बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (09:32 IST)

Tokyo Olympic : भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव, 'कांस्य' जिंकण्याची संधी हुकली

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाची कांस्य पदक जिंकण्याची संधी हुकली आहे. इंग्लंडनं 4-3 नं भारतीय संघाचा पराभव केला.
पहिल्या क्वार्टरमध्ये सामना इंग्लंडच्या बाजुनं झुकला होता. तर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानं आघाडी घेतली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ बरोबरीत राहिले होते.
मात्र. चौथ्या क्वार्टरमध्ये चौथा गोल करत इंग्लंडनं आघाडी घेतली आणि सामना संपेपर्यंत ती आघाडी कायम ठेवत कांस्य पदकाची कमाई केली.या सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव झाला असला तरी आजवरच्या इतिहासातील ही महिला हॉकी संघाची सर्वोच्च कामगिरी समजली जात आहे.
 
दुसऱ्या क्वार्टरअखेर दोन्ही संघ 3-3 नं बरोबरीत राहिले होते. मात्र, तिसऱ्या क्वार्टरमध्ये इंग्लंडच्या संघाची कामगिरी सरस ठरल्याचं पाहायला मिळालं.उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाला अर्जेंटिनाविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. अर्जेंटिनाने हा सामना 2-1ने जिंकला होता. त्यानंतर कांस्य पदकासाठी आज भारतीय टीम ग्रेट ब्रिटनशी लढली.
 
भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालच्या वडिलांनी महिला हॉकी संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे.''हा भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव नसून त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा विजय आहे. राणी घरी येईल तेव्हा तिचं अत्यंत उत्साहाने आणि आनंदानं स्वागत करू,'' असं ते म्हणाले.भारतीय महिला हॉकी संघानं अनेक मुलींसाठी प्रेरणादायी कामगिरी केल्याचंही, ते म्हणाले.
 
खराब सुरुवातीनंतर कामगिरी उंचावली
भारतीय महिला संघ केवळ तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. 1980 मध्ये मॉस्को इथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला संघ पहिल्यांदा क्रीडाविश्वातल्या या सर्वोच्च स्पर्धेसाठी पात्र ठरला.
 
त्यानंतर तब्बल 36 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय महिला संघाला ऑलिम्पिकचे दरवाजे उघडले होते. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण भारतीय महिला संघाला एकही सामना जिंकता आला नाही. गटात तळाशी राहण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली होती.यंदाही भारतीय संघाची ऑलिम्पिक मोहिमेची सुरुवात निराशाजनकच झाली. महिला संघाने सलग तीन सामने गमावले होते.
 
प्रशिक्षक जरोड मार्जिन यांनी संघाच्या कामगिरीवर जोरदार टीका केली होती. खेळाडू वैयक्तिक स्वरुपाचं खेळत असून त्यांनी संघ म्हणून खेळायला हवं असं त्यांनी म्हटलं होतं.त्यानंतर मात्र भारतीय महिला संघाची कामगिरी उंचावत गेली आणि त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.