गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 3 जून 2019 (12:03 IST)

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अजगराच्या कातड्याच्या चपला घालणार?

पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वाह प्रांताची राजधानी पेशावरमधील प्रसिद्ध चर्मकार नुरउद्दीनचाचा पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी अजगराच्या कातड्यापासून चपला तयार करणार आहेत. या चपला इम्रान खान यांना ईदला भेट म्हणून ते देणार आहेत.
 
नुरुद्दीन यांनी बीबीसीला सांगितलं की यावेळी इम्रान खान यांच्या चाहत्याने त्यांना सांगितलं की ईदला इम्रान खान यांना विशेष भेट देण्याची त्याची इच्छा आहे. नोमान नावाच्या या चाहत्याने अमेरिकेहून सापाचं कातडं मागवलं आहे.
 
या कातड्यापासून चपला तयार कराव्यात अशी त्यांची इच्छा आहे. नुरुद्दीन यांनी चपला तयार करण्यास सुरुवात केली आहे. ईदच्या आधी इम्रान खान यांना ते या चपला भेट म्हणून सादर करतील असा त्यांना विश्वास आहे.
 
"ही अतिशय आरामदायी चप्पल असेल. या चपलेमुळे त्यांना उष्णतेचा त्रास जाणवणार नाही. ही चप्पल घालून कितीही काम केलं तरी ते थकणार नाहीत. मला विश्वास आहे की त्यांना या चपला नक्की आवडतील."
 
नुरउद्दीन यांचा मुलगा सलीमुद्दीन यांनी सांगितलं की त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी मिळून ही चप्पल तयार केली आहे. या चपलेचं डिझाईन करण्यात नुरुद्दीन यांचा सिंहाचा वाटा आहे.
 
सलामुद्दीन यांच्या मते ही चप्पल तयार करण्यासाठी सापाच्या चार फूट कातड्याचा वापर केला असून चपला भेट दिल्यानंतर या चपलेला ब्रँडनेमही देण्यात येईल.
 
या चपलेची किंमत पाकिस्तानी रुपयात 40 हजार रुपये आहेत.
 
जगभरात सापाच्या कातड्यापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात. लोक त्याचा वापरही करतात.
 
त्याचवेळी प्राणीहक्क कार्यकर्ते या वस्तूंचा विरोध करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात अजगराच्या कातडीपासून तयार केलेल्या वस्तूंची किंमत हजारो डॉलर्स आहे.
 
पाकिस्तानात अजगराशी निगडीत कायदे
तज्ज्ञांच्या मते चपला अजगराच्या कातडीपासून तयार केल्या जातात कारण छोट्या सापाच्या कातड्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यासाठी मोठ्या सापाचं कातडं वापरलं जातं. त्यात अजगराचाही समावेश आहे.
 
पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील प्राध्यापक आणि प्राणीशास्त्रज्ज्ञांनी सापाच्या कातड्याचा फोटो पाहिला आणि बीबीसीला सांगितलं की ही अजगराचं कातडं आहे.
 
त्यांच्या मते पाकिस्तानातील अजगर आता नष्ट झाले आहेत किंवा त्यांची संख्या आता अतिशय कमी झाली आहे.
 
पाकिस्तानमध्ये यावेळी फक्त भम्बर जिल्ह्यातच अजगर आहेत.
 
तज्ज्ञांच्या मते अजगरांची संख्या कमी होण्याचं कारणं बेकायदा व्यापार आणि तापमानाशी निगडीत गोष्टी आहेत.
 
वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते आताही अजगराची तस्करी आणि त्याच्या कातड्याच्या विक्रीची प्रकरणं समोर येत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी इस्लामाबाद वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी कमीत कमी दोन अजगरांचं कातडं जप्त केलं आहे.
 
अधिकाऱ्यांच्या मते या कातड्यांची परदेशात तस्करी करण्याचा प्रयत्न सुरू होता. पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानशिवाय संपूर्ण देशात अजगराला सुरक्षित प्रजातींचा दर्जा आहे. ते विकण्यावर आणि खरेदीवर बंदी आहे.
 
Conservation of International endangered species या संस्थेचा पाकिस्तानही सदस्यही आहे. जगभरात अजगराच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी आहे. त्याचं कातडं घेण्यासाठी या संस्थेची परवानगी घ्यावी लागते. अगदी अपवादात्मक परिस्थितीतच ही परवानगी दिली जाते.