बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जून 2020 (21:48 IST)

भारत चीन संघर्ष : गलवानमध्ये नेमकं काय घडलं? तुम्हाला पडलेल्या 6 प्रश्नांची उत्तरं वाचा

भारत आणि चीनच्या सीमेवर मे महिन्यापासून तणावाची स्थिती निर्माण झाल्याचं वृत्त येत आहे. 15 आणि 16 जूनला दोन्ही देशांच्या जवानांमध्ये झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे.
 
पण हे नेमकं काय घडतंय, त्याचा अर्थ काय आहे? गलवान खोरं नेमकं काय आहे? किती चिनी जवान मारले गेले? यांसारख्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न बीबीसीनं केला आहे.
 
1) गलवान खोऱ्यात 15 आणि 16 जूनला नेमकं काय घडलं होतं?
15 आणि 16 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी जवानांसोबत झालेल्या हिंसक चकमकीत भारताच्या एका कर्नलसह 20 जवान शहीद झाले. या चकमकीत चिनी जवानांनी खिळे लावलेल्या लोखंडी रॉडचा हत्यार म्हणून वापर केल्याचं सांगितलं जात आहे.
 
भारत-चीन सीमेवर तैनात असणाऱ्या एका वरिष्ठ भारतीय लष्करी अधिकाऱ्यानेही हा फोटो बीबीसीला पाठवला आहे आणि यानेच चीनी जवानांनी भारतीय जवानांवर हल्ला केल्याचं सांगितलं आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांमधला तणाव अधिकच वाढला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे.
 
2020 च्या मे महिन्यात काही वृत्तांनुसार भारत आपला भूभाग समजत असलेल्या गलवान खोऱ्यातील काही ठिकाणी चिनी सैनिकांनी तंबू उभारले. तसंच अवजड साहित्यासहीत शिरकाव केला. भारताचे आघाडीचे सुरक्षा विश्लेषक अजय शुक्ला यांनी केलेल्या दाव्यानुसार, गेल्या महिन्याभरात चिनी सैन्याने भारतीय लष्कराची गस्त असलेल्या भूभागावर 60 चौरस किमीपर्यंत ताबा घेतला आहे.
 
तेव्हापासूनच भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या हालचालींबाबत वेगवेगळी वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आली. पण त्याबाबतचा अधिकृत खुलासा मात्र दोन्ही देशांकडून करण्यात आला नाही. 15 आणि 16 जूनच्या दरम्यान घडलेल्या घटनेचं वर्णन 'काही वर्षांतल्या अत्यंत गंभीर संकटांपैकी एक' असं करण्यात आलंय. पण अद्याप या संघर्षाचे पूर्ण तपशील स्पष्ट नाहीत.
 
पण तब्ब्ल 45 वर्षांनंतर भारत आणि चीनमधल्या सीमावादात पहिल्यांदाच जीवितहानी झाली आहे.
 
भारतीय लष्करानं याविषयीचं अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं. त्यात त्यांनी 20 भारतीय जवानांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.
 
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव या संपूर्ण प्रकरणावर बोलताना म्हणाले, "दोन्ही देशांच्या सीनिअर कमांडरमध्ये चर्चा झाली. या चर्चेनुसारच पुढे कृती होईल, असं आम्हाला वाटलं होतं."
 
"पण 15 जूनच्या रात्री चिनी लष्करांने अचानक कल बदलला. चीनने एकतर्फी निर्णय घेत 'जैसे थे' परिस्थिती फेटाळली आणि याचाच परिणाम म्हणून दोन्ही बाजूने हिंसक चकमक झडली. दोन्हीकडचे लोक दगावले. हे टाळता आलं असतं. मात्र, चीनने कराराचं प्रामाणिकपणे पालन केलं नाही."
 
2) भारत-चीन संघर्षाची कारणं काय आहेत?
2018-19 च्या संरक्षण मंत्रालयाच्या वार्षिक अहवालानुसार केंद्र सरकारने भारत-चीन सीमेवर 3812 किमी भूभाग रस्ता बांधणीसाठी चिन्हांकित केला होता. यापैकी 3418 किमी. लांबीचा रस्ता उभारण्याचं काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला देण्यात आलं होतं. यापैकी अनेक योजना पूर्ण झाल्या आहेत.
 
