रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑगस्ट 2019 (11:28 IST)

सोनं महागलं, सोनं विकत घ्यायचं की विकायचं?

श्रीकांत बक्षी
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरतेय. सोन्यासाठी देशाची मदार आयातीवर आहे. पण डॉलरची किंमत वाढल्याने सोन्याच्या किंमतीही वाढत आहेत.
 
सोन्याच्या किंमती ज्या वेगाने वाढत आहेत तसा वेग यापूर्वी कधीही पहायला मिळाला नव्हता. आठ ऑगस्टला केवळ एका दिवसामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 1,113 रुपये प्रति दहा ग्रॅम वाढल्या होता.
 
सोन्याची उलाढाल करणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जर याकडे पाहता येत्या काही दिवसांमध्ये किंमती अजून वाढतील. चांदीच्या किंमतींमध्येही वाढ झाल्याची पहायला मिळतेय. 8 ऑगस्टला एक किलो चांदीचा भाव 650 रुपयांनी वाढला.
 
इंडस्ट्रीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असंच सुरू राहिलं तर या वर्षीच्या अखेरपर्यंत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 40 हजार रुपयांच्या आसपास होईल.
 
का वाढत आहेत किंमती?
श्रावण महिन्यात विक्री वाढल्याने देखील सोन्याच्या किंमती वाढतात. पण सध्याच्या घडीला या किंमती वाढण्याची इतरही अनेक कारणं आहेत. उदारीकरणाच्या नंतर सोन्याच्या किंमती आर्थिक कारणांसोबतच आंतरराष्ट्रीय कारणांमुळेही वाढत आहेत.
 
मोदी सरकारने सादर केलेल्या संपूर्ण बजेटमध्ये सोन्यावरचं आयात शुल्क 10 टक्क्यांवरून वाढवून 12.5 टक्के करण्यात आलं होतं. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नुकतीच चौथ्यांदा व्याजदरांत कपात केलेली आहे. विश्लेषक सतीन मांडवा सांगतात, "रेपो रेटमध्ये 35 बेस पॉइंट्सची कपात करण्यात आल्याने बँकांकडून कर्ज घेणाऱ्यांचा फायदा होईल, पण यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे."
रेपो रेट म्हणजे काय?
सतीश मांडवा म्हणतात, "हा तो व्याजदर आहे जो आरबीआयकडून कर्ज घेणाऱ्यांना द्यावा लागतो. या दरात कपात केल्याने बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणं जास्त सोपं जातं. म्हणजे या बँकांकडचा पैसा वाढतो. यानंतर बँका बाजारात कर्जं देतात."
 
ते म्हणतात, "पूर्ण अर्थव्यवस्थेतला पैसा वाढतो. याचा परिणाम म्हणून संस्था आणि सामान्य नागरिक आपल्या पैशाचा वापर सोनं खरेदी करण्यासाठी करतात. यामुळे सोन्याला असणारी मागणी आणि सोन्याच्या किंमती दोन्हींमध्ये वाढ होते."
 
बजेटनंतरची परिस्थिती
संसदेमध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं पहिलं बजेट सादर करण्यात आल्यानंतर शेअर बाजारामध्ये मंदी पहायला मिळतेय. गेल्या 30 दिवसांमध्ये गुंतवणुकदारांचे 13 लाख कोटी रुपये बुडलेले आहेत.
 
शेअर बाजार विश्लेषक सतीश मांडवा सांगतात, "या सगळ्याशिवाय केंद्र सरकारने कलम 370 संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीर राज्याची जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काश्मीरमध्ये कर्फ्यू आहे. या सगळ्यामुळे गुंतवणुकदारांमधली भीती वाढली आहे."
 
"आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य कमी होतंय. आपला देश सोन्याच्या बाबतीत पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. डॉलरच्या किंमती वाढल्याने सोनं विकत घेण्यासाठी कितीतरी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे सोनं महागतंय. यासगळ्याचा परिणाम म्हणून दोन दिवसांत सोन्याच्या किंमती लागोपाठ वाढल्या आहेत."
 
सतीश मांडवा यांच्यानुसार काश्मीरमधली अस्थैर्य कायम राहिलं आणि आंतरराष्ट्रीय बाजारातली आर्थिक परिस्थितीही अशीच राहिली तर या वर्षीच्या अखेरपर्यंत सोन्याच्या किंमती 10 ग्रॅममागे 40 हजार रुपये होतील.
आंतरराष्ट्रीय कारणं
भारतामध्ये सोन्याच्या किंमती वाढण्यामागे देशांतर्गत कारणांशिवाय आंतरराष्ट्रीय कारणांचीही महत्त्वाची भूमिका असते.
 
