सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

भारतातल्या या 132 गावांमध्ये मुली जन्माला आल्याच नाहीत?

- सौतिक बिस्वास
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंड राज्यातल्या 132 गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये एकाही मुलीचा जन्म झाला नसल्याचं एका अहवालात समोर आलं आणि खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
 
ज्या गावांमध्ये मुलींचा जन्म झालेला नाही, ती गावं उत्तरकाशीतली आहेत. इथल्या 550 गावांमध्ये आणि 5 शहरांमध्ये मिळून सुमारे 4 लाख लोक राहतात. यातला बहुतांश भाग डोंगराळ आणि दुर्गम आहे. बेकायदा गर्भलिंग चाचण्या आणि गर्भपातामुळे देशातलं स्त्री-पुरुष लोकसंख्येचं गुणोत्तर बिघडत असताना या बातमीमुळे खळबळ उडाली आहे.
 
पण कदाचित याला दुसरीही बाजू आहे. या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की, एप्रिल ते जून या कालावधीमध्ये या 132 गावांमध्ये 216 मुलांचा जन्म झाला पण एकाही मुलीचा जन्म झालेला नाही. पण याच कालावधीमध्ये इतर 129 गावांमध्ये 180 मुलींचा जन्म झाला असून एकाही मुलाचा जन्म झाला नसल्याचं अधिकाऱ्यांना आढळलं आहे. तसंच आणखी वेगळ्या 166 गावांमध्ये 88 मुली आणि 78 मुलग्यांचा जन्म झाल्याची नोंद करण्यात आली आहे. उत्तरकाशीमध्ये एप्रिल ते जून या कालावधीमध्ये एकूण 961 जन्मांची नोंद झाली. यापैकी 479 मुली होत्या आणि 468 मुलं होते. (इतर बाळांचा कदाचित जन्माआधीच मृत्यू झालेला होता).
 
जिल्ह्याच्या 1000 पुरुषांमागे 1024 महिला या गुणोत्तराकडे पाहता जन्मांची ही आकडेवारी त्याच्याशी जुळणारी असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. देशभरामधलं सरासरी लिंग गुणोत्तर (Sex Ratio) हे 1000 पुरुषांमागे 933 महिला असं आहे. आकडेवारी गोळा करण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या स्वयंसेवकांनी दिलेली जन्मांच्या आकडेवारीपैकी मीडियाने हवी ती आकडेवारी निवडली, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. जवळपास 600 असे स्वयंसेवक आहेत जे गरोदर महिलांची आणि मुलांच्या जन्मांची नोंद ठेवतात तसंच लसीकरण करतात आणि गर्भनिरोधक कार्यक्रमही राबवतात.
 
"मला वाटतं गावांमध्ये मुलींचा जन्म न झाल्याच्या माहितीचा मीडियाने चुकीचा अर्थ लावला. शिवाय यामागचा संदर्भही समजून घेतला जात नाही आहे. पण तरीही आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत." जिल्ह्यातले सगळ्यांत ज्येष्ठ अधिकारी असणारे आशिष चौहान यांनी सांगितलं.
 
म्हणून मग आता 82 गावांमध्ये 26 अधिकारी पाठवण्यात आले असून या आकडेवारीची सत्यता तपासण्यात येत आहे. बरोबरीने काही चुकीचं घडतंय का? याचाही तपास करण्यात येणार आहे.
 
या सगळ्या प्रकरात काय चुकलं असावं?
एक शक्यता अशी आहे की ही आकडेवारी चुकीची किंवा अपूर्ण आहे आणि या आरोग्य सेवकांकडून चूक झाली असावी. त्यांनी 'मुलांचे जन्म' काही गावांच्या गटांसाठी नोंदवले आणि 'मुलींचे जन्म' दुसऱ्या गटाचे नावाने टाकले का?
 
दुसरं म्हणजे उत्तरकाशीमध्ये लोकसंख्या विरळ आहे. गावांची सरासरी लोकसंख्या 500 आहे आणि काही दुर्गम गावं अशीही आहे ज्यांची लोकसंख्या जेमतेम 100 आहे. आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की सर्वात लहान गावांमध्ये जास्तीत जास्त 10-15 घरं असतात. आणि अशी लहानशी लोकवस्ती असणाऱ्या गावांमध्ये एकाच लिंगाच्या बाळांचे जन्म झाले तर 'त्याचा आकडा इतका मोठा नसतो.'
 
"जर इतक्या गावांमध्ये मुलींचा जन्म झाला नसता, तर त्याचा परिणाम जिल्ह्याच्या लिंग गुणोत्तरावर झाला असता," चौहान म्हणतात. या भागामध्ये मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव कधीच करण्यात आला नाही असं म्हणत स्थानिक इथल्या चांगल्या लिंग गुणोत्तराकडे लक्ष वेधतात. "मुलगी असो वा मुलगा आम्ही फक्त ते बाळ सुदृढ आणि आनंदी असावं अशी प्रार्थना करतो," स्थानिक रोशनी रावत यांनी हिंदुस्तान टाईम्स दैनिकाला सांगितलं. शिवाय इथल्या महिला पुरुषांपेक्षा जास्त कष्टाची कामं करतात. शेतामध्ये काम करणं, गवत कापणं, गायीचं दूध काढणं, स्वयंपाक करणं आणि घरातली कामं करणं अशा सगळ्या गोष्टी त्या करतात. पुरुषांमध्ये दारुच्या आहारी जाण्याचं प्रमाण जास्त आहे.
 
अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये इथे स्त्रीभ्रूण हत्येची घटना आढळलेली नाही. जिल्ह्यामध्ये तीन नोंदणीकृत अल्ट्रासाऊंड मशीन्स असून ती सरकारी रुग्णालयांमध्ये आहेत. "बेकायदेशीररित्या गर्भपात करावा किंवा गर्भ लिंग निदान करावं अशी इथली आर्थिक परिस्थिती नाही," चौहान म्हणतात. एप्रिल ते जून या कालावधीमध्ये नोंदवण्यात आलेल्या 961 मुलांच्या जन्मापैकी 207 बाळंतपणं घरी झाली होती. (इतर जन्मांची नोंद रुग्णालयं किंवा संस्थांमध्ये करण्यात आली.) यापैकी 109 मुलगे होते आणि 93 मुली होत्या. जिल्ह्याच्या लिंग गुणोत्तराशी हे मिळतं-जुळतं आहे.
 
"हे एक कोडं आहे. याचा आम्ही तपास करणार आहोत. दुर्गम भागांमध्ये जिथे अॅम्ब्युलन्स पोहोचू शकत नाही किंवा जिथून क्लीनिकला येता येत नाही तिथे सहसा बाळंतपण घरी केलं जातं." जिल्ह्यातले वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सिंह रावत यांनी मला सांगितलं. उत्तराखंडमधल्या या 'न जन्मलेल्या मुलींचं'हे कोडं नेमकं काय आहे ते साधारण आठवडाभरामध्ये आपल्याला समजेलच.