आवडेल त्यापद्धतीने मुलाखती, विकास आराखडे अशी मोर्चेबांधणी मनसेने सुरू केली आहे. त्याचा शहरात काही ठिकाणी फायदा होईल पण हा प्रतिसाद निवडणूक जिंकून देणारा ठरेल का? हा प्रश्न आहे."
 
राज ठाकरे यांनी ठाण्यातही कार्यकर्त्यांची नुकतीच आढावा बैठक घेतली. निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
 
मनसेला याचा फायदा होईल असं ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात. ते म्हणाले, "मनसे महापालिका निवडणुकांमध्ये उतरणार हे स्पष्ट आहे. ते ऐनवेळी तयारी करत आहेत असं म्हणता येणार नाही पण मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
 
"कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत हे चांगलं लक्षण आहे. ठाण्यात शाखाध्यक्ष नियुक्त करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. याची नीट अंमलबजावणी केली आणि योग्य व्यक्तींना संधी दिली, पक्षाचे गटतट आणि संघर्ष टाळला तर निश्चित मनसेला याचा फायदा होऊ शकतो," प्रधान सांगतात.
 
राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यानंतर अमित ठाकरे आता नाशिकमध्ये आहेत. ते दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. फेब्रुवारीमध्ये होऊ घातलेल्या पालिका निवडणुकांसाठी अमित ठाकरे यांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे.
 
नाशिकमध्ये ते कार्यकर्ते, पदाधकारी यांच्यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकांचा आढावा अहवाल ते मनसे अध्यक्षांना पाठवणार असल्याचे समजते. तसंच नाशिक महापालिकेची जबाबदारी सुद्धा अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात आल्याची चर्चा आहे.
 
"सध्यातरी आमच्याकडे कोणाकडूनही प्रस्ताव आलेला नाही. नाशिकमध्ये मनसे स्वबळावर निवडणूक लढेल, गेल्या पाच वर्षांत नाशिककरांची निराशा झाली आहे. अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मनसे कमबॅक करेल," अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
 
मनसे आणि भाजप एकत्र येणार?
महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेपासूनच मनसे आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. गेल्या काही काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी होत असल्याचंही चित्र दिसलं.
 
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने भाजपला मनसेची गरज असू शकते. पण काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याने याचा फायदा भाजपला होईल अशी सुद्धा भाजपची भूमिका असू शकते असं प्रशांत दीक्षित सांगतात.
 
पुण्यातील काही शहरांमधील जागांसाठी दोन्ही पक्षांत अप्रत्यक्ष युती होऊ शकते. भाजपसाठी कठीण असणाऱ्या जागांमध्ये ते तडजोड करतील पण आताच काही निश्चित सांगता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
मुंबई आणि ठाण्यातील परिस्थिती पाहता शिवसेनेच्या मराठी मतदारांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपला मनसेचा फायदा होऊ शकतो.
 
"मनसे आणि भाजपने हातमिळवणी केली तर मनसेला नवसंजीवनी मिळू शकते. राज ठाकरे आपल्या भाषणांच्या क्लीप भाजपला पाठवतात त्यामुळे कुठेतरी चर्चेला सुरुवात झाली असे म्हणता येईल. पण भाजप मनसेसोबत युती करणार का हा निर्णय राज्यातील नेते घेत नाहीत, त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय पातळीवर नेमका काय होतो हे महत्त्वाचं आहे," असं संदीप प्रधान सांगतात.
 
राज्यातील पूरपरिस्थितीसंदर्भात जशी भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली त्याचप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा राज्य सरकारवर निशाणा साधला.
 
सरकारचे धोरण आणि नियोजन नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचं ते म्हणाले. त्यामुळे विरोधक म्हणून भाजप आणि मनसे एकच भूमिका घेताना दिसतात.
 
परंतु बिहार आणि उत्तर भारतातील निवडणुका मनसे आणि भाजपच्या युतीत अडथळा ठरू शकतात त्यामुळे मनसेशी युती महाग पडणार नाही ना? असा विचार भाजप पक्षश्रेष्ठी करणार असं संदीप प्रधान सांगतात.
 
ते म्हणाले, "राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांसंदर्भातील भूमिका जाहीर आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांआधी राज ठाकरेंसोबत जाताना भाजपचे नेतृत्व विचार करेल. पण अप्रत्यक्ष युतीची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. मनसेच्या प्रबळ जागा आहेत त्याठिकाणी भाजप प्रबळ उमेदवार देणार नाही आणि भाजपच्या जागांसाठी मनसे सुद्धा उमेदवार देणार नाही अशा पद्धतीने एकत्र येणं शक्य आहे का? असा विचार होऊ शकतो," असंही ते सांगतात.
 
राजकीय रणनीती
2009 मध्ये मनसेला मोठं यश मिळालं होतं पण ते कायम राखण्यात मनसेला फारसं यश आलं नाही. कालांतराने विधानसभेत एक आमदार आणि महानगरपालिकांमध्येही संख्याबळ कमी झालं.
 
महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर मनसे हिंदुत्वाची भूमिका घेत असताना दिसली. पक्षाच्या वर्धापनदिनी झेंडा बदलण्यात आला. दरम्यानच्या काळात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणारं पत्र सुद्धा लिहिलं होतं. भाजपचे नेते आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या भेटीची सुद्धा चर्चा रंगली. पण त्यापुढे अद्याप हालचाली दिसल्या नाहीत.
 
विरोधक म्हणून भाजपसोबत मनसेने ठाकरे सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनमधील निर्बंधांवरून मुंबई मनसे आक्रमक होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून कारभार चालवतात अशी टीका सुद्धा मनसे नेत्यांकडून करण्यात आली. यासंदर्भात मनसेने सर्वेक्षण सुद्धा केले.
 
याकाळात राज ठाकरे यांनी अनेक संघटनांच्या भेटीगाठी घेतल्या. सप्टेंबर महिन्यात डॉक्टर्स संघटना, डबेवाले, रिक्षाचालक संघटना, वीज बिल प्रश्न, जिम उघडण्याची मागणी, मंदिरं खुली करण्याची मागणी अशा अनेक मुद्यांसाठी मनसेने भूमिका घेत राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला होता.
 
येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे नेमका काय निर्णय घेणार हे पहावं लागेल.