मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 6 मे 2021 (22:10 IST)

ICU बेडसाठी जावयाने दिले एक लाख रुपये, पण...

देवदत्त कशाळीकर
पिंपरी चिंचवड मध्ये सुरेखा वाबळे यांना कोव्हिडची लागण झाल्याने पिंपरी चिंचवडमध्ये ऑक्सिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. त्यांची प्रकृती ढासळली आणि ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडसाठी शोधाशोध सुरू झाली. त्यासाठी त्यांच्या घरच्यांनी तब्बल एक लाख रुपये मोजले.
 
वाबळे यांना महापालिकेच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये बेड मिळाला खरा, पण दोन दिवसातच त्यांची प्राणज्योत मालवली. वाबळे यांच्या कुटुंबियांनी महापालिकेच्या रुग्णालयात बेड साठी एक लाख रुपये मोजल्याची बाब बाहेर आली आणि एकच खळबळ माजली.
 
कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण भारतातील लोक हतबल झाल्याचं चित्र आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची वानवा आहे. तो मिळवण्यासाठी लोक वाटेल त्या थराला जातात. वाबळे कुटुंबीय हे त्याचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. या घटनेविषयी अधिक माहिती घेत असताना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
 
अमोल थोरात हे सुरेखा वाबळे यांचे जावई. त्या आजारी पडल्यापासून त्यांच्याबरोबर होते. ते म्हणाले, "माझ्या सासूबाईंची तब्येत खराब झाली, तेव्हा आम्हाला खासगी रुग्णालयात बेड हवा होता. आम्हाला महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळणार हे माहिती असतं तर आम्ही पैसेच दिले नसते. कारण खासगी हॉस्पिटलासाठी आम्ही प्रयत्न करत होतोच. मी सचिन कसबे नामक व्यक्तीच्या संपर्कात होतो. आम्ही त्यांना पद्मजा हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो. आम्हाला वाटलं तिथेच बेड मिळेल. पण तिथे बेड नव्हता. त्याऐवजी दुसरीकडे बेड देतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यासाठी 1 लाख रुपये मागितले. आम्ही तीन दिवस बेड शोधत होतो पण कुठेच मिळाला नाही. त्यामुळे आम्ही तसेच चिंतेत होतो. या माणसाने आम्हाला आशेचा किरण दिला. मात्र पैसे जमा केल्याशिवाय हॉस्पिटलचं नाव सांगणार नाही, असं ते म्हणाले. तरी आम्ही तयार झालो.
 
"आम्ही पंधरा ते वीस मिनिटांत पैशांची व्यवस्था केली आणि कसबेंनी सांगितल्याप्रमाणे एका मुलाकडे ते सुपूर्द केले. पंधरा वीस मिनिटांनी आम्हाला महापालिका संचलित ऑटोक्लस्टर कोव्हिड केअर सेंटरला बेड मिळाल. तिथे जायला सांगितलं. इथे माझ्या सासूबाईंची तब्येत बिघडत चालली होती, त्यामुळे आम्हाला कसंही करून बेड हवाच होता. ऑटोक्ल्स्टरला आम्ही सासूबाईंना दाखल केलं. तेव्हापासून आम्ही सतत डॉक्टरांच्या संपर्कात होतो. शेवटी डॉक्टरने चिडून संपर्क करायला मनाई केली. मग आम्हाला कसबेंकडूनच ख्यालीखुशाली कळू लागली. 28 तारखेला सकाळी मला, तुमचा पेशंट सिरियस असल्याचा फोन आला. म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला. नंतर ही गोष्ट नगरसेवक कुंदन गायकवाड यांना कळली." थोरात पुढे सांगत होते.
 
कुंदन गायकवाड हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक आहेत. सुरेखा वाबळे या त्यांच्या शिक्षिका. आपल्या शिक्षिकेसाठी त्यांनी बेडसाठी ऑटोक्ल्स्टरला बेडसाठी विचारणा केली होती. तेव्हा त्यांना बेड उपलब्ध नसल्याचं सांगितलं. मात्र काही वेळातच वाबळे तिथे दाखल झाल्याचं कळलं. मात्र त्यासाठी एक लाख रुपये मोजल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ऑटोक्लस्टरल कोव्हिड केअर सेंटरवर जाऊन जाब विचारला. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे चालवण्यात येणारं ऑटोक्लस्टर कोव्हिड सेंटर 'स्पर्श' ही संस्था चालवते. त्यांचा आणि पद्मजा हॉस्पिटलचा यात हात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
 
