रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जानेवारी 2020 (15:01 IST)

मनसे झेंडा : भगवा रंग आणि शिवमुद्रा वापरून राज ठाकरे शिवसेनेची जागा घेऊ पाहताहेत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या ध्वजाचं अनावरण केलं आहे. पूर्णपणे भगव्या रंगाच्या या ध्वजावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे.
 
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता, शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते" हे शब्द या राजमुद्रेवर आहेत.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर तब्बल तेरा वर्षांनी प्रथमच पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन आज (गुरुवार) गोरेगाव येथील नेस्को संकुलात पार पडत आहे.
 
या अधिवेशनातच राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा नवीन रुपात सादर केला. पक्षाच्या धोरणांबद्दल मी संध्याकाळी बोलेन, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.
 
मनसेच्या ट्विटर पेजवरच्या महाअधिवेशनासंदर्भातील व्हीडिओमध्ये 'विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा' असा उल्लेख आहे. मनसेच्या बॅनरवरही हेच शब्द झळकत आहेत. महाअधिवेशनाच्या व्यासपीठावर सावरकरांची प्रतिमाही ठळकपणे दिसत होती.
 
शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेल्याने त्यांना कडव्या हिंदुत्ववादी भूमिकेला मुरड घालावी लागेल. शिवसेना ज्या विषयांवर पूर्वी आक्रमकपणे भाष्य करत होती, त्या पद्धतीनं भूमिका घेणंही उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री असल्यामुळे अवघड जाऊ शकतं.
 
अशावेळी शिवसेनेची जागा घेण्याची हीच योग्य वेळ आहे, हा विचार करून राज ठाकरेंनी हा बदल केला आहे का? बदललेल्या झेंड्यामधून ते पक्षाची भविष्यातील दिशा स्पष्ट करू पाहत आहेत का, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला.
 
शिवसेनेच्या हिंदुत्ववादी मतदारांवर लक्ष
नवीन झेंड्याच्या माध्यमातून माध्यमातून शिवसेनेच्या हिंदुत्ववादी मतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत असल्याचं मत दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांना वाटतं.
 
याबाबत विश्लेषण करताना प्रधान सांगतात, "शिवसेनेचा मोठा मतदार हा हिंदुत्ववादी विचारांना मानणारा आहे. हिंदुत्ववादी विचारांनी प्रभावित होऊन हा मतदार बाळासाहेब ठाकरेंच्या मागे गेला होता. हा वर्ग मोठा आहे. पण शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत गेल्यामुळे हा वर्ग नाराज झालेला आहे. तसंच शिवसेनेने काँग्रेससोबत जाणं हे अनेक शिवसैनिकांना रुचलेलं नाही. त्यामुळे ही राजकीय पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न मनसे करत आहे."
 
प्रधान पुढे सांगतात, "आपण याद्वारे बाळासाहेबांचा वारसा आपण चालवत आहोत, हा संदेश राज ठाकरे यांना द्यायचा आहे. मनसेच्या पूर्वीच्या ध्वजात निळा आणि हिरवा हे रंग होते. त्यावेळी शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका होती. आपणही तीच भूमिका घेतली तर आपल्याला फारसा फायदा होणार नाही, असा त्यावेळी त्यांचा विचार होता. पण आता शिवसेनेनेच भूमिका बदलल्यामुळे हिंदुत्ववादाची भूमिका आपण घेऊ शकतो, असं त्यांचं मत बनलं आहे."
 
शिवसेनेचं संघटन उत्तम
प्रधान यांच्या मते, "राज ठाकरे यांनी पक्षाचा ध्वज किंवा विचारसरणी बदलली तरी शिवसेनेशी दोन हात करण्यासाठी त्यांना जोर लावावा लागेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात राज ठाकरे तुलनेने चांगले वक्ते मानले जातात. त्यांच्या भाषणांना गर्दी जमते, हे आपण पाहिलं आहे. पण असं असलं तरी पक्षसंघटनाच्या बाबतीत उद्धव ठाकरे बरेच पुढे आहेत. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी पक्षाची बांधणी योग्य प्रकारे करण्याची गरज आहे."
 
पार्टटाईम राजकारणी प्रतिमा बदलावी
"राज ठाकरे एखादी सभा, आंदोलन किंवा कार्यक्रम घेऊन दोन-तीन महिने शांत बसून असतात. 'पार्टटाईम राजकारणी' अशी त्यांची प्रतिमा बनलेली आहे. पण ही प्रतिमा बदलण्याची त्यांना गरज आहे. त्यासाठी त्यांनी सातत्याने कार्यक्रम हाती घेतली पाहिजेत. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सतत राजकीय घडामोडींमध्ये गुंतवून ठेवलं पाहिजे. तरच त्यांना नव्या भूमिकेचा फायदा होऊ शकेल," असं प्रधान यांना वाटतं.
 
'हिंदुत्वाच्या राजकारणाच्या मर्यादांचाही विचार व्हावा'
पत्रकार धवल कुलकर्णी यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर The Thackeray Cousins हे पुस्तक लिहिलंय.
 
याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना धवल कुलकर्णी यांनी म्हटलं, "राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे...मदोघांचं राजकारण हे प्रतिक्रियावादी राहिलं आहे. त्यामुळे उद्धव हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यानंतर राज यांच्याकडून अशी प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं."
 
"दुसरं म्हणजे राज यांनी जेव्हा पक्ष स्थापन केला, तेव्हा चार राजकीय पक्षांपलिकडेही प्रादेशिक पक्षांसाठी स्पेस आहे, अशी त्यांची भूमिका होती. ज्यामध्ये तथ्यंही होतं. राज ठाकरेंनी त्यांचा झेंडाही त्यावेळी पॉलिटिकली करेक्ट डिझाइन केला होता. पण राज ठाकरेंना 2017 मध्ये आपला झेंडा बदलायचा होता. तो काही काळानं राहून गेलं. आता कदाचित जो बहुसंख्यवाद वाढत आहे, त्याच्या लाटेवर स्वार होण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न असावा.
 
"पण हिंदुत्वाच्या राजकारणाकडे वळताना मराठी आणि बौद्ध समाज हा विरोधात जाऊ शकतो, हेही पहायला हवं. दुसरं म्हणजे, हिंदुत्वाची भूमिका तात्कालिक फायदा मिळवून देते, पण त्यामुळे तुम्हाला ताकदीचा स्थानिक पक्ष होण्याला मर्यादा येतात. शिवसेनेनं त्यांच्या मध्यात ही भूमिका घेतल्यानं त्यांना तामिळनाडूमधल्या 'DMK' सारखा पक्ष होता आलं नाही. त्यांनी एक संधी गमावली. राज यांच्या पक्षाची स्थापना भाषिक मुद्द्यांतून झाली. पण तेही आता शिवसेनेच्याच रस्त्यावर जाताना दिसताहेत," असंही धवल कुलकर्णी यांनी म्हटलं.