बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 1 मे 2021 (20:37 IST)

कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी कारणीभूत - राहुल गांधी

देशातल्या सध्याच्या कोव्हिड -19च्या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी कारणीभूत असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधींनी म्हटलंय.
PTI वृत्तसंस्थेला राहुल गांधींनी मुलाखत दिली.
भारत आता जगातलं कोरोना व्हायरसचं केंद्रस्थान बनला असून आपल्या देशात जे काही सुरू आहे, ते पाहून जगाला धक्का बसला असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. ही कोव्हिड 19ची लाट नसून त्सुनामी आहे आणि त्याने सगळ्याचा विनाश होत असल्याचं ते म्हणाले आहेत.
"कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या कमी झाली तेव्हा सरकारने स्वतःचा विजय जाहीर केला आणि पंतप्रधानांनी नेहमीप्रमाणेच त्याचं श्रेय घेतलं. पण आता ते राज्यांना दोष देत असून कोव्हिडची परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर सरकारने लोकांना आत्मनिर्भर करण्याची जबाबदारी राज्यांवर ढकलली आहे आणि सध्याच्या कोव्हिड-19च्या परिस्थितीसाठी पंतप्रधान पूर्णपणे कारणीभूत आहेत," असं राहुल गांधींनी म्हटलंय.
पंतप्रधानांनी स्वतःची प्रतिमा आणि ब्रँड उभारण्याकडे लक्ष दिलं आणि ठोस काही निर्माण करण्याऐवजी आभास निर्माण करण्यावर भर दिला. मोदी सरकार उद्धट असून प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा प्रतिमा निर्माण करण्यावर त्यांचा भर असल्याची टीका राहुल गांधींनी यावेळी केली आहे.
लशींच्या किंमती आधी जास्त जाहीर करणं आणि नंतर त्या कमी करणं हे 'डिस्काऊंट सेल' सारखं असल्याचं त्यांनी म्हटलंय.
राहुल गांधी पुढे म्हणाले, "सुपरस्प्रेडर ठरू शकणाऱ्या कार्यक्रमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी प्रोत्साहन दिलं, त्याविषयी बढायाही मारल्या. कोरोना हा संकटाचा एक भाग आहे, भारतातल्या यंत्रणेकडे लक्ष देण्यात न आल्याने भारताला मोठं संकट हाताळणं कठीण जात आहे.
"माध्यमं, न्यायसंस्था, निवडणूक आयोग, अधिकारी यंत्रणा यापैकी कोणीही लक्ष ठेवायचं काम केलं नसून भारताची स्थिती वादळात पुरेशा माहिती अभावी भरकटणाऱ्या जहाजासारखी झाली आहे."