1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (17:30 IST)

मुकेश अंबानी-जेफ बेझोसः रिलायन्सला धक्का, कोर्टाचा अॅमेझॉनच्या बाजूने निर्णय

सुप्रीम कोर्टानं अॅमेझॉनच्या बाजूने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे आगामी वर्षांत देशात ई-कॉमर्सच्या वाढीला गती मिळू शकते.
 
रिलायन्सनं देशातील दुसऱ्या क्रमांकाची रिटेलर कंपनी असलेल्या फ्युचर ग्रुपच्या व्यवसायातील काही भागाची खरेदी केली होती. त्या विरोधात सिंगापूरच्या लवादानं आदेश दिला होता. तोच निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला आहे.
 
लवादानं दिलेला आदेश हा भारतीय कायद्यांतर्गत लागू करणं शक्य असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. फ्युचर ग्रुपनं दिल्ली उच्च न्यायालयात आदेशाला आव्हान दिलं होतं.
 
कोरोनाच्या जागतिक साथीच्या संकटामुळं अडचणीत आलेला व्यवसाय टिकण्यासाठी हा व्यवहार महत्त्वाचा होता, असा युक्तिवाद फ्युचर ग्रुपच्या वतीनं करण्यात आला होता.
 
पण न्यायालयानं हा व्यवहार रोखला आहे. अपील करण्यात आल्यानंतर कोर्टानं दुसरा आदेश देत, हा व्यवहार करण्याची परवानगी दिली होती.
 
यानंतर अॅमेझॉननं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता पुढं हा व्यवहार होऊ शकणार नाही.
 
फ्युचर ग्रुपनं त्यांच्या व्यवसायापैकी 3.4 अब्ज डॉलरच्या रिटेल व्यवसायाची विक्री रिलायन्स समुहाला करण्यासाठी व्यवहार केला होता.
 
जर हा व्यवहार पूर्ण झाला असता तर, देशातील 420 पेक्षा अधिक शहरांमध्ये असलेल्या 1800 हून अधिक स्टोर्समध्ये रिलायन्सच्या रिटेल व्यवसायाचा विस्तार होऊ शकला असता. तसंच फ्युचर समुहाच्या ठोक विक्री आणि लॉजिस्टीकच्या व्यवसायातही प्रवेश मिळाला असता.
 
अॅमेझॉननं यावर आक्षेप घेतला होता. त्याचं कारण म्हणजे 2019 पासून अॅमेझॉनकडे फ्युचर कुपन्सचे 49% टक्के समभाग आहेत. त्यामुळं फ्युचर रिटेलमध्ये त्यांची अप्रत्यक्ष मालकी आहे.
 
दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार फ्युचर समूह रिलायन्ससह इतर कोणत्याही भारतीय कंपनीच्या समुहाला त्यांच्या कंपनीच्या व्यवसायाचा हिस्सा विक्री करू शकत नाही, असा युक्तिवाद अॅमेझॉननं केला.
 
ऑक्टोबर 2020 मध्ये अॅमेझॉननं सिंगापूरच्या लवादाकडे हा व्यवहार रोखण्यासाठी तक्रार केली होती. तेव्हा या व्यवहारावर स्थगिती मिळवण्यात अॅमेझॉनला यश आलं होतं.
 
काय आहे प्रकरण? रिलायन्स-अॅमेझॉन यांच्यातील भांडण नेमकं काय?
 
फ्युचर ग्रूप या भारतीय रिटेल कंपनीसोबत केलेल्या दोन स्वतंत्र करारांवरून आता जेफ बेझोस आणि मुकेश अंबानी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
 
ऑनलाईन रिटेल क्षेत्रातली दिग्गज असणारी अॅमेझॉन कंपनी आणि भारतामध्ये मजबूत पाळंमुळं रुजलेली रिलायन्स कंपनी यांच्यातल्या या कायदेशीर वादातून जे निष्पन्न होईल त्याचा भारतातल्या येत्या काळातल्या ई कॉमर्सवर परिणाम होणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 
"माझ्यामते हे मोठं आहे. अॅमेझॉनला आतापर्यंत कोणत्याही बाजारपेठेत इतका मोठा स्पर्धक मिळालेला नाही," फॉरेस्टर कन्सल्टन्सीचे सीनियर फोरकास्ट अॅनालिस्ट सतीश मीना यांनी बीबीसीला सांगितलं.
 
