रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जून 2019 (10:27 IST)

आपल्या पणजोबांनी स्थापन केलेल्या बँकेचे पैसे बुडवण्याची वेळ यश बिर्लांवर आली कारण...

कोलकात्यामध्ये मुख्यालय असणाऱ्या युको बँकेने गेल्या आठवड्यात यशोवर्धन बिर्ला यांना 'विलफुल डिफॉल्टर' म्हणजे मुद्दाम पैसे बुडवणारे म्हणून जाहीर केलं.
 
पहिल्यांदाच बिर्ला कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला 'विलफुल डिफॉल्टर' जाहीर करण्यात आलेलं आहे.
 
यश बिर्लांची कंपनी बिर्ला सूर्या लिमिटेडने युको बँकेचं 67.65 कोटींचं कर्ज घेतलं, पण त्याची परतफेड न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
 
युको बँकेच्या वसुली खात्यातल्या एका अधिकाऱ्याने या माहितीला दुजोरा दिला आहे.
 
बँकेतर्फे वर्तमानपत्रांमध्ये छापण्यात आलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये यश बिर्लांचा फोटोही छापण्यात आलाय.
 
विलफुल डिफॉल्टर म्हणजे अशी व्यक्ती जिची कर्जाची परतफेड करण्याची क्षमता असूनही ती परतफेड करत नाही. यश बिर्लांनीही तेच केलं आहे.
 
शिवाय ज्या कामासाठी हे कर्ज घेण्यात आलं होतं, त्यासाठी या कर्जाचा वापर करण्यात आला नाही.
 
'विलफुल डिफॉल्टर' जाहीर करण्यात आल्यानंतर फक्त या कंपनीलाच नाही, पण कंपनीचा संचालक असणाऱ्या व्यक्तीलाही कर्जं घेणं कठीण होतं.
 
विशेष बाब अशी की युको बँकेची स्थापना घनश्यामदास बिर्लांनी केली होती.
 
घनश्यामदास बिर्ला हे यशोवर्धन बिर्लांचे पणजोबा - रामेश्वरदास बिर्लांचे बंधू होते.
 
बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या मोहीमेअंतर्गत 19 जुलै 1969 रोजी युको बँकेचंही राष्ट्रीयीकरण करण्यात आलं.
 
यश बिर्लांची तुलना अनेकदा त्यांचे नातेवाईक आणि भारताल्या सर्वांत जास्त श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या कुमार मंगलम् बिर्लांसोबत केली जाते.
 
कुमार मंगलम् बिर्ला हे आदित्य बिर्ला समूहाचे प्रमुख आहेत.
 
फोर्ब्स मासिकानुसार कुमार मंगलम् बिर्लांकडे 11.5 अब्ज डॉर्लसची संपत्ती आहे आणि त्यांच्या आदित्य बिर्ला समूहाचं एकूण उत्पन्न 44.3 अब्ज डॉलर्स आहे.
 
आणि दुसरीकडे बॉडी बिल्डिंगमध्ये रस असणारे यश बिर्ला.
कोण आहेत यश बिर्ला?
यश बिर्लांचं कुटुंब भारतातल्या प्रसिद्ध उद्योगपती कुटुंबांपैकी एक आहे.
 
यश बिर्ला 23 वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील आणि बहीणीचा एका विमान दुर्घटनेत मृत्यू झाला.
 
मुंबईहून बंगळुरूला जाणारं आयसी 604 विमान 14 फेब्रुवारी 1990 रोजी दुर्घटनाग्रस्त झालं. यामध्ये एकूण 92 जण मारले गेले.
 
ठार झालेल्यांमध्ये यश बिर्लांचे वडील आणि प्रसिद्ध उद्योगपती अशोक बिर्ला, त्यांची आई सुनंदा आणि बहीण सुजाता यांचा समावेश होता.
 
यश बिर्ला तेव्हा अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये एमबीएचा अभ्यास करत होते. यानंतर 800 कोटींच्या उद्योगाची जबाबदारी यश यांच्या खांद्यावर आली.
 
काही वर्षांपूर्वी 'राँदेव्ह्यू विथ सिमी गरेवाल' या टीव्ही शोमध्ये बोलताना यश बिर्लांनी सांगितलं, "सकाळचे सात वाजले होते आणि माझ्या आत्याचा फोन आला. तिने सांगितलं की एक विमान अपघात झालाय. मी झोपेतच विचारलं - काय? तिने सांगितलं - तुझे आई-बाबा त्या विमानात होते. मी म्हटलं माझी बहीण कुठे आहे? तिला फोन दे. तिने सांगितलं की ती देखील त्या विमानातच होती."
 
या फोन कॉलनंतर यश वेडेपिसे झाले. विमान दुर्घटनेमध्ये मारल्या गेलेल्या लोकांची यादी तोपर्यंत जाहीर करण्यात आली नव्हती.
 
यश यांनी आपल्या मित्रांना फोन करून तातडीने बोलवून घेतलं. आणि न्यूयॉर्क, लंडनमार्गे मुंबईसाठी रवाना झाले.
 
या शोमध्ये त्यांनी सांगितलं, "या संपूर्ण प्रवासादरम्यान काय झाले ते मला आठवत नाही... तुम्ही माझ्या आईबद्दल विचारल्यावर माझ्या अंगावर काटा आला... माझा विश्वासच बसत नव्हता की एका क्षणात माझं कुटुंब माझ्यापासून दूर गेलं होतं"
 
लहानपणापासून आपल्याला धर्म आणि तत्वज्ञानाची पुस्तकं वाचायला आवड होती आणि याचाच फायदा आपल्याला या धक्क्यातून सावरण्यासाठी झाल्याचं यश यांनी सांगितलं.
 