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ
महापालिका कोव्हिड केअर सेंटरला पैसे देत असतानाही रुग्णांकडून बेडसाठी एक लाख रुपये उकळणं, हे प्रकरण मिटवण्यासाठी केलेले आटोकाट प्रयत्न, यासाठी स्पर्श संचालित ऑटोक्ल्स्टर कोव्हिड केअर सेंटर आणि चिंचवड येथील पद्मजा हॉस्पिटल वर खंडणी आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी महापालिकेच्या महासभेत करण्यात आली.
 
स्पर्श संस्थेवर गुन्हा दाखल केला नाही, तर आयुक्तांवर गुन्हा दाखल करावा अशीही मागणी महासभेत जोर धरू लागली.
 
यावेळी भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी ऑटोक्ल्स्टर कोव्हिड केअर सेंटरमध्ये बेडसाठी एक लाख घेतल्याचं संभाषणाचं रेकॉर्डिंग सभेत सर्वाना ऐकवलं.
 
ते ऐकून सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिका ऑटो क्लस्टर आणि पद्मजा रुग्णालयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ऑटोक्लस्टरमधूनच सर्वात जास्त रेमडेसिव्हीर बाहेर गेल्याचे आरोपसुद्धा करण्यात आले आणि ऑटोक्लस्टरचं कंत्राट रद्द करावं, अशीही मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात आली.
 
प्रकरणी स्पर्श संस्थेत काम करणारे डॉक्टर प्रवीण जाधव, वाल्हेकरवाडी येथील पद्मजा हॉस्पिटलचे डॉक्टर शशांक राळे आणि सचिन कसबे यांनी लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप महापालिकाच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला.
 
स्पर्श संस्थेबाबत वारंवार तक्रारी येत असूनही हा विषय सभागृहाच्या पटलावर का घेतला जात नाही, असा प्रश्न विचारत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांवर हल्लाबोल केला. आयुक्तांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली.
 
नगरसेवकांकडून करण्यात आलेले गंभीर आरोप, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी अशी तक्रार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी गेल्या शनिवारी पोलिसात दिली.
 
दरम्यान महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे वरील प्रकरणाबाबत लेखी तक्रार दिली.
 
कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणाचा छ़डा लागला पाहिजे आणि अशी वेळ कुणावरही येऊ नये यासाठी दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे असं कुंदन गायकवाड बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले. तसंच ही लढाईची सुरुवात आहे वाईट अनुभव आलेल्या लोकांनी पुढे यावे आणि सत्य सांगावं असं आवाहन नगरसेवक विकास डोळस यांनी केलं आहे.
 
याप्रकरणी पद्मजा हॉस्पिटलचे डॉक्टर शशांक राळे, सचिन कसबे, स्पर्श संस्थेचे डॉक्टर प्रवीण जाधव यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना सध्या पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
 
या प्रकरणानंतर आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिकेचे कोव्हिड हॉस्पिटल संचालन करणाऱ्या फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केयरचा थेट रुग्ण दाखल करून घेण्याचा अधिकार काढून घेतला आहे.
 
यापुढे यशवंतराव चव्हाण रुग्णालयाततून संदर्भित केलेले रुग्णच येथे उपचार घेऊ शकतील असं आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केलं आहे. यापुढे असे प्रकार होणार नाही यासाठी अधिक खबरदारी घेतली जाईल असं महापालिका आयुक्त राजेश पाटील बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.
 
तसंच एखाद्या व्यक्तीने बेडसाठी पैसे मागितल्यास थेट पोलिसात तक्रार करा असं आवाहन सहायक पोलीस आयुक्त सागर कवडे यांनी नागरिकांना केलं आहे.
 
सुरेखा वाबळे यांचे जावई अमोल थोरात यांना त्यावेळी त्यांच्या सासूबाईंचा जीव वाचवायचा होता. त्या हतबलतेतून एक लाख रुपये कसबे यांना दिले असा त्यांचा दावा आहे. मात्र पैसे मोजून देण्याच्या प्रवृत्तीला आळा बसायला हवा आणि त्यासाठी दोषींवर जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी आणि अशी वेळ कोणावरच येऊ नये असं ते बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.
 
(शब्दांकन- रोहन नामजोशी)