सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019 (12:52 IST)

'मी माझ्या सासूच्या पार्थिवाला खांदा दिला, कारण...'

नामदेव अंजना
"सासूबाईंशी बोलताना मस्करीतही बोलता यायचं. अगदी जिवलग मैत्रीण असावी तसं. इतकं मनमोकळं बोलता यायचं की, ना त्या सासू वाटायच्या, ना आम्हाला कधी सासरी असल्यासारखं वाटे. त्यांनी आम्हा सुनांना अगदी माहेरचं सुख दिलं."
 
सुंदरबाई नाईकवाडेंच्या थोरल्या सून लता नाईकवाडे आपल्या सासूबाईंबद्दल सांगत होत्या. दु:खाचा आवंढा गिळत त्यांनी बीबीसी मराठीशी सासूसोबतच्या मायेच्या नात्यातल्या आठवणी जागवल्या.
 
बीडच्या पांगरी रोडवरील काशिनाथ गिरम नगरमधील सुंदरबाई नाईकवडे यांचं 9 सप्टेंबरला वृद्धापकाळानं वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर सुंदरबाईंच्या पार्थिवाला चार सुनांनी खांदा दिला आणि सगळीकडूनच या क्रांतिकारी पावलाचं स्वागत करण्यात आलं.
 
सुंदरबाईंच्या अंत्ययात्रेत धाय मोकलून रडणाऱ्या सुनांनी आपल्या सासूसोबतच्या आठवणी बीबीसी मराठीसोबत बोलताना व्यक्त केल्या.
 
"कुणी आजूबाजूचे लोक किंवा नातेवाईक आले, तर आम्हा सासू-सुनांचं नातं पाहून आश्चर्य व्यक्त करायचे. मात्र त्यावेळीही सासू त्यांच्या आश्चर्याला हसण्यावारी सोडून देत. सुना असूनही त्या आमचा आदर करायच्या" असं लता नाईकवाडे सांगतात.
 
सुंदरबाई नाईकवाडे या शेवटपर्यंत मोठ्या मुलाच्या घरात म्हणजे नवनाथ नाईकवाडेंच्या राहायच्या. लता या नवनाथ नाईकवाडेंच्या पत्नी. लता आणि नवनाथ यांचं लग्न 1990 साली झालं. त्यामुळं सुंदरबाईंचा सुमारे 30 वर्षांचा सहवास लता यांना लाभला.
 
लता सांगतात, "आमची सासू जरी जुन्या काळातली असली, तरी त्यांचे विचार एखाद्या पीएचडी झालेल्या महिलांचे नसतील एवढे मोठे होते. सहकार्याची, दान करण्याची, कुणाच्याही मदतीला धावून जाण्याची भावना त्यांच्या मनात होती."
 
"आम्ही त्यांच्याकडून खूप शिकण्याचा प्रयत्न केला. त्यांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. यांचे विचार इतके उदात्त कसे याचंच आम्हालाच आश्चर्य वाटतं. त्यांच्याइतकं आम्ही होऊ शकत नाही, असं वाटतं कधी कधी." असंही लता म्हणतात.
 
सुंदरबाई यांना दोन सख्खी आणि दोन सावत्र मुलं. मात्र, लता नाईकवाडे सांगतात की, "त्यांनी कधीच सख्खं-सावत्र केलं नाही. म्हणूनच आम्ही चौघीजणी मागे-पुढे न पाहता खांदा द्यायला पुढे आलो."
लता नवनाथ नाईकवाडे, उषा राधाकिसन नाईकवाडे, मनिषा जालिंदर नाईकवाडे आणि मीना मच्छिंद्र नाईकवाडे अशा सुंदरबाईंच्या चार सुना.
 
"आम्हा सुनांमध्ये एकाच आईची लेकरं असल्यासारखं नातं आहे. सासूबाईंनी मुलीसारखं प्रेम केलं. रागवायच्या पण तेही आमच्या भल्यासाठी असे. त्यांचं ऋण तर फेडू शकत नाही, पण पार्थिवाला खांदा देऊन त्यांचाप्रती असलेला आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला." असं उषा नाईकवाडे सांगतात.
 