लडाखमध्ये भारताकडून रस्ता बनवला जातोय ही चीनसाठी चिंतेची बाब आहे की, या चकमकीमागे दुसरं काही कारण आहे.
 
दोन्ही देशांच्या घडामोडींवर अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांशी बीबीसीने चर्चा केली. त्यांच्यानुसार लडाखमध्ये रस्ता बांधणे हे एक कारण असू शकतं पण हे एकमेव कारण नक्कीच नाहीय.
 
भारतानं कलम 370 रद्द करणं, काराकोरममधून चालणारा चीनचा व्यापार, सध्याची कोरोना व्हायरसची उद्भवलेली स्थिती, त्यानंतर भारतानं चीनी गुंतवणुकीबाबत उचललेली पावलं आणि चीनमधलं अंतर्गत राजकारण या संघर्षाची कारणं ठरत असल्याचं बोललं जात आहे.
 
या कारणांविषयी तुम्ही सविस्तपणे इथं वाचू शकता. 45 वर्षांत असं काय घडलं, की भारत-चीन आक्रमक झाले?
 
3) हा संघर्ष इतका महत्त्वाचा का आहे?
जवळपास 45 वर्षांनंतर भारत-चीन सीमेवरच्या संघर्षाला हिंसक वळण लागलं. यापूर्वी 1975 साली भारतीय सैन्याच्या गस्ती पथकावर अरुणाचल प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी जवानांनी हल्ला केला होता. त्यात भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सीमेवर तणाव असायचा. मात्र, त्यात कुणाचा मृत्यू झाला नाही.
 
1962 च्या युद्धानंतर लडाखमध्ये दोन्ही बाजूच्या लष्करात कुणी मृत्युमुखी पडलेलं नाही. तर त्यानंतर अरुणाचल प्रदेश आणि सिक्किममध्ये ज्या घटना घडल्या त्यातही 1975 नंतर दोन्ही बाजूला कुणाचाही मृत्यू झाला नव्हता.
 
दरम्यानच्या काळात दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या बैठका होत होत्या. गाठीभेटी व्हायच्या. त्यामुळे असं वाटायचं की व्यापारासोबतच सीमेवरही सगळं सुरळित सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 6 वर्षात 18 वेळा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली आहे.
 
जाणकारांच्या मते तब्बल 45 वर्षांनंतर सीमेवर हिंसक चकमक झाली आहे आणि गेल्या 6 वर्षात एवढ्या भेटी होऊनही सीमेवर आपले जवान ठार झाले आहेत. त्यामुळे सध्या भारत-चीन सीमेवर असलेली स्थिती जास्त गंभीर आहे.
 
4) भारतीय जवानांनी शस्त्रं का उगारली नाहीत?
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करत सांगितलं, "सीमेवर सर्वच जवान शस्त्रास्त्र घेऊनच जातात. विशेषतः पोस्ट सोडताना त्यांच्याजवळ शस्त्रं असतातचं. 15 जून रोजी गलवान खोऱ्यातल्या जवानांजवळही शस्त्रं होती. मात्र, 1996 आणि 2005 सालच्या भारत-चीन करारांमुळे अनेक वर्षांपासून असा प्रघात आहे की फेस-ऑफच्या वेळी जवान फायरआर्म्सचा (बंदुकींचा) वापर करत नाहीत
 
5) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा काय आहे? नियंत्रण रेषा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा यांच्यात फरक काय?
भारताची जमिनीवरची सीमा (लँड बॉर्डर) 15,106.7 किमी लांब आहे. एकूण सात देशांशी आपली सीमा लागून आहे.
 
केंद्र सरकारच्या माहितीनुसार हे 7 देश आहे : बांगलादेश (4096.7 किमी), चीन (3488 किमी), पाकिस्तान (3323 किमी), नेपाळ (1751 किमी), म्यानमार (1643 किमी), भूटान (699 किमी) आणि अफगाणिस्तान (106 किमी).
 
भारताची चीनला लागून 3488 किमी लांब सीमारेषा आहे. ही सीमा जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या भागातून जाते.
 
ही सीमा तीन सेक्टर्समध्ये विभागली आहे. पश्चिम सेक्टर म्हणजे जम्मू-काश्मीर, मीडल सेक्टर म्हणजे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आणि पूर्व सेक्टर म्हणजे सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश.
 