अॅमेझॉन या कंपनीमुळे तिचे संस्थाप जेफ बेझोस हे जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले (आता हा विक्रम त्यांच्या नावावर नाही) आणि या कंपनीचं रूपांतर एका जागतिक रिटेल कंपनीत झालं.
 
पण भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या रिलायन्स प्रमुख मुकेश अंबानींना एखाद्या क्षेत्रातमध्ये उलथापालथ करण्याबद्दल ओळखलं जातं.
 
रिटेल क्षेत्रासाठीच्या त्यांच्या योजना या अॅमेझॉनसाठी आणि वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टसाठीही आव्हान ठरणार असल्याचं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना वाटतं.
 
भारतातली ई कॉमर्स बाजारपेठ झपाट्याने विस्तारतेय आणि याचा फायदा घेण्यासाठी अॅमेझॉन भारतामध्ये विस्तार करण्याचा आक्रमकपणे प्रयत्न करत आहे. ई कॉमर्स आणि किराणा व्यापार अशा दोन्ही पातळ्यांवर विस्तार करण्याची रिलायन्सचीही योजना आहे.
 
फ्युचर ग्रुपवरून काय वाद आहे?
किशोर बियानींच्या फ्युचर समूहाने त्यांच्या रिटेल व्यवसायाचा काही भाग 3.4 अब्ज डॉलर्सला रिलायन्सला याच वर्षाच्या सुरुवातीला विकला.
 
2019 सालामध्येच अॅमेझॉनने फ्युचर समूहाच्या फ्युचर कूपन्समध्ये 49 टक्के हिस्सा घेतलाय. यामुळे अॅमेझॉनला फ्युचर रिटेलमध्ये अप्रत्यक्ष मालकी मिळते. हा हिस्सा खरेदी करतानाचा फ्युचर समूहाला रिलायन्ससह काही निवडक भारतीय कंपन्यांना हिस्सा विकण्यासाठी मनाई करणारी अट घालण्यात आली होती, असा अॅमेझॉनचा दावा आहे.
 
प्रामुख्याने दुकानांमधून होणाऱ्या विक्रीवर फ्युचर रिटेलचा उद्योग अवलंबून आहे. पण कोरोनाच्या साथीचा या व्यवसायाला मोठा फटका बसला. कंपनी टिकवून ठेवण्यासाठी रिलायन्ससोबतचा करार आवश्यक असल्याचं फ्युचर रिटेलचं म्हणणं आहे.
 
याच मुद्द्यावर कोर्टात वाद सुरू आहे. आधीच्या कोर्टाने रिलायन्ससोबतच्या विक्रीचा हा व्यवहार स्थगित केला होता. पण सोमवारी दिल्ली हायकोर्टाने ही स्थगिती उठवली आणि निर्णय फ्युचर समूहाच्या बाजूने दिला.
 
अॅमेझॉनने याच्या विरोधात अपील केलंय.
 
काय पणाला लागलंय?
फ्युचर समूह आणि रिलायन्समधला हा सौदा झाला तर रिलायन्सला भारतातल्या 420 पेक्षा जास्त शहरांतल्या 1800 पेक्षा जास्त रिटेल स्टोअर्सचा ताबा मिळेल. सोबतच फ्युचर समूहाचा होलसेल उद्योग आणि लॉजिस्टिक्स विभागही रिलायन्सला मिळेल.
 
सतीश मीना सांगतात, "रिलायन्स एक असा स्पर्धक आहे ज्यांच्याकडे पैसा आहे आणि ज्यांच्या नावाचा मार्केटमध्ये दबदबा आहे. पण त्यांच्याकडे ई कॉमर्ससाठीचं प्रभुत्वं नाही."
 
अॅमेझॉनचा विजय झाल्यास ते त्यांच्या स्पर्धकाची ई कॉमर्समधली प्रगती मंदावण्यामध्ये यशस्वी ठरतील.