बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (18:30 IST)

करण जोहर: 'मी ड्रग्ज घेत नाही आणि माझ्या पार्टीमध्येही ड्रग्ज नसतं'

गेल्या काही दिवसांपासून हिंदी सिनेसृष्टीतील अंमली पदार्थांच्या कनेक्शनबाबत सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. चित्रपट दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीमध्येही ड्रग्जचा वापर करण्यात येतो, असा आरोप गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होता.
 
या प्रकरणी करण जोहरने अनेक दिवस प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता करणने याबाबत मौन सोडलं असून, आपल्या पार्टीमध्ये ड्रग्जचा अजिबात वापर होत नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे.
 
"माध्यमांमध्ये विकृत पद्धतीने, बिनबुडाचे आणि खोटे आरोप करण्यात येत आहेत. हा प्रकार बंद व्हावा. अन्यथा कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नाही," असा इशाराही करणने दिला आहे. करण जोहरने ट्विटरवर पत्रक जारी करत आपल्यावरील सर्व आरोपांना उत्तर दिलं आहे.
 
तो म्हणाला, "मी 28 जुलै 2019 रोजी दिलेल्या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर करण्यात आला, अशा आशयाच्या बातम्या काही वृत्तवाहिन्या, प्रिंट तसंच सोशल मीडियावरही प्रकाशित करण्यात येत आहेत. मी त्या पार्टीनंतरच याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. या बातम्या खोट्या असून वाईट हेतूने या बातम्या दिल्या जात आहेत. पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर झाला, हा आरोप बिनबुडाचा आहे. त्यावेळी कोणत्याच अंमली पदार्थांचा वापर करण्यात आला नव्हता."
 
मी स्वतः ड्रग्ज घेत नाही. तसंच अशा प्रकारच्या कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याला मी प्रोत्साहन देत नाही, असं करणने म्हटलं.
 
या सगळ्या बातम्यांमुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांनाही मानसिक त्रास होत आहे. या सर्व प्रकारामुळे तो द्वेष आणि चेष्टामस्करीचा विषय बनला आहे, असं करण म्हणाला.
 
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यूनंतर तपासादरम्यान बॉलिवूडमधील ड्रग्जच्या सेवनाबाबत माहिती समोर आली आहे. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक याप्रकरणी तुरुंगात आहेत. इतर काही लोकांविरुद्ध तपास सुरू आहे. याप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोणला शनिवारी (26 सप्टेंबर) NCB कडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. तर 25 सप्टेंबर रोजी अभिनेत्री रकूल प्रीत सिंह हिची चौकशी करण्यात आली होती.
 
क्षितिज रवि प्रसाद आणि अनुभव चोप्रा यांच्यावर करण काय म्हणाला?
यांच्याशिवाय नार्कोटिक्स कंट्रोल विभागाच्या यादीत बॉलिवूडमधील इतर अनेक नावं आहेत. शुक्रवारी चौकशीदरम्यान दिग्दर्शक क्षितिज रवि प्रसाद यांना ताब्यात घेण्यात आलं.
 
क्षितिज यांचा संबंध करण जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शनशी जोडण्यात आला आहे. क्षितिज रवि प्रसाद यांच्यासोबत नोव्हेंबर 2019 मध्ये एका प्रोजेक्टवर काम करण्यात येत होतं. पण काही कारणामुळे ते थांबवण्यात आलं, असं करणने सांगितलं. 
 
NCB ने अनुभव चोप्रा यांचीही चौकशी केली. तेसुद्धा धर्मा प्रॉडक्शनशी संबंधित असल्याचं बातम्यांमध्ये सांगण्यात आलं. पण अनुभव चोप्रा धर्मा प्रोडक्शनचे कर्मचारी नाहीत, असं करणने स्पष्ट केलं. अनुभव चोप्रा नोव्हेंबर 2011 ते जानेवारी 2012 दरम्यान सहायक दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते. यानंतर जानेवारी 2013 मध्ये एका शॉर्ट फिल्मसाठी त्यांनी काम केलं. त्यानंतर त्यांनी धर्मा प्रॉडक्शनसोबत कोणतंच काम केलं नाही, असं करणने सांगितलं.