मात्र, दोन्ही देशांमध्ये अजूनही निश्चित सीमा आखण्यात आलेली नाही. याचं कारण म्हणजे अनेक भूभागांवरून दोन्ही देशांमध्ये वाद आहे.
 
या वादांमुळे भारत आणि चीन यांच्यात अजून सीमा निश्चिती होऊ शकलेली नाही. मात्र, जैसे थे परिस्थिती कायम ठेवण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच 'लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल' (एलएसी) या संज्ञेचा वापर करण्यात येतो.
 
सात दशकं लोटून गेल्यानंतरही जम्मू आणि काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाद आहे किंबहुना वादाचा हा मुख्य मुद्दा आहे. हा भाग सध्या नियंत्रण रेषेने विभागला गेला आहे. त्याचा एक भाग भारताकडे आहे तर दुसरा पाकिस्तानकडे.
 
याला भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषा म्हणतात. भारत आणि चीन सीमेवरील 'या' 6 ठिकाणी आहे तणाव
 
6) या तणावाचा दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर काय परिणाम होऊ शकतो?
या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे. दोन्ही देशांमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे. पुढचे काही महिने दोन्ही देशांसाठी निर्णायक असतील. जाणकारांच्या मते या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी सैन्य पातळीवर चर्चा करावी लागेल. शिवाय राजकीय पातळीवरूनही चर्चा करणं गरजेचं असणार आहे.
 
जुन्या स्थितीत परतण्याला किंवा दोन्ही देशांमधला तणाव दूर करणं, याला 'डिसएंगेजमेंट' प्रक्रियाही म्हणतात. दोन्ही देशांनी म्हटलेलं आहे की, ते चर्चेतूनच हा मुद्दा सोडवू इच्छितात.
 
भारत आणि चीनमध्ये आधी कधीकधी संघर्ष झाला होता?
दोन्ही देशांमध्ये 1962 ला पहिलं युद्ध झालं होतं. त्यानंतर 3 वेळा दोन्ही देशांमध्ये संघर्ष झाला आहे.
 
1962- भारत-चीन युद्ध, हे युद्ध जवळपास महिनाभर चाललं. लडाखपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत या युद्धाचा परिसर होता.
 
1967- नाथू लामध्ये चीन आणि भारतीय सैनिक मारले गेले होते. मृत सैनिकांच्या आकड्यांबाबत दोन्ही देशांकडून वेगवेगळे दावे करण्यात येतात.
 
1975- अरुणाचल प्रदेशातील गस्ती दलावर नियंत्रण सीमा रेषेजवळ चीनी सैनिकांनी हल्ला केला होता.
 
भारत आणि चीनच्या इतिहासात 2020 या वर्षाचा उल्लेखही आता 1962, 1967 आणि 1975 प्रमाणे केला जाईल. कारण 45 वर्षांनंतर भारत-चीन सीमेवर इतक्या संख्येने सैनिकांचा मृत्यू झालाय.
 
दोन्ही देशांसाठी सीमेवरील तणाव हा नवीन नाहीय. पण सीमा वादावर चर्चा सुरू असतानाही दोन्ही देशांचे राजकीय, व्यापारी आणि आर्थिक संबंध गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत.
 
भारत - चीन संघर्ष : आता पुढे काय?
जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील माजी प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक एस. डी. मुनी सांगतात, "चीनबरोबर चर्चा करत असताना भारतानं रणभूमीवरही मजबूत रहायला पाहिजे."
 
संरक्षण तज्ज्ञ सुशांत सिंह यांच्या मते ही समस्या राजकीय चर्चेतून सुटू शकते. सध्या चीनबरोबर आपली लष्करी स्तरावरची चर्चा सुरू आहे. पण त्यातून तोडगा निघेलच असं नाही. या समस्येचा तोडगा हा राजकीय आणि मुत्सद्दी चर्चेतूनच निघेल.
 
ते पुढे सांगतात, "भारतानं गेल्या 6 वर्षांत राबवलेल्या परराष्ट्र धोरणाची ही परीक्षा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन-तीन वेळा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली आहे. आता हे पाहावं लागेल की भारतानं गेल्या सहा वर्षांत चीनबरोबरच्या मुत्सद्देगिरीत जी गुंतवणूक केली आहे त्याचा मोबदला काय मिळतो."