बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मे 2019 (18:23 IST)

व्हॉट्सअॅप अपडेट करा: अॅपची सुरक्षितता धोक्यात आल्याची कंपनीची कबुली

- डेव्ह ली
तुम्ही तुमचं शेवटचं व्हॉट्सअॅप शेवटचं कधी अपडेट केलं होतं? एवढ्यात नसेल केलं तर नक्की करा, असा कंपनीने सुचवलं आहे.
 
कारण सुरक्षेसंदर्भात एक चूक या अॅपमध्ये राहिल्यामुळे लोकांच्या स्मार्टफोनमध्ये एक चुकीचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालं आहे, असं समोर आलं आहे.
 
या सॉफ्टवेअरमुळे काही विशिष्ट युजर्सवर पाळत ठेवली जाते, असं व्हॉट्सअॅपनंच जारी केलेल्या एका पत्रकात म्हटलं आहे. हे सॉफ्टवेअर इस्रायलमधील NSO ग्रुपनं बनवलं आहे, असं वृत्त फायनान्शियल टाईम्सने दिलं आहे.
 
कंपनीनं आपल्या 1.5 अब्ज ग्राहकांना व्हॉट्सअॅप अपडेट करण्याची विनंती केलं आहे. यासंबंधीचं पहिलं प्रकरण या महिन्यात समोर आलं होतं.
 
सतत सुरक्षिततेवरून संशयाच्या भोवऱ्यात राहणारी फेसबुक कंपनी व्हॉट्सअॅपची मालक आहे. त्यामुळे नवीन प्रश्नं उद्भवण्याची शक्यता आहे.
 
व्हॉट्सअॅप कॉलच्या माध्यमातून हे चुकीचं सॉफ्टवेअरला लोकांच्या फोनमध्ये इन्स्टॉल झालं आहे. एखाद्या युजरने कॉलचं उत्तर नाही दिलं तरीसुद्धा हे सॉफ्टवेअर फोनमध्ये इन्स्टॉल होऊ शकतं, असं कंपनीने सांगितलंय.
 
व्हॉट्सअॅपनं बीबीसीला सांगितलं की, "हा दोष सर्वांत आधी आमच्याच सुरक्षा टीमला लक्षात आला. यासंबंधीची माहिती आम्हीच काही मानवाधिकार कार्यकर्ते आणि अमेरिकेच्या न्यायपालिकेकडे या महिन्याच्या सुरुवातीला सोपवली होती."
 
"अशा अनेक खासगी कंपनी असतात ज्या सरकारच्या मदतीने लोकांच्या मोबाईल्समध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी तसे छुपे स्पायवेअर तयार करतात. हा हल्ला अशाच एका कंपनीने केल्यासारखं दिसतंय," असं कपनीनं पत्रकात म्हटलं आहे.
 
व्हॉट्सअप अपडेट कसं करावं?
गुगल प्ले स्टोअर ओपन करा.
स्क्रीनवर डाव्या दिशेला वर असलेल्या मेनूवर क्लिक करा.
माय अॅप्स अँड गेम्स ओपन करा.
व्हॉट्सअॅप गेल्या काही दिवसांमध्ये आपोआप अपडेट झालं असेल तर अपडेट नावाचं बटण दिसेल. नवीन व्हर्जनसाठी अपडेटवर क्लिक करा.
व्हॉट्सअॅपचं सध्या 2.19.134 हे लेटेस्ट व्हर्जन कार्यरत आहे.
 
Ios साठी
 
अॅप स्टोअर उघडा
स्क्रीनच्या तळाशी अपडेटवर क्लिक करा
व्हॉट्सअॅप गेल्या काही दिवसात अपडेट झालं असेल तर अॅप्सच्या यादीत ते दिसेल. ओपन असं बटनही दिसेल. व्हॉट्सअॅप आपोआप अपडेट झालं नसेल तर अपडेट नावाचं बटण दिसेल
आयओएसवर सध्या व्हॉट्सअॅपचं 2.19.51 हे व्हर्जन कार्यरत आहे.
 
NSOचं म्हणणं काय?
NSO या इस्रायलमधील एका कंपनीला याआधी "Cyber arms dealer" म्हणून ओळखलं गेलं आहे.
 
या ग्रुपचं Pegasus हे सॉफ्टवेअर टार्गेट केलेल्या डिव्हाईसमधून माहिती गोळा करू शकतं. हे सॉफ्टवेअर मायक्रोफोन आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून फोनमधील माहिती मिळवू शकतं. तसंच फोनचं लोकेशनही शोधून काढू शकतं.
 
"NSOचं तंत्रज्ञान हे काही अधिकृत सरकारी संस्थांना गुन्हेगारी आणि कट्टरवादी कारवायांविरोधात लढण्यासाठी वापरण्यात येतं. कंपनी स्वत:हून कोणतीही प्रणाली चालवत नाही. अत्यंत काळजीपूर्वक आणि बौद्धिक कसोटीनंतर तसंच कायद्याच्या कसोचीवर हे तंत्रज्ञान सार्वजनिक सुरक्षिततेसाठी कसं वापरायचं, हे ठरवते," असं NSOनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
 
"NSO कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेला लक्ष्य करण्यासाठी त्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करीत नाही किंवा करू शकत नाही," असंही कंपनीनं म्हटलं आहे.
 
टार्गेट कोण?
व्हॉट्सअॅपनं म्हटलंय की, "या असुरक्षिततेमुळे किती वापरकर्ते प्रभावित झाले आहेत, हे आताच सांगणं कठीण आहे. पण या संशयित हल्ल्यांमध्ये अनेकांना टार्गेट करण्यात आलं आहे."
 
फेसबुकच्या आकडेवारीनुसार, व्हॉट्सअॅपचे जगभरात 1.5 अब्ज यूजर्स आहेत.
 
NSO ग्रुपकडून असा सायबर हल्ला होईल, अशी भीती Amnesty Internationalने आधीच व्यक्त केल्याचं म्हटलं आहे. ही मानवाधिकार संस्थही या गटाचं यापूर्वी लक्ष्य ठरली आहे.
 
"तुम्ही कोणतीही कारवाई न करता ते तुमच्या फोनवर अतिक्रमण करू शकतात," असं Amnesty Techचे उपसंचालक डेना ईंग्लटन यांनी म्हटलंय.
 
"प्रख्यात कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी हे टूल वापरण्यात आले होते, यासाठी काही उत्तरदायित्व असणं आवश्यक आहे, ते केवळ गुप्त उद्योग म्हणून चालू राहू शकत नाही," असंही त्यांनी म्हटलंय.