बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (20:14 IST)

मलाला युसुफझाईचं झालं लग्न, कोण आहे मलालाचा नवरा?

नोबेल पुरस्कार विजेती मानवी हक्क कार्यकर्ता मलाला युसुफझाईचं लग्न झालं आहे.
 
बर्मिंगहॅम इथे झालेल्या मुस्लीम समाजाच्या समारंभात मलाला आणि असर मलिक विवाहबद्ध झाले. मलाला आणि असर यांचा निकाह झाला. इस्लामिक रीतीरिवाजांनुसार ही लग्नाची प्रक्रिया असते.
 
आयुष्यातला सगळ्यांत मौल्यवान दिवस असल्याचं मलालाने म्हटलं आहे.
 
2012 मध्ये मलालावर तालिबान्यांनी हल्ला केला होता. तिच्या डोक्याला गोळी लागली होती. या हल्ल्यातून ती बचावली. त्यानंतर इंग्लंडमधल्या वेस्ट मिडलँड या ठिकाणी ती स्थायिक झाली.
 
असर आणि मी आयुष्यभरासाठीचे साथीदार झालो आहोत असं मलालाने ट्वीट केलं आहे. छोटेखानी निकाह समारंभ झाला असं मलालाने म्हटलं आहे. नव्या प्रवासासाठी आम्ही उत्सुक आहोत असंही मलालाने लिहिलं आहे.
 
15 वर्षांची असताना मुलींच्या शिक्षण हक्काबद्दल पाकिस्तानमध्ये बोलल्याप्रकरणी मलालाला तालिबानने लक्ष्य केलं होतं.
 
कट्टरतावाद्याने स्वात खोऱ्यातल्या मलालाच्या स्कूलबसमध्ये प्रवेश केला आणि अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात मलालासह तिच्या मैत्रिणीही जखमी झाल्या.
 
जीवावर बेतलेल्या अशा प्रसंगातून बरी झाल्यानंतर मलाला आणि तिच्या घरचे इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथे स्थायिक झाले. हे तिचं दुसरं घर आहे असं मलाला म्हणते. 17व्या वर्षी तिला नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
मलाला सगळ्यांत लहान वयाची नोबेल पुरस्कारविजेती ठरली होती. मलाला ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकते. मानवी हक्कांच्या चळवळीतली आघाडीची कार्यकर्ती म्हणून तिचं नाव घेतलं जातं.