1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 6 मे 2021 (14:23 IST)

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?

गीता पांडे
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि आसपासच्या भागातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.
 
'आमचे खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या गरजेच्या वेळी कुठे आहेत', असा सवाल आता वाराणसीची जनता विचारू लागली आहे.
 
वाराणासीत पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. हॉस्पिटल्समध्ये बेड्स नाहीत, ऑक्सिजन नाही, अॅम्बुलन्ससुद्धा मिळत नाही. इतकंच नाही तर कोरोना चाचणी करण्यासाठीही आठवडाभर वाट बघावी लागतेय.
 
गेल्या दहा दिवसात औषधांच्या दुकानांमध्ये व्हिटॅमिन सी, झिंक आणि पॅरासिटमॉलसारख्या साध्या औषधांचाही तुटवडा निर्माण झालाय.
 
शहरातल्या आरोग्य सेवेतील एका कर्मचाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं, "हॉस्पिटल बेड किंवा ऑक्सिजनसाठी आम्हाला दररोज बरेच फोन येतात. साध्या-साध्या औषधांचाही तुटवडा आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की काही नसण्यापेक्षा काहीतरी असावं म्हणून लोक मुदत उलटून गेलेली औषधंही घेत आहेत.
कोरोना संकट हाताबाहेर का गेलं?
मार्च महिन्यातच संकटाची चाहुल लागायला सुरुवात झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये सरकारने निर्बंध घालायला सुरुवात केली. परिणामी परराज्यातले कामगारही आपापल्या गावांकडे परतू लागले. खचाखच भरलेल्या ट्रेनमधून वाराणासी आणि आसपासच्या गावांमध्ये लोक येऊ लागले.
 
29 मार्चला होळी होती. अनेकजण होळीसाठी गावी परतले. तर काही जण ग्रामपंचायत निवडणुकांसाठी गावी गेले. तज्ज्ञांनी सल्ला देऊनही त्याकडे दुर्लक्ष करत 18 एप्रिल रोजी निवडणुका घेण्यात आल्या.
 
निवडणूक ड्युटीवर असणाऱ्या 700 शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि निवडणुकांमुळे कोरोना अधिक पसरला, असं पत्रकारांचं म्हणणं आहे.
 
परिणामी वाराणसीतल्या हॉस्पिटलमध्ये अचानक गर्दी वाढली. 25 वर्षांचे ऋषभ जैन व्यावसायिक आहेत. बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, त्यांच्या 55 वर्षांच्या काकूंची तब्येत अचानक बिघडली.
त्यांच्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर आणण्यासाठी ऋषभ रोज 30 किमी प्रवास करून 5-5 तास रांगेत उभं राहून सिलेंडर भरून आणायचे.
 
ते सांगतात, "त्यांची ऑक्सिजनची पातळी 80 च्या खाली गेली की आमचा जीव टांगणीला लागायचा. आम्हाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही. त्यामुळे आम्ही ऑक्सिजन सिलेंडर कुठे मिळेल, याची शोधाशोध सुरू केली. 25 लोकांना फोन केले. तेव्हा कुठे सोशल मीडिया आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने ऑक्सिजन सिलेंडरची सोय झाली. आता त्यांची प्रकृती सुधारतेय."
 
या परिस्थितीत 19 एप्रिल रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने वाराणसीसह इतर 4 शहरांमध्ये आठवडाभरासाठी लॉकडाऊन लावण्याचा आदेश दिला. मात्र, राज्य सरकारने हा आदेश धुडकावत त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. आमच्यासाठी प्राण आणि उदरनिर्वाह दोन्ही महत्त्वाचं असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं होतं. मात्र, दोन्ही बाबतीत राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका होतेय.
 
जिल्हा प्रशासनाने विकेंड कर्फ्यू लावला. या लॉकडाऊनच्या भीतीने व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत. हजारो लोकांचा रोजगार गेला. मात्र, विषाणू अजूनही पसरतोय.
आकडेवारीवर प्रश्नचिन्ह
वाराणासीत आतापर्यंत 70,612 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोना संसर्गामुळे 690 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 एप्रिलनंतर 60% म्हणजे 46,280 रुग्णांची नोंद झाली, यावरूनच परिस्थितीच्या गांभीर्याचा अंदाज बांधता येईल.
 
सरकारी आकडेवारीनुसार वाराणसी शहरात दररोज 10 ते 11 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू होतोय. रविवारी ही संख्या 16 होती. मात्र, वाराणासीत कुणाशीही बोलल्यावर या आकडेवारीवर त्यांचा अजिबात विश्वास नसल्याचं दिसतं.
हरिशचंद्र आणि मणिकर्णिका घाटांजवळच्या भागात रहाणाऱ्या एकाने सांगितलं की गेल्या महिन्याभरापासून या घाटांवर मोठ्या प्रमाणावर अंत्यसंस्कार सुरू आहेत.
 
त्यांनी सांगितलं, पूर्वी या घाटांवर दररोज 80 ते 90 पार्थिवांवर अंत्यसंस्कार व्हायचे. मात्र, गेल्या महिनाभरापासून इथे दररोज जवळपास 300 ते 400 पार्थिवांवर अंत्यसंस्कार होतात.
 
