रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

इस्लामिक स्टेटची शाखा भारतातही? 'विलायाह ऑफ हिंद' या ISच्या घोषणेचा अर्थ

जगभरात दहशत पसरवणाऱ्या इस्लामिक स्टेट या अतिरेकी संघटनेने भारतातही आपली शाखा उघडल्याची घोषणा केली आहे. 10 मे रोजी काश्मीरमध्ये ही शाखा उघडल्याचा त्यांनी दावा केला आहे.
 
या शाखेचं अरबी भाषेतलं नाव आहे 'विलायाह ऑफ हिंद' म्हणजेच भारतीय प्रांत. याबद्दलची विशेष अशी घोषणा त्यांनी केली नाही किंवा या शाखेचं कार्यक्षेत्र नेमकं कोणतं, याबद्दलचा तपशीलही दिला नाही.
 
या संघटनेने काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या एका चकमकीची जबाबदारी स्वीकारणारं पत्रक प्रसिद्ध केलं आहे. ISने 10 मे रोजी टेलिग्राम या मेसेजिंग अॅपवर आलेल्या या पत्रकात ते म्हणतात, "काश्मीरमधल्या शोपिआन जिल्ह्यातल्या आमशिपोरा गावात मशिनगने सुसज्ज ISच्या अतिरेक्यांची धर्मनिंदक भारतीय सुरक्षा दलाशी चकमक झाली. या चकमकीत त्यातले (भारतीय जवान) बरेच ठार झाले आणि जखमीही झाले."
 
मात्र ही चकमक कधी झाली, याचा उल्लेख पत्रकात नाही. भारतीय मीडियाने 10 मे रोजी काश्मीरमधल्या शोपिआन जिल्ह्यातल्या आमशिपोरा गावात एक चकमक झाल्याची बातमी दिली आहे. यात एक अतिरेकी ठार झाल्याचं म्हटलं आहे.
 
त्यामुळे या पत्रकात काश्मिरातही ISची शाखा उघडल्याचा ओझरता उल्लेख आहे. एखाद्या शाखेबद्दलचा अशाप्रकारचा ओझरता उल्लेख त्यांच्या मीडिया रणनीतीचा भाग आहे.
 
2017च्या शेवटी शेवटी ISचं कार्यक्षेत्र कमी होऊ लागलं. वेगवेळ्या देशांमध्ये ISचा बिमोड सुरू झाला आणि त्यांचे प्रांत त्यांच्या हातून निसटू लागले. त्यानंतरच त्यांनी आपल्या कार्यक्षेत्राची माहिती दडवणं सुरू केलं.
 
इस्लामिक स्टेटने मध्य आफ्रिकेतल्या आपल्या शाखेची घोषणाही अशीच केली होती. कांगो प्रजासत्ताकमध्ये एप्रिलमध्ये एक हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ISने जारी केलेल्या पत्रकात या शाखेचा ओझरता उल्लेख होता.
 
ISने नुकताच नेतृत्वासंबंधीचा एक व्हिडियो प्रसिद्ध केला आहे. यात 'टर्की प्रांत' असा उल्लेख आहे.
 
आयएसने नोव्हेंबर 2017 पासून काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांवर हल्ला केल्याचा दावा करायला सुरुवात केली होती. मात्र, त्यात भारतातल्या शाखेचा उल्लेख नव्हता.
 
मात्र मार्च 2018 पासून या संघटनेकडून काश्मीरमध्ये जे हल्ले होऊ लागले त्याची जबाबदारी या संघटनेच्या खोरसन प्रांतातल्या शाखेकडे देण्यात आली होती. खोरसान प्रांतातली ही शाखा 2015 साली स्थापन करण्यात आली होती. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि आसपासच्या प्रदेशाची जबाबदारी या शाखेकडे होती.
 
पश्चिम आशियात आएसला सुरुंग लागायला सुरुवात झाल्यानंतर जागतिक पातळीवर आपलं अस्तित्व असल्याचं पटवून देण्यासाठी किंवा किमान तसं भासवण्यासाठी त्यांनी आखलेल्या नव्या रणनीतीनुसार ही शाखा सुरू केली असण्याची शक्यता आहे.
 
आएसचा मोऱ्हक्या अबू बक्र अल-बगदादीने 29 एप्रिलला दिलेल्या एका संदेशात या नव्या रणनीतीचा उल्लेख होता. त्यानुसार जगातल्या वेगवेगळ्या भागातून आएसमध्ये येणाऱ्यांचं त्याने स्वागत केलं होतं आणि अतिरेकी म्हणून त्यांचा उल्लेख केला होता.
 
भारतातल्या 'शाखेची' घोषणा करून 21 एप्रिलला श्रीलंकेत झालेल्या स्फोटांचं श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. श्रीलंकेतला अतिरेकी हल्ला आपणच केल्याचा दावा त्यांनी केला होता. दक्षिण आशियात आयएसचं जाळं विस्तारत असल्याचं यातून दिसतं.