मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 18 जुलै 2022 (20:53 IST)

संजय राऊत म्हणतात, ‘एकनाथ शिंदेंच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार’

sanjay raut
स्वत: मुख्यमंत्र्यांच्या (एकनाथ शिंदे) डोक्यावर अपात्रतेची तलवार आहे. ज्या 16 आमदारांची नावं आम्ही अपात्रतेसाठी दिली आहेत, त्यात पहिलं नाव मुख्यमंत्र्यांचं आहे. त्यामुले मुख्यमंत्री दिल्लीत खुर्ची वाचवण्यासाठी येतायेत," असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.
 
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत नवीन कार्यकारिणी जारी केली आणि स्वत:ला मुख्य नेता घोषित केलंय. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "शिंदेंच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला कायद्याचा अधिकार आहे. फुटीर गट राष्ट्रीय पक्षाची कार्यकारिणी बरखास्त कशी करू शकते?"
 
तसंच, "शिवसेनेचं नेतेमंडळ बाळासाहेब ठाकरे आणि कार्यकारिणीने तयार केलीय. शिवसेना अधिकृत, नोंदणीकृत पक्ष आहे. शिवसेना हा गट नाहीय. हा पक्ष आहे. बाहेर गेलेल्यांना कार्यकारिणी बरखास्त करण्याचा अधिकार नाही. जनतेला आणि त्यांच्यासोबतच्या नेत्यांना भ्रमित करण्याचा प्रकार आहे," असं राऊत म्हणाले.
 
"बाळासाहेब ठाकरेंच्या 56 वर्षांच्या शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करून, स्वत:ची कार्यकारिणी जाहीर करतं. लोक हसतायेत, मजा घेतायेत," असंही राऊत म्हणाले.
 
शिवसेनेच्या 'या' 12 खासदारांचा शिंदे गटाला पाठिंबा, उद्धव ठाकरेंसोबत कोण?
एकनाथ शिंदेंनी 39 आमदारांसोबत शिवसेनेतून बंड केलं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. या मोठ्या धक्क्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बाहेर येत नाही, तोवर एकनाथ शिंदे दुसरा मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
 
एकनाथ शिंदे गटाची आज (18 जुलै) मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेच्या 12 खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती लावल्याची माहिती मिळतेय.
 
शिवसेनेचे लोकसभेत एकूण 18 खासदार आहेत. यातील 12 खासदारांनी उपस्थिती लावल्यानं शिवसेनेचे लोकसभेतील केवळ 6 खासदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले आहेत.
 
अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, गजानन किर्तीकर, राजन विचारे, संजय जाधव आणि विनायक राऊत हे उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं कळतंय.
 
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या यापूर्वीच शिंदे गटात सामिल झाल्या होत्या. त्यानंतर अनेक खासदारांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंवर दबाव आणत, भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यास सांगितलं.
 
त्यानुसार उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबाही जाहीर केला. त्यावेळी आपल्यावर कुणाचाही दबाव नव्हता, उलट शिवसेनेतील आदिवासी समाजातील पदाधिकरी आणि कार्यकर्त्यांचा आग्रह होता, असं स्पष्ट केलं.
 
मात्र, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा जाहीर करण्यापूर्वीच मुंबईतील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंनी पत्र जाहीर करत, मुर्मूंना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. हा प्रकार पक्षप्रमुखांवर सरळ सरळ दबाव आणण्याचा प्रकार होता, असं राजकीय विश्लेषक मानत होते.
 
एकनाथ शिंदेंसोबत 'हे' 12 खासदार?
हेमंत गोडसे
हेमंत पाटील
राजेंद्र गावित
संजय मंडलीक
श्रीकांत शिंदे
श्रीरंग बारणे
राहुल शेवाळे
प्रतापराव जाधव
धैर्यशील माने
कृपाल तुमाने
भावना गवळी
शिंदे गटानं जाहीर केली शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी
एकनाथ शिंदे यांच्या गटानं शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बराखास्त करून, नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे.
 
शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आलीय.
 
महत्त्वाचं म्हणजे, शिवसेना पक्षप्रमुखपदाला हात लावलेला नाही.
 
नव्या कार्यकारिणीत दिपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलीय, तर रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी निवड करण्यात आलीय.
 
उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आलीय.
 
उद्धव ठाकरेंच्या बैठकीत अनुपस्थित होते खासदार
शिवसेना आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक घेतली. या बैठकीला कल्याण-डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे आणि यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी उपस्थित नव्हते.
 
श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक झाल्यानंतर, शिंदे यांच्या समर्थनार्थ ते रस्त्यावर उतरले होते.
 
"आम्ही सांगितलं कार्यकर्त्याचा जीव घुसमटतोय. निधी मिळत नाही याची तक्रार केली. शिवसेनेत गेल्या अडीच वर्षात सत्तेमध्ये आल्यानंतर मोठा असंतोष झाला," असं म्हणत त्यांनी बंडाला पाठिंबा दिला.
 
दुसरीकडे खासदार भावना गवळी ईडीच्या रडावर आहेत. मनी लॉंड्रिंगप्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे. भावना गवळींनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी हिंदुत्वासाठी हे शिवसैनिक लढत आहेत. त्यांच्यावर कारवाई करू नका, अशी भूमिका घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे ठाण्याचे खासदार राजन विचारे बाहेरगावी असल्याने बैठकीला उपस्थित नव्हते. राजन विचारे यांच्याशी बीबीसी मराठीचा संपर्क होऊ शकला नाही.
 
ठाण्यातील स्थानिक पत्रकार सांगतात, "राजन विचारे गेल्याकाही दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये. शिंदे यांच्या बंडाबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत भूमिका स्पष्ट केली नाही. पण, विचारे शिंदे यांच्या अत्यंत जवळचे असल्याने शिंदे गटात जातील."