शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (19:29 IST)

मकरंद अनासपुरेः ग्रामपंचायत निवडणूक संपली, आता राजकारण घरी ठेवून गावाच्या विकासासाठी एकत्र या

महाराष्ट्रात 14 हजार 234 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडणुकीत तरुणांनी घवघवीत यश मिळवलं आहे.
 
सरपंच पदासाठीचे फॉर्म भरायला सुरुवात झाल्यास यातले अनेक तरुण सरपंच म्हणून गावाचा कारभार हाकताना दिसतील.
 
अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये गावाकडचा कार्यकर्ता, सरपंच यांची भूमिका केली आहे.
 
त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल तरूण गावाच्या गावाच्या विकासात कसा हातभार लावू शकतो, या विषयावर बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी मकरंद अनासपुरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा संपादित अंश इथं देत आहोत.
 
 
प्रश्न - 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा' या चित्रपटात तुम्ही स्मार्ट कार्यकर्त्याची भूमिका निभावली. त्यातला कार्यकर्ता दोन्ही दगडांवर पाय ठेवून असतो. गावातल्या दोन्ही राजकीय गटांच्या तो संपर्कात असतो. अशा प्रकारचा कार्यकर्ता तुम्हाला प्रत्यक्षात कधी भेटला होता का?
 
उत्तर - हो, तसं म्हणू शकतो. राजकीय व्यक्तींच्या कार्यक्रमांना मी खूपवेळा जातो. राजकीय क्षेत्रात माझे खूप मित्र आहेत. अशाच एका मित्राने एक पात्र मला सुचवलं होतं. त्याच्यानुसार मी ही भूमिका साकारली. तो व्यक्ती बऱ्याच जणांच्या संपर्कात असतो. पक्षविरहीत राजकारण तो करत असतो. त्याचं नाव इथं घेणं योग्य होणार नाही.
 
प्रश्न - निवडणुकीच्यावेळी गावाकडे आधी वातावरण वेगळं दिसायचं. पण आता निवडणूक संपली तरी विरोध कायम दिसतो. कार्यकर्तेही एकमेकांच्या तोंडाकडेही पाहत नाहीत, असं का घडतंय?
 
उत्तर - ही ग्रामीण भागाला खूप मारक अशी गोष्ट आहे. गावागावांचे मसनवटे होत चाललेत, त्यामागचं कारण ही राजकीय स्पर्धा आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. एकदा निवडणूक झाली, की राजकारण तुमच्या घरी ठेवून तुम्ही गावाच्या विकासासाठी एकत्र येणं अपेक्षित असतं.
 
गावांमध्ये समस्यांबाबतची दुर्दशा तशीच आहे. गावांमध्ये फक्त मोजक्या लोकांचीच घरे टोलेजंग असतात. गावाचा विकास करण्याऐवजी स्वतःचा विकास करण्याकडे लक्ष दिलं की हा गोंधळ होतो. जे सत्तेत आहेत, त्यांना विरोधक पाच वर्षे काम करू देत नाहीत. विरोधक सत्तेत गेले की आधीचे लोक त्यांना विरोध करत बसतात. यामुळे गावातलं चित्र कित्येक वर्षे तसंच राहतं.
 
प्रश्न - गावातलं राजकारण आणि चित्रपटातलं राजकारण यामध्ये आपल्याला काय साम्य किंवा फरक दिसतो?
 
उत्तर - चित्रपटांमधून एक संदेश आपल्याला पोहोचवायचा असतो. त्यामुळे जसंच्या तसं सगळं दिसत नसलं तरी चित्रपटात गावातल्या राजकारणाचं प्रतिबिंब दिसू शकतं.
 
प्रश्न - या निवडणुकीत तरूणांनी मोठा सहभाग नोंदवला आणि ते निवडूनही आले, याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता?
 
उत्तर - तरूणांनी राजकारणात सहभाग नोंदवणं महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी जास्तीत जास्त सहभागी झालं पाहिजे. त्यांनी जग बदलण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या हातात ती हिंमत असते, त्यांच्या अंगात ती शक्ती असते. आपल्याला वेगळी पायवाट काढायची आहे, गावाचं नाव मोठं करायचं आहे, त्यामुळे गावाचा विकास हा सर्वांत महत्त्वाचा अजेंडा त्यांनी पुढे ठेवला पाहिजे. विरोधातल्या लोकांशी एकत्रितपणे चर्चा करून गावाचे प्रश्न सोडवले पाहिजेत, मगच गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो.
 
