शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जून 2019 (10:48 IST)

मोदी-शाहांना क्लीन चीट, तपशील उघड केलयास जीवाला धोका : निवडणूक आयोग

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना आचारसंहिता भंगाच्या प्रकरणांत निर्दोष जाहीर करणाऱ्या निकालातील दुमताचा तपशील उघड करण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे.
 
ही माहिती उघड केल्यास कुणाच्या तरी जीविताला धोका पोहोचू शकतो, असं कारण आयोगानं दिलं आहे. लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
 
मोदी आणि शाह यांच्या प्रचारसभेतील काही वक्तव्यांविरोधात काँग्रेस आणि अन्य काही विरोधी पक्षांनी आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली होती. न्यायालयीन आदेशाच्या दडपणानंतर आयोगाने या तक्रारींची दखल घेतली.
 
आयोगानं मोदी आणि शाह यांना निर्दोष ठरवलं असलं तरी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मतभेद व्यक्त करणारा निकाल दिला होता.
 
लवासा यांच्या निर्णयासंबंधीचा तपशील जाहीर करण्याची मागणी पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी माहिती अधिकाराखाली केली होती.
 
माहिती उघड करून कोणाच्याही जीविताला वा शारीरिक इजा पोहोचण्याची भीती असेल, तर माहिती अधिकार कायद्याच्या ८(१)(जी) या कलमानुसार तपशील उघड न करण्याची मुभा आहे. आयोगानं हेच कारण देत माहिती देण्यास नकार दिला आहे.