उद्योग अडचणीत
पण 1990 नंतर असं काय झालं की 2013-14 येईपर्यंत उद्योग अडचणीत आला.
 
यश बिर्ला समूहाच्या कंपन्यांची अवस्था वाईट आहे का, असा सवाल जून 2013मध्ये मनीलाईफ वेबसाईटवरच्या एका लेखात विचारण्यात आला होता.
 
जेनिश बिर्ला आणि बिर्ला पॉवर सोल्यूशन्सया दोन कंपन्यांमध्ये गुंतवलेले पैसे आपल्याला परत मिळत नसल्याचं गुंतवणूकदार पत्र लिहून सांगत असल्याचं या लेखात म्हटलंय.
 
या लेखानुसार 1 मार्च 2013रोजी समूहातील आठपैकी सात कंपन्यांचे रिटर्न्स नकारात्मक होते.
 
या आठ कंपन्या होत्या - बिर्ला कॅपिटल ऍण्ड फायनान्शियल सर्व्हेसेस, बिर्ला कॉट्सिन (इंडिया), बिर्ला पॅसिफिक मेडस्पा, बिर्ला पॉवर सोल्यूशन्स, बिर्ला प्रिसीजन टेक्नॉलॉजीज, बिर्ला श्लोका एज्युटेक, मेल्स्टॉर इन्फर्मेश टेक्नॉलॉजीज आणि जेनिश बिर्ला (इंडिया).
 
आपल्या कंपन्यांच्या मंदावण्याचं कारण म्हणजे या कंपन्या सल्लागारांतर्फे चालवण्यात येत होत्या. आणि हे सल्लागार आपली मोठी आत्या प्रियंवदा बिर्ला आणि बिर्ला कुटुंबातल्या व्यापारात विशेष रस नसणाऱ्या लोकांतर्फे पाठवण्यात येत असल्याचं 2013मध्ये यश बिर्लांनी बिझनेस स्टँडर्डशी बोलताना सांगितलं होतं.
यश म्हणाले, "मी माझी टीम गोळा करेपर्यंत आठ-नऊ वर्षं उलटली होती."
 
इंजिनियरिंग, टेक्स्टाईल, केमिकल्स, वेलनेस, लाईफस्टाईल, आयटी या क्षेत्रांमधील त्यांच्या 20 कंपन्यांची वार्षिक उलाढाल 3000 कोटी रुपयांच्या आसपास होती. आणि कर कापण्याआधी त्यांच्या कंपन्यांचा फायदा 1000 कोटींच्या आसपास होता.
 
या वर्तमानपत्रानुसार आर्थिक अडचणी असूनही यश बिर्लांच्या कंपन्यांच्या योजना मोठमोठ्या होत्या. पुण्याजवळ सोलार सेल बनवण्यासाठी त्यांनी 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
 
महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यात 600 मेगावॉटच्या कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पामध्ये 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. वेलनेस उद्योगाला चालना देण्याचे प्रयत्न करण्यात आले. यासोबतच आफ्रिकेमध्ये गुंतवणूक करण्याचीही त्यांची इच्छा होती.
 
तथाकथित आर्थिक घोटाळ्यांबद्दल यश बिर्लांची चौकशी होत असून मुंबई पोलिसांनी बिर्ला पॉवर सोल्यूशन्स विरुद्ध त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिट स्कीमचे पैसे परत न केल्याबद्दल चौकशी सुरू केल्याच्या बातम्या 2014मध्ये आल्या.
 
बातम्यांनुसार कंपनीने एकूण 8,800 गुंतवणूकदारांचे 214 कोटी रुपये देणं होतं.
 
बिर्ला पॉवरच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली. आणि यश बिर्लांना देश न सोडण्याचे आदेश देण्यात आले.
 
वेगवेगळ्या सरकारी एजन्सीज या कंपनीची चौकशी करत होत्या. शिवाय ज्या कामासाठी पैसा गोळा करण्यात आला होता, तो नेमका कसा वापरण्यात आला याचीही तपासणी होत असल्याचं वृत्त आहे.
 
या पैशाचा वापर करून परदेशात गुंतवणूक करण्यात आली का, याचाही शोध घेतला जातोय.
 
यातच कंपनीच्या ऑफिसेसवर छापे पडल्याचीही बातमी आली.
 
एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा हवाला देत 'मिंट'या वर्तमानपत्राने छापलं की गुंतवणूकदारांचे पैसे फेडता यावेत यासाठी यश बिर्लांचे नातेवाईक असणाऱ्या कुमार मंगलम बिर्लांनी त्यांना 30 कोटी रुपये दिले. पण त्या पैशांचा वापर इतर कशासाठी तरी करण्यात आला.
 
2016मध्ये एशियन एज वृत्तपत्रात असं छापून आलं की यश बिर्ला त्यांचं सुप्रसिद्ध घर - बिर्ला हाऊस गमावू शकतात. राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने त्यांची मालमत्ता जप्त केल्याचंही या वृत्तात म्हटलं होतं.
 
पण त्याचवेळी या वृत्तपत्राने यश बिर्लांचे वकील असणाऱ्या रमाकांत गौड यांचंही म्हणणं छापलं होतं. ते म्हणाले होते की 100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असताना इतर मालमत्ता जप्त करण्याची गरज नव्हती.
 
बिर्ला पॉवर सॉल्यूशन्स कंपनी गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याच्या तयारी असल्याची बातमी मिड-डे वर्तमानपत्रात 2017मध्ये छापून आली.
 
यश बिर्ला आणि त्यांच्या कंपन्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची नेमकी परिस्थिती काय आहे हे स्पष्ट नाही.
 
आम्ही यश बिर्लांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

विनीत खरे