शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (15:01 IST)

उद्धव ठाकरेंना नारायण राणेंनी एकदा नाही तीनदा फोन केला - विनायक राऊत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोकण दौऱ्यानंतर शिवसेना विरुद्ध राणे पुत्र असा वाद रंगला आहे.
 
भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली असून त्यांना 'मातोश्रीचा चप्पल चोर' म्हटलं आहे. तर दुसऱ्या बाजूला नितेश राणे यांनीही शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
 
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी "देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे शिवसेना आणि भाजपची युती तुटली" असं वक्तव्य केलं होतं.
 
तसंच "इतक्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल," अशी टीका विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर केली होती.
 
याला प्रत्युत्तर देत निलेश राणे यांनी विनायक राऊत यांचा एकेरी उल्लेख करत एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे.
 
काय म्हणाले निलेश राणे?
आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हीडिओ प्रसिद्ध करत निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना 'फटके देण्याची' धमकी दिलीय.
 
निलेश राणे म्हणाले, "नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विनायक राऊत यांनी टीका केली. ते स्वत: भाजपच्या लाटेत दोन वेळा निवडून आले आहेत. हिंमत असेल तर राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा निवडणूक लढवून दाखवावं. राऊत हे नॉन-मॅट्रीक आहेत."
 
"मातोश्रीचा चप्पल चोर अशी त्यांची ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर ते मातोश्रीचा नवीन थापा आहे. 2024 ला तुमचा बंदोबस्त करणार आणि कायमचा कोकणातून हाकलणार हे मी शंभर टक्के सांगतो,"
 
'राणेंचा ठाकरेंना तीनदा फोन'
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील सहा राणे समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
 
याबाबत प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, "व्हॅलेंटाईन डे काही दिवसांवर आहे. शिवसेना हे आमचे जुने प्रेम आहे. त्यामुळे सात नगरसेवक त्यांना भेट स्वरुपात देत आहोत."
 
"वैभववाडी नगरपंचायतीत शिवसेनेची अवस्था बिकट आहे. त्यांच्याकडे उमेदवार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पहिल्यापासून प्रेम करतो. त्यांच्या पक्षाची अशी अवस्था होऊ नये म्हणून व्हॅलेंटाईन डे निमित्त आम्ही सात नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवत आहोत."
 
नितेश राणे पुढे म्हणाले, "वैद्यकीय महाविद्यालयाच्या फाईलवर सही करण्यासाठी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन कॉल केला होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत फाईलवर सही केली. आम्ही उद्धव ठाकरे यांना काही देऊ शकत नाही. काही दिलं तरी ते घेणार नाहीत. पुष्पगुच्छ पाठवला तरी ते स्वीकारणार नाहीत. त्यामुळे त्यांचे आभार प्रकट करण्यासाठी हे नगरसेवक त्यांच्याकडे पाठवत आहोत. व्हॅलेंटाईन दिवसाच्या निमित्ताने मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला मनापासून शुभेच्छा देतो."
 
तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना एकदा, दोनदा नव्हे तर तीन वेळा फोन केला होता असा खुलासा विनायक राऊत यांनी केला आहे.
 
राऊत म्हणाले,"महाविद्यालयाचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आला तेव्हा तातडीने त्यांनी मंजुरी दिली. जे रखडलं होतं ते यांच्या कंगालपणामुळे रखडलं होतं. नारायण राणे यांनी एकदा नव्हे तर तीन वेळा फोन केला होता. म्हणून मोठ्या मनाने चौकशी करून उद्धव ठाकरे यांनी काय काम आहे अशी विचारणा केली."
 
'आम्ही व्हॅलेंटाईन रिटर्न गिफ्ट देऊ'
निलेश राणे यांच्या व्हॅलेंटाईन गिफ्टला आम्ही व्हॅलेंटाईन रिटर्न गिफ्ट देऊ असे प्रत्युत्तर शिवसेनेचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
 
ते म्हणाले, "अमित शहा यांच्या पायगुणाने सत्तांतर होईल असं नारायण राणे म्हणाले. मात्र तुम्ही पहाताय उलट त्यांचेच नगरसेवक आमच्याकडे आले आहेत. नितेश राणे यांना व्हॅलेन्टाईन रिर्टन गिफ्ट म्हणून वैभववाडी नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा पाहायला मिळेलं."
 
'फडणवीस यांच्या हट्टामुळे युती तुटली'
कोकणात वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपचे खासदार नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.
 
विनायक राऊत म्हणाले, "नारायण राणे काय आणि अमित शहा दोघेही समविचारी आहेत. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही त्यांची पद्धत आहे. शिवसेनेने नारायण राणे यांच्या महाविद्यालयाची मंजुरी रखडवण्याचा प्रयत्न केला नाही. नारायण राणे काँग्रेसमध्ये होते तेव्हा सोनिया गांधींसमोर भाजपवर टीका करायचे आणि भाजपमध्ये गेल्यानंतर आता अमित शहा यांच्यासमोर काँग्रेसवर टीका करतात. असे खोटारडेपणाचे राजकारण सुरू आहे."
 
"देवेंद्र फडणवीस यांनी घोडचूक केली. केवळ फडणवीस यांच्या हट्टामुळे युती तुटली हे अनेक लोक आता मान्य करतात. भाजपने विश्वासघात केल्यानेच शिवसेनेला दूर जावे लागले,"असंही ते म्हणाले.