शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (16:57 IST)

डोनाल्ड ट्रंपविरोधात दुसऱ्या महाभियोगाचा मार्ग मोकळा, आजपासून सुनावणी

अमेरिकेच्या सिनेटने माजी राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांच्याविरोधात महाभियोग चालवणे घटनात्मक असल्याचं सांगत त्याची सुनावणी आजपासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
 
ट्रंप यांचा बचाव करणाऱ्यांनी ट्रंप यांची बाजू मांडली मात्र त्याचा उपयोग झाला नाही. ट्रंप यांनी व्हाईट हाऊस सोडले आहे त्यामुळे ते या कारवाईला सामोरे जाण्यात अर्थ नाही असा ट्रंप यांच्यातर्फे बचाव करण्यात आला होता. मात्र 56 विरोधात 44 मतांनी ही सुनावणी पुढे नेण्याचा निर्णय झाला.
गेल्या महिन्यात जेव्हा कॅपिटल हिल इमारतीवर हल्ला झाला तेव्हा ट्रंप यांनी अंतर्गत उठावाला उत्तेजन दिलं असा त्यांच्यावर आरोप आहे.
डेमोक्रॅटसनी ट्रंप यांच्या 6 जानेवारीच्या भाषणाचा व कॅपिटल हल्ल्याच्या व्हीडिओचा पुरावा यासाठी आधार म्हणून दाखवला.
 
हे भाषण म्हणजे मोठा अपराध आहे. जर महाभियोगासाठी ते पुरेसं नाही तर मग कोणतंच कृत्य महाभियोगासाठी पुरेसं नाही असं म्हणता येईल असं मेरिलँडचे संसद सदस्य जेमी रस्किन यांनी सांगितलं.
तर ट्रंप यांच्या वकिलांनी माजी राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग चालवणं घटनाबाह्य असल्याचं सांगत यामागे डेमोक्रॅट्स राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे करत असल्याचा आऱोप केला आहे.
 
56 विरुद्ध 44 अशी विभागणी झाल्यामुळे 6 रिपब्लिकन्सनी आपलं मत डेमोक्रॅट्सच्या पारड्यात टाकल्याचं स्पष्ट होतं. 100 सदस्यांच्या सिनेटमध्ये ट्रंप यांना दोषी ठरवण्यासाठी दोन तृतियांश मतांची गरज आहे. ही सुनावणी किती काळ चालेल आणि त्यात साक्षीदारांना बोलावलं जाईल का हे स्पष्ट नाही. पण दोन्ही बाजूचे खासदार ही सुनावणी लवकर पूर्ण व्हावी या मताचे आहेत असं म्हटलं जातंय
 
याचा निर्णय काय लागेल सांगता येत नाही- अँथनी झर्चर
डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधातील सुनावणी सुरू होत आहे. त्याचा अंतिम निर्णय काय लागेल हे सांगता येणार नाही असं बीबीसीचे उतर अमेरिका प्रतिनिधी अँथनी झर्चर यांनी सांगितले.
 
सुनावणी व्हावी का यासाठी मतदान घेतल्यावर फक्त 6 रिपब्लिकन्सनी त्याबाजूने मतदान केले. ट्रंप यांना दोषी ठरवण्यासाठी आणखी 17 रिपब्लिकन्सनी मतं देण्याची गरज आहे.
 
आता ट्रंप यांच्याविरोधात कारवाईसाठी डेमोक्रॅट्स सुनावणी सुरू करतील. लोकांनी ट्रंप यांच्यावर कारवाईसाठी मतं दिली त्याचंच प्रतिबिंब या कारवाईत उमटलं अशा आशयाचा युक्तिवाद डेमोक्रॅट्स करण्याची शक्यता आहे.
 
आता काय होणार?
दोन्ही पक्षांना आपापली बाजू मांडायला प्रत्येकी 16 तास मिळतील. हे युक्तिवाद आठवड्याच्या अखेरीपर्यंत चालेल. जो बायडन यांच्या कोरोना पॅकेजला मान्यता मिळण्यासाठी ही कारवाई लवकरात लवकर संपावी यासाठी दोन्ही बाजूंचे लोक प्रयत्नशील आहेत. ट्रंप यांच्यावरील दोषारोप सिद्ध होण्यासाठी सोमवारी मतदान होण्याची शक्यता आहे.