रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

अमेरिकेच्या इराकमधील तळांवर इराणकडून हल्ले, 'कासिम सुलेमानींच्या हत्येचा बदला'

इराकमधील अमेरिकी सैन्याच्या तळांवर इराणकडून हल्ले करण्यात आले आहेत.
 
एक डझनपेक्षा जास्त बॅलेस्टीक मिसाईल या तळांवर डागण्यात आली आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागानं ही माहिती दिली आहे.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ट्वीव करून सर्व काही ठिक असल्याचं म्हटलंय. किती नुकसान झालं याचा सध्या आढावा घेतला जात आहे, जगात आपल्याकडे सर्वांत शक्तिशाली आणि सुसज्ज असं लष्कर आहे. उद्या सकाळी मी यावर बोलेन, असं ट्रंप यांनी ट्वीट केलं आहे.
 
कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचं इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं म्हटलंय.
 
या घटनेनंतर इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद जरीफ यांनी ट्वीट करून इराणनं हा हल्ला स्वतःच्या रक्षणासाठी केल्याचं म्हटलंय. तंसच संयुक्त राष्ट्रांच्या कलम 51 नुसार हा हल्ला योग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. नागरिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार या कलमात आहे.
 
"आम्हाला युद्ध नको आहे, पण आम्ही स्वतःवर आलेला प्रत्येक हल्ला परतवून लावू," असं त्यांनी पुढे म्हटलंय.
 
इरबिल आणि अल-असद या दोन तळांवर हल्ले झाल्याचं पेंटागननं म्हटलंय. तसंच या हल्ल्यांमध्ये कुणी मारलं गेलं आहे का, हे अजून स्पष्ट झालं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यातील अल-असद या तळाला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 2018 मध्ये भेट दिली होती.
 
"या हल्ल्याची आम्हाला कल्पना आहे. राष्ट्राध्यक्षांना त्याबाबतची सर्व माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा गटाकडून या घटनेवर बारीक नजर ठेवली जात आहे. तसंच सल्लामसलत सुद्धा सुरू आहे," असं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या स्टिफनी ग्रिशाम यांनी सांगितलं आहे.
 
इराण रिव्हॉल्युशनरी गार्डनं इराणी वृत्तसंस्था IRNA मार्फत एक पत्रक जारी करून धमकी दिली आहे.
 
"सर्व मित्र राष्ट्रांना आमचा इशारा आहे, की जे कुणी या दहशदवादी सैन्याला त्यांची जमीन इराणविरोधात वापरू देतील त्यांना सर्वांना आमच्याकडून लक्ष्य केलं जाईल," असं त्यात म्हटलं आहे.
 
सुलेमानी यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याच्या तासाभरातच पहिला हल्ला करण्यात आला.
 
इराकमधून अमेरिकी सैन्याला माघारी बोलावणं धोक्याचं राहील असं, ट्रंप यांनी आधी म्हटलं होतं.
 
सध्या इराकमध्ये अमेरिकेचे 5000 सैनिक आहेत.
 
सध्याची स्थिती पाहाता ब्रिटननं त्यांच्या सैन्याला तयारीत ठेवलं आहे, असं सुरक्षा सचिव बेन वॅलन्स यांनी सांगितलं आहे.
 
इराण, इराक तसंच पर्शिया आणि मध्य-पूर्वेतल्या खाडींवरून नागरि विमानांनी उड्डाण न करण्याचे निर्देश अमेरिकी नागरी विमान वाहतूक प्रशासनानं अमेरिकी विमान कंपन्यांना दिले आहेत.