सासूसोबतची एक आठवण सांगताना काहीशा भावनिक होत उषा नाईकवाडे म्हणाल्या, "मी एकदा केस कापले होते. तर आजूबाजूंच्या काहीजणांनी सासूला विचारलं, तुम्ही सुनेला काही बोलत नाही का वगैरे. तर सासूबाईंनी त्यांना ठणकावून सांगितलं होतं, की माझ्या लेकाला आणि सुनेलं पटतंय ना, मग मला हरकत नाही."
"मी आणि माझा नवरा (राधाकिशन) कामानिमित्त गुजरातमधल्या वापीला राहतो. वर्षातून बीडमध्ये फेऱ्या असायच्या. मात्र, इकडे आल्यावर परतताना त्यांना प्रचंड रडायला यायचं. तिकडे गेल्यानंतरही त्यांना आमची प्रचंड काळजी असायची." असं उषा सांगतात.
 
"कधीच काही ताण असेल, तरी त्या आईच्या नात्यानं समजावून सांगायच्या. आम्हा नवरा-बायकोचं भांडण असलं तरी सांगायच्या, की चार दिवसाचंच भांडण असावं, जास्त वाढवू नये." असं उषा सांगतात.
 
'जिवंत माणसांमध्ये त्यांनी देव पाहिला'
उषा अभिमानानं सांगतात, की "त्यांनी कधी देवपूजा नाही केली, त्यांनी जिवंत माणसामध्ये देव पाहिला. कोणत्याही पाहुण्याला जेवल्याशिवाय पाठवायचे नाहीत."
 
"सासूबाईंच्या पार्थिवाला खांदा लावताना कोण काय बोलेल, याचा विचारच आमच्या मनात आला नाही. आम्ही कुणाचं ऐकलं नाही. आम्ही खांदा देणार हे आम्ही ठरवलं. यामुळं पुढं काय झालं तर ते आम्हाला होईल. तसंही अंधश्रद्धेला खतपाणी घालतच नाही." असं लता नाईकवाडे सांगतात.
 
लता पुढे म्हणतात, "आमच्या सासूबाईसुद्धा कधी तासंतास देवपूजा करत राहिल्या नाहीत. माणसांमध्ये त्यांनी देव पाहिला. माणसांची पूजा केली. गरजवंतांना हातभार लावला."
 
खंबीरपणे उभं राहायचं, साथ द्यायची, कुणासाठीही धावून जायचं, हे सासूबाईंकडून शिकले, असं लता नाईकवाडे सांगतात. त्या पुढे म्हणतात, "आम्ही आमच्या मुलांनाही हेच आम्ही शिकवणार. लोकांनी नावं ठेवली तरी चालेल, पण लोकांनी केलं म्हणून आपण करायचं नाही. अंधश्रद्धेपासून तर आमची मुलंही दूर आहेत."
 
"... मग उंबरठ्याबाहेरील रस्त्यालाही भीत नाही"
 
सुंदरबाईंचा थोरला मुलगा नवनाथ नाईकवाडे यांच्याशी बीबीसी मराठीनं संवाद साधला, त्यावेळी नाईकवाडे कुटुंबाचे पुरोगामी चळवळीशी असलेलं नातंही उलगडलं.
 
नवनाथ नाईकवाडे हे सामाजिक चळवळींशी जोडलेले आहेत. अण्णा हजारेंच्या कार्याशी 20 वर्षांपासून, तर बाबा आढावांसोबत असंघटित क्षेत्रातील कामातही नवनाथ नाईकवाडे सक्रीय राहिलेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीशीही त्यांचा जवळचा संबंध आहे.
 
सुंदरबाई यांचं निधन झालं, त्यावेळी आईच्या पार्थिवाला सुनांनी खांदा द्यावा, असं पहिल्यांदा नवनाथ नाईकवाडे यांनीच सुचवलं. केवळ हे सांगून ते थांबले नाहीत, त्यांनी त्यांच्या पत्नीसह इतर भावांच्या पत्नींनाही समजावलं आणि क्रांतिकारी पावलासाठी तयार केलं.
 
नवनाथ नाईकवाडे सांगतात, "आईच्या पार्थिवाला सुनांनी खांदा देण्याचा निर्णय घेतला आणि घरात एकदा निर्णय घेतला, तर उंबरठ्याबाहेरील रस्त्याला पण मी भीत नाही."
"आमच्या घरातील स्त्रियांनी घेतलेला निर्णय शहरात घेणं सोपं जातं. आम्ही बीड शहरात राहतो. त्यामुळं तसं निमशहर असलं तरी शहरच आहे. ग्रामीण भागात निर्णय घ्यायला कठीण जातं. गावाकडं थोडं भावकी वगैरे मुद्दा येतो. मग थोडा दबाव येतो." असं सामाजिक कामातील अनुभव गाठीशी असलेले नवनाथ नाईकवाडे सांगतात.