शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑगस्ट 2019 (17:16 IST)

रवी शास्त्री पुन्हा टीम इंडियाच्या कोचपदी?

टीम इंडियाचे सध्याचे कोच रवी शास्त्री, भारताचे लालचंद राजपूत आणि रॉबिन सिंग यांच्यासह फिल सिमन्स, टॉम मूडी, माईक हेसन यांची नावं शर्यतीत आहेत.
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वातील बहुचर्चित भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
 
प्रशिकपदासाठी हजारो अर्ज आल्याचं समजतंय मात्र यातून अंतिम मुलाखतीसाठी सहाजणांची निवड झाल्याचं स्पष्ट होतं आहे.
 
कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांची त्रिसदस्यीय समिती कोचची निवड करतील.
 
रवी शास्त्री
टीम इंडियाचे विद्यमान कोच. 80 टेस्ट आणि 150 वनडेंचा प्रदीर्घ अनुभव ही शास्त्री यांच्यासाठी जमेची बाजू. बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही आघाड्यांवर त्यांनी छाप उमटवली होती. ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेत मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार म्हणून शास्त्री यांना मिळालेली ऑडी गाडी आजही क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात आहे.
 
क्रिकेटपटू म्हणून निवृत्ती स्वीकारल्यानंतर शास्त्री पंधराहून अधिक वर्ष कॉमेंटेटर म्हणून खेळाशी संलग्न आहेत. 2007 मध्ये बांगलादेश दौऱ्यासाठी त्यांनी टीम इंडियाचं तात्पुरतं प्रशिक्षकपद सांभाळलं होतं.
 
2017 मध्ये सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर यांच्या समितीने शास्त्री यांची टीम इंडियाच्या कोचपदी निवड केली. कुंबळे यांच्या मार्गदर्शनामध्येच टीम इंडियाने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
 
कुंबळे यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या सेमी फायनलपर्यंत मजल मारली. वयाचा अडसर न ठेवता खेळाडूंशी त्यांच्या भाषेत संवाद साधण्याची हातोटी, प्रचंड अनुभव आणि कर्णधार विराट कोहलीचा पाठिंबा या गोष्टी शास्त्री यांचं कामकाजाचं वैशिष्ट्य आहे.
 
टॉम मूडी
जेव्हाही टीम इंडियाचा कोच निवडण्याची चर्चा होते तेव्हा तेव्हा टॉम मूडी चर्चेत असतात. ऑस्ट्रेलियाचे माजी ऑलराऊंडर असलेले टॉम 1999 वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग होते. गेली सहा वर्ष आयपीएल स्पर्धेतील सनरायझर्स हैदराबाद संघाचे कोच होते.
 
त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सनरायझर्स संघाने 2016मध्ये जेतेपदावर नाव कोरलं होतं. मॅन मॅनेजमेंट, खेळातल्या बारकाव्यांची अचूक जाण आणि शांत व्यक्तिमत्व ही टॉम यांची गुणवैशिष्ट्यं आहेत. समालोचनही करतात.
 
मूडी इंग्लंडमधील वूस्टरशायर काऊंटी क्रिकेटचे संचालक होते. ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न वॉरियर्स संघांचे ते प्रशिक्षक होते. कॅरेबियन प्रीमिअर लीगचे आंतरराष्ट्रीय संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेतील मेलबर्न रेनेगेड्स संघाचेही ते संचालक होते.
 
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील मुलतान सुलतान्स संघाचे ते कोच होते. कॅनडात नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-20 लीग स्पर्धेत त्यांनी माँट्रेअल टायगर्स संघाला मार्गदर्शन केलं. 53वर्षीय मूडी यांच्याकडे 8 टेस्ट आणि 76 वनडेंचा अनुभव आहे.
 
माईक हेसन
न्यूझीलंड संघाचे सहा वर्ष प्रशिक्षक होते. न्यूझीलंडला सातत्याने विजयपथावर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
 
आयपीएल स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे कोच होते. समालोचन करतात.
 
त्यांनी अर्जेंटिना, केनियाच्या राष्ट्रीय संघांना तसंच न्यूझीलंडच्या स्थानिक क्रिकेटमधील ओटागो संघाला मार्गदर्शन केलं. 44वर्षीय हेसन यांच्याकडे टेस्ट किंवा वनडे खेळण्याचा कोणताही अनुभव नाही.
 
लालचंद राजपूत
 
 
टीम इंडियाने 2007मध्ये वर्ल्डकप जिंकला तेव्हा राजपूत कोच होते. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिका जिंकली तेव्हाही राजपूत कोच होते. माजी खेळाडू असणाऱ्या राजपूत यांनी अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे संघाचे कोच म्हणून काम केलं आहे.
 
कॅनडात नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-20लीग स्पर्धेत विजेत्या विनीपेग संघाचे ते कोच होते. इंडिया ए संघाला मार्गदर्शन करण्याचाही अनुभव त्यांच्याकडे आहे. 57वर्षीय राजपूत यांच्याकडे 2 टेस्ट आणि 4 वनडेंचा अनुभव आहे.
 
रॉबिन सिंग
 
भारताचे माजी ऑलराऊंडर रॉबिन सिंग अनेक वर्ष आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन्स संघाचे असिस्टंट कोच आहेत. कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत बार्बाडोस ट्रायडेंट्स संघाचे कोच होते. भारतीय संघाचे फिल्डिंग कोच म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. 55वर्षीय रॉबिन यांच्याकडे एकमेव कसोटी आणि 136 वनडेंचा अनुभव आहे.
 
फिल सिमन्स
 
 
वेस्ट इंडिजचे माजी ऑलराऊंडर. झिम्बाब्वे टीमचं कोच म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर आयर्लंड संघाला त्यांनी प्रगतीपथावर नेलं. यानंतर त्यांनी वेस्ट इंडिज संघाला मार्गदर्शन केलं. त्यांच्या कार्यकाळातच वेस्ट इंडिजने ट्वेन्टी-20 वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरलं.
 
यानंतर त्यांनी अफगाणिस्तान संघाचं प्रशिक्षकपद स्वीकारलं. 56वर्षीय सिमन्स यांच्याकडे 26 टेस्ट आणि 143 वनडेंचा अनुभव आहे.
 
दरम्यान बॅटिंग कोच पदासाठी प्रवीण अमरे, विक्रम राठोड यांची नावं शर्यतीत आहेत. बॉलिंग कोच म्हणून वेंकटेश प्रसाद यांचं नाव चर्चेत आहे. जॉन्टी ऱ्होड्स यांनी फिल्डिंग कोच पदासाठी अर्ज सादर केला आहे.
 
1990 पासून भारतीय संघासाठी औपचारिकदृष्ट्या कोचची नियुक्ती होऊ लागली.