सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

'बाळाला जन्म दिल्यानंतर अर्ध्या तासांतच मी परीक्षा द्यायला शाळेत परतले'

- अॅमाडू दियालो
आफ्रिकेतील गिनी देशातील एका तरुणीची सध्या जगभर चर्चा सुरू आहे.
 
फतौमता कौरौमा नावाची ही 18 वर्षांची तरुणी मंगळवारी परीक्षा द्यायला ममाऊ शहरातील परीक्षा केंद्रात गेली. मात्र तिला तिथेच प्रसूती कळा येऊ लागल्याने परीक्षा कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं.
 
सुदैवाने सारंकाही वेळेत पार पडल्यानं तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ सुखरूप असल्याचं कळताच तिला पुन्हा आपल्या परीक्षेची आठवण झाली आणि अवघ्या अर्ध्या तासात ती परीक्षा देण्यासाठी पुन्हा हजर झाली.
 
पदवीचं शिक्षण पूर्ण करण्याचा मी निर्धार केला होता, असं फतौमता सांगते.
 
"खरंतर सोमवारी रात्रीपासूनच माझ्या पोटात दुखत होतं. पण मी दुसऱ्याच दिवशी बाळाला जन्म देईन असं मला वाटलं नव्हतं," असं फतौमताने AFP वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
 
"मी माझा पती किंवा माझ्या शाळेत काहीही न सांगता परीक्षा देण्याचं धाडस केलं. मी त्यांना कुणालाही मला दुखत असल्याचं सांगितलं असतं तर त्यांनी मला घरात थांबायला सांगितलं असतं किंवा ते मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असते," असं फतौमता सांगते.
 
शाळेतील कर्मचाऱ्यांनी फतौमताला हॉस्पिटलमध्ये नेलं, तेव्हा काही अवधीतच कळलं की ती बाळाला जन्म देणार आहे. त्यानंतर तिने बाळाला जन्म दिला. मात्र बाळाला आई-वडिलांच्या हातात सोपवलं आणि फतौमता हॉस्पिटलमधून पुन्हा परीक्षा केंद्रात पोहोचली.
 
भौतिकशास्त्र आणि फ्रेंच अशा दोन विषयात तिची पदवीची परीक्षा होती.
 
बाळाला जन्म देऊन हॉस्पिटलमधून शाळेत परतल्यानंतर खरंतर परीक्षा सुरू झाली होती. मात्र पर्यवेक्षकांनी तिला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली.
 
त्यानंतर बरंही वाटत होतं आणि काही त्रासही झाला नाही, असं फतौमताने बीबीसीशी बोलताना सांगितलं.
 
फतौमता आणि तिचं बाळ दोघेही आता सुखरूप आहेत.
 
गिनीत दर तीनपैकी एक महिला वयाच्या 18व्या वर्षीच बाळाला जन्म देते, असं युनिसेफची आकडेवारी सांगते. गरोदर तरुणी किंवा किशोरवयीन मातांना शाळेत ठेवण्यासंदर्भात आफ्रिकेतील 18 देशांमध्ये कोणतेही कायदे किंवा धोरणं नाहीत. गिनी हासुद्धा त्यातील एक देश आहे, असं ह्युमन राईट वॉचचा अहवाल सांगतो.
 
टांझानिया, सिएरा लिओन सारख्या देशात तर मुलींचं आयुष्य आणखी खडतर आहे. कारण तिथे गर्भवती असल्यास मुलींना शाळेतून काढलं जातं. तसं तेथील सरकारचं धोरणंच आहे.