गावाचं काहीच भलं झालेलं चालत नाही, अशीही काही मंडळी असतात. अशा लोकांची यादी बनवून त्यांना गावाने ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे. या लोकांकडे लक्षच देऊ नका, असं लोकांना सांगितलं पाहिजे. या लोकांना गावात काहीही चांगलं झालं तरी त्रास होतो, रात्रीची झोप येत नाही. हे चांगलं काम कसं उधळून लावू शकतो, याचा विचार ते सतत करत असतात. या नतद्रष्ट लोकांना आधी खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे. सगळ्यांना एकत्र येऊन सगळ्यांचा विचार विकासामध्ये झाला पाहिजे.
 
प्रश्न - ग्रामीण भागात अनेक ठिकाणी महिला सरपंच असतात. ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. पण बरेचदा त्या महिलांच्या घरातील पुरुष सरपंच म्हणून काम करताना दिसतात, महिला फक्त नावालाच सरपंच असतात, असा आरोप होतो. तुमचा प्रत्यक्षातला अनुभव काय आहे?
 
उत्तर - बऱ्याच ठिकाणी अशी स्थिती आहे. या महिलांनी नवऱ्याला आपल्या कामात हस्तक्षेप करू द्यायचा नाही, त्यांच्याकडे तितके अधिकार आहेत. शंभरपैकी 25 महिला तरी स्वतंत्र विचार करणाऱ्या असतात. त्यांचा सल्ला इतर महिलांनी घेतला पाहिजे. नाहीतर महिला आरक्षण देऊन काही उपयोग नाही, असं वाटू शकतं.
 
प्रश्न - स्वतंत्रपणे सरपंच म्हणून काम करणाऱ्या महिलांकडून गावातलं चित्र बदलताना दिसतंय का?
 
उत्तर - हो. बऱ्याच महिला सरपंचांनी गावचा चेहरामोहरा बदललेला आहे. एका पुरस्कार कार्यक्रमात विदर्भातील दोन महिला सरपंचांना पुरस्कार मिळाल्याचं मी पाहिलं. त्यामुळे एकत्रितपणे या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. शेवटी आपल्या नवऱ्याने उभं केलं तर नाही म्हणण्याचा अधिकारही त्या महिलेला आहे. ती अखेर स्वतंत्र आहे. तूच कारभार करणार असशील तर मी उभी राहणार नाही, असं ती नवऱ्याला सांगू शकते.
 
प्रश्न - ग्रामीण भागातलया तरुणांना भाषा आणि इतर आणखीही बाबींचा न्यूनगंड असतो. या तरूणांना तुम्ही काय संदेश द्याल?
 
उत्तर - आपली पिढी ही मराठी माध्यमातून शिकलेली आहे. माझंही इंग्रजी काही बरी नाही. पण त्यामुळे मी परदेशात हिंडू शकलो नाही का? तसं बिलकुल नाही. मुळात माझी मातृभाषा नसेल आणि मला नीट येत नसेल, तर त्यात वावगं मानण्याचं कारण नाही. आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान आणि प्रेम हे पाहिजेच. मी माझ्या भाषेत बोलीन, असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. माझं सगळं शिक्षण जर इंग्रजीतच झालं असतं तर मी फर्डा इंग्रजी वक्ता असू शकलो असतो. पण मराठी अभिनेता बनू शकलो नसतो. शेवटी माझ्या भाषेने मला याठिकाणी आणलं आहे.
 
न्यूनगंड कोणत्याही प्रकारचा असला तरी त्याला एका यशस्वी हत्यारामध्ये रुपांतरीत करायला हवं. एखाद्या त्रास देणाऱ्या गोष्टीचाच वापर करून यश मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे.
 
मी मुंबईत आलो तेव्हा माझी भाषा खेड्यातली होती. आताही ती खेड्यातलीच आहे. सुरुवातीला माझ्या भाषेमुळे माझी चेष्टा करण्यात आली. पण तीच भाषा वापरून मी सिनेमात काम केलं.