"पार्थिवांची संख्या अचानक कशी वाढली? हे कशामुळे घडतंय, असं तुम्हाला वाटतं? इतक्या लोकांचा मृत्यू होतोय, त्यामागे काहीतरी कारण तर नक्कीच असणार? हृदय बंद पडल्याने मृत्यू झाल्याचं अनेकांच्या बाबतीत सांगितलं जातं. मात्र, अचानक इतक्या लोकांना हार्ट अटॅक कसा येतोय? बरं यात तरुणांचाही समावेश आहे", असं सगळं वास्तव ते मांडतात.
 
वाराणसीतल्याच एका व्यक्तीने नुकताच एक व्हिडियो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यात एका चिंचोळ्या गल्लीतल्या दोन्ही बाजूला मृतदेह ठेवले होते आणि या मृतदेहांची रांग जवळपास एक किमी. लांब होती.
 
प्रशासनाने दहा दिवसांपूर्वीच एक नवीन मोक्षधाम सुरू केलं आहे. तिथेही दिवस-रात्र अंत्यसंस्कार सुरू असल्याचं रहिवासी सांगतात.
 
गावांमध्ये विषाणूचा फैलाव
कोरोनाचं हे संकट केवळ वाराणसी शहरापुरतं मर्यादित नाही. भारतात आलेल्या कोव्हिड-19 च्या दुसऱ्या लाटेने उत्तर प्रदेशातल्या अनेक गावांमध्येही थैमान घालायला सुरुवात केली आहे.
 
चिरईगाव ब्लॉकमध्ये 110 गावं आहेत. लोकसंख्या आहे जवळपास 2 लाख 30 हजार. सुधीर सिंह पप्पू इथले 'प्रखंड प्रमुख' आहेत. ते सांगतात गेल्या काही दिवसात प्रत्येक गावात रोज 5 ते 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. काही गावांमध्ये तर ही संख्या 15 ते 30 च्या जवळपास आहे.
 
ते सांगतात, "ब्लॉकमध्ये एकही हॉस्पिटल नाही. ऑक्सिजन नाही. औषधं नाही. सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड रिकामे नाही. खासगी हॉस्पिटल रुग्णाला दाखल करण्याआधीच 2 ते 5 लाख रुपये भरा म्हणतात."
 
तर गावातली परिस्थिती शहरापेक्षा वाईट असल्याचं ऐधे गावात रहाणारे कमलकांत पांडे म्हणतात.
 
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "माझ्या गावातल्या सर्व 2700 लोकांची कोव्हिड चाचणी केली तर निम्मे पॉझिटिव्ह येतील. अनेकांना कफ, ताप, पाठदुखी, थकवा, अशक्तपणा, गंध आणि चव नसणे, असे त्रास आहेत."
कमलाकांत पांडे स्वतः आजारी होते. पण, आता ते बरे आहेत.
 
ते म्हणतात, "ऐधे गावात जे मृत्यू होत आहेत सरकारी आकडेवारीत त्यांची गणती नाही. कारण इथे चाचण्याच होत नाहीत."
 
"स्वतः पंतप्रधानांच्या मतदारसंघात ही परिस्थिती आहे."
 
'मोदी लपून बसलेत'
पंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच वाराणसी, तिथली जनता आणि गंगा नदीप्रती असलेल्या जिव्हाळ्याविषयी बोलत असतात.
 
मात्र, आज कोरोना संकटकाळात इथली आरोग्य व्यवस्था पुरती ढासळली आहे आणि पंतप्रधान मोदी स्वतःच्याच मतदारसंघापासून दूर आहेत.
 
आपल्या खासदाराने फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान पं. बंगालचा 17 वेळा दौरा केल्याचं इथल्या जनतेनेही बघितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याठिकाणी सर्व ताकद पणाला लावून प्रचार करत होते जिथे त्यांच्या पक्षाचा दणदणीत पराभव झाला.
 
वाराणसीतल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आदल्या दिवशी 17 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हिडविषयक बैठक घेतली होती. वाराणासीतल्या एका नाराज हॉटेल व्यावसायिकाच्या मते ही बैठक म्हणजे थट्टा होती.
 
ते म्हणतात, "पंतप्रधान आणि मुख्यमंत्री लपून बसलेत. त्यांनी वाराणासीच्या जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. भाजपचे स्थानिक नेतेही लपून बसलेत. त्यांनी फोनही स्वीच ऑफ केलेत. आज लोकांना हॉस्पिटल बेड आणि ऑक्सिजनची गरज आहे. पण, इथे पूर्णपणे अराजकतेचं वातावरण आहे. लोकांमध्ये खूप नाराजी आहे."
 
ही पंतप्रधानांची जबाबदारी असल्याचं स्थानिक काँग्रेस नेते गौरव कपूर यांचं म्हणणं आहे.
 
वाराणसीतल्या एका डायग्नोस्टिक सेंटरच्या मालकाने सांगितलं, "आमच्याकडे ऑक्सिमीटरसुद्धा नाही, असं डॉक्टर सांगतात. ते म्हणतात रुग्णाची ऑक्सिजन पातळी घसरून ते झोपेतच दगावत आहेत."
 
"माझी पत्नी आणि मुलांना कोव्हिडची लागण झाली. त्यावेळी आम्ही फोनवरूनच डॉक्टरांशी संपर्क केला आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच उपचार केले. मात्र, ज्यांना लिहिता-वाचता येत नाही, जे फोनवरून डॉक्टरांशी संपर्क करू शकत नाहीत, त्यांची अवस्था काय असेल, याची कल्पनाच केलेली बरी."