अमेरिका आणि चीनदरम्यान सुरू असणाऱ्या ट्रेड वॉरचा परिणाम जगभरातल्या शेअर बाजारांवर पहायला मिळतोय. बुलियन डेस्कनुसार नॅस्डॅक आणि डाऊ जोन्स हे दोन्ही सोमवारी तोट्यामध्ये कारभार करत होते. निक्केई, युरो स्टॉक्स, हँड सेंग आणि शांघाय कॉम्पोझिट इंडेक्समध्येही घसरण पहायला मिळाली. आरबीआयने घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय शेअर बाजारात सेंसेक्स आणि निफ्टीमध्येही गेल्या आठवड्यात मंदी पहायला मिळाली होती.
 
सतीश मांडवा यांच्या मते गुंतवणूकदारांमध्ये यासगळ्यामुळेही भीती आहे. अशा स्थितीत सध्याच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीकडे पाहून गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत आहेत. जगातल्या अनेक देशांच्या केंद्रीय बँकांनीही सोने खरेदी सुरू केली आहे म्हणूनच सोन्याला असणारी मागणी वाढली आहे.
 
चीन भारतापुढे
सोन्याच्या विक्रीबाबत चीन आणि भारत सर्वात आघाडीवर आहेत. अमेरिकेला पिछाडीवर टाकण्याच्या चीनच्या सातत्याच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही.
 
डॉलरच्या तुलनेत चीनचं चलन युआनने गेल्या दहा वर्षांतली आपली सर्वात खालची पातळी गाठलेली आहे. बीबीसी बिझनेसच्या आकडेवारीनुसार एका अमेरिकन डॉलरसाठी आता 7 युआन खर्च करावे लागत आहेत.
 
2008च्या आर्थिक मंदीनंतरची ही सर्वात खालची पातळी आहे. त्यावेळी एका डॉलरसाठी 7.3 युआन खर्च करावे लागत होते.
 
यापूर्वी चीनने आंतरराष्ट्रीय बाजारातली आपली स्थिती मजबूत करण्यासाठी रणनीती म्हणूनही आपल्या चलनाचं अवमूल्यन केलं आहे.
 
ट्रेड वॉरचा परिणाम?
अमेरिकेतल्या ट्रम्प सरकारने चीनमधून येणाऱ्या 300 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंवरचं आयात शुल्क 10 टक्क्यांनी वाढवलेलं आहे. बाजाराचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते याचा परिणाम म्हणून येत्या काही दिवसांमध्ये युआनच्या दरामध्ये आणखी 5 टक्क्यांची घसरण होईल आणि या वर्षीच्या अखेरपर्यंत एका डॉलरच्या तुलनेत युआनची किंमत 7.3 होईल.
 
बुलियन डेस्कच्या नुसार एक औंस म्हणजे 28.34 ग्रॅम सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत 1497.70 डॉलर आहे. हे गेल्या सहा वर्षांमधलं सर्वोच्च मूल्य आहे. 2013मध्ये एक औंस सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत होती 1696 डॉलर्स. त्यावेळी भारतीय बाजारामध्ये सोन्याची किंमत 10 ग्रॅममागे 35 हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती.
 
सोनं विकत घ्यायचं की विकायचं?
सोन्याच्या वाढत्या किंमतींनी सामान्यांना अडचणीत टाकलंय. ज्या लोकांना आपल्या मुलांच्या लग्नासाठी किंवा इतर दुसऱ्या कारणासाठी सोनं घ्यायचं आहे त्यांनी लगेच निर्णय घ्यायची गरज आहे.
 
2013मध्ये सोन्याची किंमत दहा ग्रॅममागे 35 हजार रुपयांपर्यंत पोहोचल्यानंतर अनेकजण बाजारात खरेदीसाठी पोहोचले होते. आणि यानंतर लगेचच आंतरराष्ट्रीय कारणांमुळे सोन्याच्या किंमती कमी होत गेल्या.
 
सध्याच्या परिस्थितीमध्ये काय करायला हवं याबाबत शेअर मार्केट तज्ज्ञ सतीश मांडवा सांगतात की बाजारातल्या सोन्याच्या वाढत्या किंमती पाहून सोने खरीदाचा निर्णय घ्यायला हवा.
 
जे लोक सोनं खरेदीमध्ये गुंतवणूक करत आहेत त्यांनी कोणताही निर्णय घेण्याआधी आंतरराष्ट्रीय बाजाराचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.
 
पण ज्या लोकांना कमी प्रमाणात सोनं घ्यायचं आहे त्यांनी आपल्या गरजेनुसारच खरेदी करावी.